सब्जी तरकारी दिवस

३१ मार्च हा सब्जी तरकारी दिवस म्हणून पाळला जाणार आहे. आपला देश समशीतोष्ण हवामानाचा आहे. एरवी आपल्याला उन्हाचा कितीही त्रास वाटला तरी आपण नशीबवान आहोत की आपल्याला इतकं ऊन मिळतं. समशीतोष्ण हवामानामुळे आपल्याकडे वर्षभर चांगल्या भाज्या आणि मोसमी फळं मिळतात.

पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो पण भारतात मांसाहारी लोकसुद्धा भरपूर भाज्यांचा वापर करतात. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषणमूल्यं मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे भरपूर भाज्या खाणे.

मला आठवतं लहानपणी पानात पहिल्यांदा वाढलेलं खायचंच असा दंडक होता. कितीही नावडीची भाजी असली तरी ती खावी लागायचीच. पण खाऊन खाऊन त्या भाज्याही कधी आवडायला लागल्या ते कळलंच नाही. आज अशी एकही भाजी नाही की जी मी खात नाही. अर्थात काही भाज्या जास्त आवडतात तर काही कमी पण सगळ्या भाज्या केल्या आणि खाल्ल्या जातात.

आपल्याकडे भाज्यांचं किती वैविध्य आहे बघा ना. पालेभाज्या बघितल्या तर पालक, मेथी, चवळी, माठ, चुका, घोळ, चिवळी, चंदनबटवा, चाकवत, पोकळा, शेवग्याचा पाला, मुळ्याचा पाला, हरभ-याचा पाला, तांदुळजा, करडई, अंबाडी, कांद्याची पात अशा अनेक भाज्या मिळतात. शिवाय पावसाळ्यात मोसमी रानभाज्याही मिळतात. फळभाज्यांमध्येही असंच आहे. भोपळा, दुधी, दोडका, पडवळ, कारली, फ्लॉवर, कोबी, वांगी, पापडी, गवार, फरसबी, श्रावणघेवडा, चौधारीच्या शेंगा, काकडी, गाजर, परवर, अळकुड्या, बीट, मुळा, सिमला मिरची, भेंडी, तोंडली, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कांदे, बटाटे, रताळी. नावं घ्यावीत तितकी कमी आहेत.

अनेकांच्या घरात ठराविक भाज्या केल्या जातात कारण घरातल्यांची नवीन चवी घेऊन बघायची इच्छा नसते. मला एक बरं वाटतं की लहानपणी पानातलं संपवण्याची सक्ती असल्यानं सगळ्या भाज्या खाण्याची सवय लागली आणि त्याचा फायदाच झाला. माझ्या मुलींनाही मी लहानपणापासून वेगवेगळ्या स्वरूपात भाज्या खायला घालायचा प्रयत्न केला. त्या भाज्या खातातच पण त्यांच्या भाज्यांमध्ये बेसिल, केल, झुकिनी, लाल-पिवळ्या सिमला मिरच्या, पार्सले, ब्रोकोली अशा भाज्यांचीही भर पडली आहे. पण हरकत नाही. या भाज्याही आता आपल्याकडे पिकवल्या जातात त्यामुळे त्या कोप-यावरच्या भाजीवाल्याकडेही मिळतात. खाद्यसंस्कृती सतत उत्क्रांत पावत असते त्यामुळे या नवीन भाज्याही आता आपल्याकडे रूळायला लागल्या आहेत.

कांदा-लसूण-मिरचीच्या फोडणीवर परतलेल्या साध्या पालेभाज्या, भेंडी-तोंडली-कारल्याच्या काच-या, पालक-मेथीचं वरण, करडई-मेथीची डाळभाजी, भोपळ्याचं आणि दुधीचं रायतं, फ्लॉवरचा रस्सा, भाज्या घालून केलेला पुलाव, कोबी-कोथिंबिरीच्या वड्या, मेथी-पालकाच्या पराठे आणि पु-या, काकडी-गाजर-बीटची कोशिंबीर, चंदनबटवा-पोकळ्याची ताकातली भाजी, गवार-घेवड्याची काळा मसाला घालून केलेली भाजी, भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार, बटाटा-वांग्यांचे काप, घोसाळ्याची भजी, मिरचीचा ठेचा, शेवग्याच्या शेंगांची कढी-वरण-पिठलं, भाज्यांची सूप्स, मेथीचा-कांद्याच्या पातीचा घोळाणा, भरली वांगी-कारली-दोडकी, वांगी भात-मटार भात-पुलाव, किती पदार्थांची नावं घ्यावीत…

भाज्या वापरून किती काय काय करता येऊ शकतं. आपल्या सुदैवानं आपल्याकडे कोप-याकोप-यावर भाजीवाले असतात. अजूनही अनेक ठिकाणी तात्पुरते बाजार भरतात जिथे जवळच्या खेड्यांमधून ताज्या भाज्या येतात.

आपल्या रोजच्या जेवणात वरण, भाजी, कोशिंबीरी, अगदी मांसाहारी पदार्थांमध्येही शक्य त्या आणि शक्य तितक्या भाज्यांचा समावेश करा आणि आरोग्य राखा.

#साधीराहणी #सब्जीतरकारीदिन #हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #mumbaimasala #sabjitarkaridin #healthiswealth #healthyliving #healthyeating #simpleliving

सायली राजाध्यक्ष

फोडणीचं गणित

तिखट मराठी पदार्थांमध्ये फोडणी ही हवीच. उत्तर भारतातल्या काही पदार्थांमध्ये फोडणी घालत नाहीत. कित्येकदा फक्त तेल किंवा तूप गरम करून घालतात. पण आपल्याकडे मात्र बहुतेक पदार्थांमध्ये फोडणी असतेच.

म्हणजे कालवणं, भाज्या, आमट्या, वरण, कोशिंबिरी यांना तर आपण फोडणी घालतोच, पण बटाटेवड्यांसारख्या पदार्थांच्या सारणालाही फोडणी घालतो. आमच्याकडे मराठवाड्यात पीठ पेरून केलेल्या पालक, मेथीसारख्या भाज्यांवर वरून ताजी फोडणी घेतात. अगदी पानावर बसताना लसूण आणि लाल मिरचीची खमंग फोडणी करायची आणि ती या भाज्यांवर घ्यायची पद्धत आहे. शिवाय गोळ्याच्या आमटीतले गोळे कुस्करून त्यावरही ही फोडणी घेतली जाते. अंबाडीच्या चटकदार भाजीवर शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरचीची खमंग फोडणी हवीच हवी.

दुर्गा भागवतांच्या खमंग या पुस्तकात फोडणीबद्दल एक अफलातून लेख आहे. या लेखात वेगवेगळ्या जमातींमध्ये केल्या जाणा-या वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्यांबद्दल उल्लेख आहे. २०१६ च्या डिजिटल अंकासाठी मी हा लेख वाचला होता. त्याची लिंक शेअर करतेय.

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या पुस्तकात जिवंत फोडणीचा उल्लेख आहे. त्यांच्या सास-यांना गरम वरण भातावर जिवंत फोडणी लागायची. हे वरणही वालाच्या डाळीचं असायचं. तर जिवंत फोडणी म्हणजे कढलीतून फोडणी केल्याकेल्या ती वरणावर वाढायची. तिचा चुर्र असा आवाज आला पाहिजे. मलाही अशी जिवंत फोडणी फार आवडते कारण तिच्यात ताजा खमंग वास असतो.

कित्येक गृहिणींना फोडणी कशी करायची हे नीटसं माहीत नसतं. अनेकांच्या फोडणीत मोहरी कच्ची असते, ती फार वाईट लागते. शिवाय प्रत्येक फोडणीचं गणित वेगळं असतं. काही फोडण्यांमध्ये मोहरी जास्त घालायची असते तर काही फोडण्यांमध्ये नावापुरती. हे गणित जमलं नाही तर फोडणीचा विचका झालाच समजा. कधीकधी काही लोक फोडणीत मोहरी, जिरं, लसूण, मिरच्या, कढीपत्ता यांचा इतका मारा करतात की तोंडाची चव जाते इतका पाचोळा तोंडात येत राहातो.

फोडणी करणं हे एक निगुतीचं काम आहे. आमच्या रंजनानं कसलीही फोडणी केली की ठसका लागलाच समजा. फोडणी करताना आधी कढई किंवा पातेलं तापवायला ठेवावं. मग ते जरासं तापलं की त्यात तेल-तूप घालावं (परत तेलातुपाच्या तापमानाचं गणित वेगळं आहे). ते चांगलं गरम झालं (चांगलं म्हणजे धूर येईपर्यंत कडकडीत नाही) की आच मंद करून त्यात मोहरी घालावी. फक्त हिंग मोहरीची फोडणी असेल तर मोहरी तडतडली की त्यात हिंग घालावा आणि मग जो पदार्थ करतोय त्याचे घटक पदार्थ घालावेत.

जर जिरं-मोहरी-कढीपत्ता अशी फोडणी असेल. तर मोहरीपर्यंतचा क्रम वरच्यासारखाच. त्यानंतर जिरं घालावं. ते तडतडलं की कढीपत्ता आणि कढई फार तापली असेल तर गॅस बंद करून मग कढीपत्ता घालावा. तो त्या आचेत खमंग परतला जातो. उडदाची डाळ वापरतानाही हेच गणित.

लसणाची फोडणी करताना लसूण ठेचून किंवा आपल्याला हवा तसा चिरून घ्यावा. मोहरी पूर्ण तडतडली की लसूण घालावा. तो चमच्यानं परतत चांगला लाल करावा. त्यानंतर त्यात हिंग-हळद असं आपल्याला जे घालायचं असेल ते घालावं. फोडणीत तिखट घालताना गॅस बंद करून जरासं थांबून मग घालावं. नाहीतर तिखट जळतं. त्याचा रंग आणि चव नाहीशी होते. सुक्या लाल मिरच्याही लाल रंग राहिला पाहिजे अशा बेतानंच घालाव्यात. तेल फार गरम झालं असेल तर मिरच्या काळ्या होतात. त्यामुळे तेलाच्या तापमानाचा अंदाज घेऊन मगच मिरच्या घालाव्यात.

काही फोडण्यांमध्ये तीळ किंवा भरडलेले धणे घालतात. हे पदार्थ मोहरी चांगली तडतडल्यावर घालावेत. हेही तडतडतात. नंतर त्यात हवे ते घटक पदार्थ घालावेत.

काही फोडण्यांमध्ये कोथिंबीर परतून छान लागते. मी एक कोथिंबिरीचं वरण करते (माझी आजी याला पळीफोडणीचं वरण म्हणायची. तिच्या स्वयंपाकघरात एक लोखंडी पळी होती. आजी त्यात मोहरी तडतडली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती चुरचुरीत झाली की हळद-हिंग-तिखट घालून ती पळी वरणात बुडवायची). मी हीच रेसिपी करते फक्त पळीफोडणीऐवजी कढईत फोडणी करून त्यात वरण घालते. कोथिंबीर सतत परतत राहावी लागते. जळाली तर ती कडू लागते.

आपण तुपजि-याच्या फोडण्याही करतो. मठ्ठा, फोडणीचं ताक, तुपजि-याच्या फोडणीचं वरण, काकडीची उपासाची कोशिंबीर, साबुदाणा खिचडी, दाण्याची आमटी, काही भाज्या यांना आपण तुपजि-याची फोडणी करतो. तुपाची फोडणी करताना नेहमी कढई किंवा पातेलं चांगलं तापवावं. त्यात तूप घातलं की ते गरम झालं पाहिजे इतपत तापवावं. तूप घातलं की जिरं घालून ते चांगलं तडतडू द्यावं. मग पदार्थानुसार त्यात हिंग, कढीपत्ता, लसूण घालावा. तुपात लसूण घालायचा असेल तर तो फक्त शिजू द्यावा. तुपात तो फार लाल केला तर कडू लागतो. तुपाची फोडणी नेहमी मंद आचेवर करावी. घरचं तूप असेल तर ते हमखास जळतं त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवावं. तुपात हिंग आणि कढीपत्ता फार फर्मास लागतं.

गोळा वरण किंवा घट्ट वरणावर खमंग मोहरी हिंगाची फोडणी फार मस्त लागते. गोळा वरण, फोडणीचा भात, भुरका, दडपे पोहे, भाजीवर वरून घ्यायची फोडणी यात मोहरी जास्त घालावी. पण रस्सा भाज्या, आमट्या यात मोहरी बेतानं घालावी. प्रसिद्ध लेखक ग. रा. कामत यांना मोहरी अजिबात आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी एखाद्या पदार्थात मोहरी जास्त झाली तर माझ्या सासुबाई म्हणायच्या, आज कामत असते तर त्यांनी वेचून मोहरी काढली असती.

मी स्वतः फोडण्यांबद्दल जरा अतिच त्रासदायक आहे. माझ्याकडे कुणीही जेवायला असेल तर अनेकदा मी कापण्याचिरण्यापासून सगळं करतेच. पण कोशिंबीर, मुद्दा भाजी, कढी, भरीत अशा गोष्टी केल्या असतील तर त्याच्या फोडण्या ऐनवेळी घालते. कारण मला त्या फोडण्या खमंग, खुसखुशीत राहायला हव्या असतात. या फोडण्या करताना मी इतकी मनापासून रमलेली असते की कधीकधी मला त्यातून जागं व्हायला वेळ लागतो!

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #फोडणी #स्वयंपाकाचंगणित #simplefood #simplerecipe #mumbaimasala #healthiswealth #healthyeating

ही पोस्ट सोशल नेटवर्कवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

काळं मटन

Screenshot_20180313-101941_01आमच्या घरी चिकन अनेकदा होतं. मासे तर अगदी नियमितपणे होतात पण मटन फारसं होत नाही. निरंजन आणि सावनीचं म्हणणं की चिकनला फारशी चव नसते, त्याउलट मटन चवदार असतं. पण रेड मीट जास्त खाऊ नये असं डॉक्टर सांगतात म्हणून म्हणा किंवा अजून काही पण मटन फारच कमीदा होतं.

सावनीचा काल वाढदिवस होता आणि तिला मटन खायचं होतं. ती गेले दोन आठवडे मिड टर्म ब्रेक होता म्हणून इथे मुंबईतच होती आणि आज परतणार होती. तिला माझ्या मैत्रिणीच्या, चिन्मयीच्या हातचं मटन फार आवडतं. मला ती म्हणाली की, आई तसं मटन कर ना. चिन्मयीला फोन करून रेसिपी विचारून घेतली आणि मटन केलं. ते उत्तम झालं होतं असं खाणारे लोक म्हणाले. 😊

गेल्या मंगळवारी माझी हिस्टरेक्टोमी झाली. मी गुरूवारी घरी आले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अंमलात आणूनच, आरामात मी मटन केलं. राणीला काहीही सांगितलं की त्याची उत्तम अंमलबजावणी करते. तसं मी तिला मसाला काढून दिला. त्यातलं काय भाजायचं, कसं भाजायचं ते सांगितलं. समोर बसून ते करून घेतलं. आणि मग शांतपणे मटन फोडणीला घातलं. त्यामुळे मलाही काही त्रास झाला नाही. आजची रेसिपी आहे काळ्या मटनाची.

काळं मटन

साहित्य – १ किलो कोवळ्या मटनाचे तुकडे (स्वच्छ धुवून घ्या), २ मोठे कांदे मध्यम आकारात चिरलेले, १०-१२ लसूण पाकळ्या- दीड इंच आलं यांचं वाटण, २-३ टीस्पून तिखट, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

वाटण मसाला – अर्धी सुक्या खोब-याची वाटी आणि ३ मोठे कांदे गॅसवर डायरेक्ट काळे होईपर्यंत भाजा आणि त्याचं छान एकजीव वाटण करून घ्या.

पूड करण्याचा मसाला – २ टीस्पून धणे, अर्धा टीस्पून शहाजिरं, १ इंचाचे २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्रं, जायफळाचा लहानसा तुकडा (१/६ तुकडा), अर्धा टीस्पून बडीशेप, १ टीस्पून खसखस, ६-७ लवंगा, १०-१२ मिरी दाणे, १ बडी वेलची, २ साध्या वेलच्या (हे सगळे साहित्य अगदी थोड्याशा तेलावर खमंग तपकिरी रंगावर भाजा. थंड झाल्यावर कोरडी पूड करा.)

फोडणीचं साहित्य – २ टेबलस्पून तेल, २ वेलच्या, लहानसा दालचिनीचा तुकडा, १ तमालपत्र

कृती –

१) कुकरला तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात खडा मसाला घाला.

२) तो तडतडला की त्यात कांदा घाला. कांदा चांगला खमंग लाल परतल्यावर त्यात आलं-लसणाचं वाटण घाला. तेही चांगला खरपूस वास येईपर्यंत परता.

३) त्यानंतर त्यात हळद, तिखट आणि मीठ घाला. चांगलं परतून त्यावर मटन घाला.

४) नीट हलवून घ्या आणि १ वाटी पाणी घाला. कुकरचं झाकण लावून ५-६ शिट्या करा.

५) कुकरचं प्रेशर सुटल्यावर त्यात कोरडी पूड घाला. चांगला घमघमाट येईपर्यंत उकळा.

६) नंतर त्यात कांदा-खोब-याचं वाटण घाला.

७) मंद आचेवर दहा मिनिटं छान शिजवा.

८) वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. काळं मटन तयार आहे.

या मटनाबरोबर ताजा पाव, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळ्या किंवा गरम भात असं काहीही छान लागतं असं आमच्या घरातल्यांचं म्हणणं आहे. मी खात नसल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. 😊 बरोबर अर्थातच कच्चा कांदा, काकडी, टोमॅटो, लिंबू घ्या.

चिन्मयी, इतकी सोपी रेसिपी सांगितलीस की मला करायला अजिबात अवघड गेलं नाही. आता आमच्या घरात हा पदार्थ वारंवार होणार हे नक्की. Thank you!

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#काळंमटन #मांसाहारीपदार्थ #मटनरेसिपी #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #मुंबईमसाला #kalamutton #nonvegrecipe #muttonrecipe #simplerecipe #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

IMG_20180312_182221

चिवळीची भाजी

परवा भाजी मंडईत गेले तेव्हा माझ्या नेहमीच्या भाजीवाल्याकडे फार भाज्या नव्हत्या. तो त्या दिवशी बाजारात गेलाच नव्हता. म्हणून जरा फिरत फिरत पुढे गेले. मंडईत बरेचसे भाजीवाले घाणेरड्या पाण्यात भाज्या बुडवून बाहेर काढतात. मी अशा भाजीवाल्यांकडून अजिबात भाजी घेत नाही. पुढे एक वसईवाली दिसली. तिच्याकडून काही भाजी घेतली. एकदम तिच्याकडे मला चिवळीची भाजी दिसली. घेऊनच टाकली.

चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.

IMG_20180221_110443

चिवळी ही घोळाच्या भाजीसारखीच असते. किंबहुना या भाजीला रानघोळ असंही म्हणतात. घोळाची भाजी थोडी जाड पानांची असते. गोलसर पानांची ही भाजी आंबट असते. लसणाची झणझणीत फोडणी घालून ती फार बहारदार लागते. चिवळीची भाजीही चवीला आंबट असते.

आजची रेसिपी आहे चिवळीच्या भाजीची.

चिवळीची भाजी

साहित्य – पाव किलो चिवळीची भाजी, अर्धा वाटी मूगडाळ भिजवलेली, २ कांदे मध्यम आकारात चिरलेले, ७-८ लसूण पाकळ्या-४-५ हिरव्या मिरच्यांचं वाटण, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी-हिंग

IMG_20180221_110754

 

कृती –

१) चिवळीची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची मूळं काढून टाका आणि फक्त कोवळे देठ ठेवा.

२) नंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यावर जराशी कोरडी करून बारीक चिरून घ्या.

३) कढईत तेलाची फोडणी करा. त्यात हिंग घाला. त्यावर कांदा घालून मध्यम आचेवर कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजू द्या.

४) कांदा शिजत आला की लसूण-मिरचीचं वाटण घाला. ते परता.

५) खमंग वास आल्यावर हळद आणि मूगडाळ घाला आणि त्यावर भाजी घाला. नीट हलवून घ्या.

६) त्यात तिखट आणि मीठ घाला. परत हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी शिजवा. मूगडाळ हलकी शिजवा फार गाळ करू नका.

ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी, एखादी खमंग चटणी, कच्चा कांदा आणि ताक असं बरोबर घेऊन खा. उत्तम लागते.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#साधीरेसिपी #सोपीरेसिपी #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #पारंपरिकरेसिपी #पारंपरिकमराठीपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #healthiswealth #healthyliving #traditionalrecipe #traditionalmarathirecipe #simplerecipe #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

स्वयंपाक एक आवश्यक काम

एका तरूण मैत्रिणीनं परवा एका ग्रुपमध्ये एक झटपट भाजीची मस्त रेसिपी शेअर केली. ती सेव करावी म्हणून आज परत त्या पोस्टवर गेले तर तिथे एक कमेंट वाचायला मिळाली. त्या मैत्रिणीला उद्देशून कुणीतरी लिहिलं होतं की तू इतका स्वयंपाक करायला लागलीस तर आता काकूबाईच झालीस. मला वाचून गंमत वाटली.

मागेही फेसबुकवर एका विदुषीनं स्वयंपाक करणं बिनडोकपणाचं आहे असं म्हटलेलं वाचलं होतं. स्वयंपाक करायला आवडणं किंवा न आवडणं हा आपापल्या आवडीचा भाग असू शकतो. त्यामुळे ज्यांना स्वयंपाक करायला आवडत नाही त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये, त्यात मला काहीच गैर वाटत नाही. पण जे आवडीनं स्वयंपाक करतात ते बिनडोकपणाचं काम करतात असं मला वाटत नाही.

आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर उत्तम अन्न खाल्लं पाहिजे. भारतासारख्या हवेत ते अन्न ताजं खाल्लं पाहिजे. आपण खातो त्या अन्नातून आपल्याला नीट पोषणमूल्यं मिळतात ना याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. मग भलेही तुम्ही स्वतः स्वयंपाक करा किंवा कुणाकडून करून घ्या. स्वयंपाक करणं आवडत नसेल तर स्वयंपाक करणारा किंवा करणारी मदतनीस ठेवा. तुम्हीच स्वयंपाक केला पाहिजे असं अजिबात नाही. पण जो तुम्हाला रूचकर, पौष्टिक अन्न खाऊ घालतो किंवा घालते त्यांच्या कष्टाचा आदर करा. उत्तम, पौष्टिक जेवण हा आपल्या दिनचर्येतला फार महत्त्वाचा भाग आहे.

मी मागेही स्वयंपाकाच्या नियोजनाबद्दल पोस्ट्स लिहिलेल्या आहेत. त्या ब्लॉगवर उपलब्धही आहेत. पण आज परत एकदा त्याबद्दल थोडंसं लिहिते. हल्ली जवळपास बहुतांश स्त्रिया कामासाठी घराबाहेर पडतात किंवा घरून काम करतात. जेव्हा घरातला पुरूष आणि स्त्री असे दोघेही कामासाठी बाहेर पडत असतील तेव्हा स्वयंपाकाचं नियोजन फार आवश्यक ठरतं.

दिवसभर काम करून थकून आल्यावर साग्रसंगीत ताजा स्वयंपाक करणं नकोसं वाटू शकतं. मग यासाठी काय करता येईल?

१) दोघंही कामासाठी बाहेर पडत असाल आणि घरात मुलं सोडून इतर सदस्य नसतील तर मग आठवड्याचा एक ढोबळ मेन्यू ठरवून ठेवा.

२) मेन्यू ठरवताना घरात उपलब्ध असलेले घटक पदार्थ तसंच तुम्ही सहज आणू शकाल असे घटक पदार्थ लक्षात घ्या.

३) मेन्यू ठरवला की सुटीच्या दिवशी त्यानुसार भाज्या, फळं, मासे, मटन-चिकन खरेदी करा. घरी आल्यावर मासे-चिकन-मटन स्वच्छ करून त्याला आवश्यक ते मसाले लावून फ्रीजरला ठेवून द्या. किंवा नुसतंच धुवून फ्रीजरला ठेवा.

४) फळभाज्या आणि फळं पाण्यात बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्या. ते पंचावर घालून नीट कोरडे होऊ द्या. पालेभाज्या निवडून स्टीलच्या डब्यात ठेवून द्या. त्या करतानाच धुवा.

५) हे केल्यानंतर मेन्यूप्रमाणे आदल्या दिवशी तयारी करत जा. किंवा आपल्या मदतनीसाकडून तयारी करून घ्या. जसं की इडली-डोसा करायचा असेल तर पीठ भिजवणं, ते वाटणं. चटणीसाठी नारळ खोवून फ्रीजरला टाकणं, सांबारसाठी चिंचेचा कोळ काढून फ्रीजमध्ये ठेवणं इत्यादी.

६) दुस-या दिवशीची भाजी ठरलेली असेल तर तीही चिरून हवाबंद डब्यात, हवाबंद काचेच्या भांड्यात ठेवून द्या. त्यासाठी लागणारं कांदा-टोमॅटो चिरून असंच ठेवून द्या. फक्त पालेभाज्या आणि कोथिंबीर मात्र ऐनवेळी चिरा.

७) सकाळी जास्त वेळ असेल तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडी तयारी करून ठेवा. जसं की आमटी करणार असाल तर सकाळीच एका बाजूला डाळ शिजवून ठेवून द्या. पोळ्याही सकाळ-संध्याकाळच्या एका वेळेला करता येतात.

८) बाहेर पडताना नीट नाश्ता करून बाहेर पडा. बरोबर डब्याबरोबर एखादं अख्खं फळ बरोबर ठेवा. एखाद्या लहानशा डबीत सुकामेवा किंवा चणेशेंगदाणे ठेवा.

९) संध्याकाळी परतलात की गरम भाताचा कुकर लावू शकाल. भात झाल्यावर त्याच कुकरमध्ये पोळ्यांचा डबा थोडावेळ ठेवलात की पोळ्या छान गरम होतात. तोपर्यंत आमटी किंवा जे काही कालवण करायचं असेल ते होऊ शकतं. कोशिंबीर करायला तर दहा मिनिटं पुरतात.

१०) किंवा संध्याकाळी फक्त भात आणि एखादं कालवण तसंच कोशिंबीर इतकं जेवण पुरू शकतं. जसं की चिकन-मटन रस्सा, माशांचं कालवण, आमटी-पिठलं-वरण.

कधीतरी बाहेर जाऊन जेवायला हरकत नाही, किंबहुना जावंच. पण वारंवार घरी मात्र बाहेरचं जेवण मागवू नका. विशेषतः प्लॅस्टिकच्या पिशवीत गरम भाज्या-आमट्या मिळतात ते अजिबात मागवू नका. ते अतिशय हानीकारक ठरू शकतं. स्वयंपाकाचं नियोजन करताना रोज एक पालेभाजी, एक फळभाजी, एक कडधान्य आणि एक डाळ असा विचार करून ठरवा. मांसाहारी खाणा-यांनी कडधान्याऐवजी किंवा डाळीऐवजी चिकन-मटन-माशांचा विचार करावा. टीनमधले किंवा रेडी टू इट पदार्थ शक्यतो खाऊ नका.

साधं वरण-भात, पिठलं-भात, मूगडाळीची भाज्या घालून खिचडी, कुकरला झटपट केलेली उसळ, एखाद्या उसळीवर कांदा-कोथिंबीर-चटण्या घालून केलेली झटपट मिसळ, तळलेले मासे आणि पोळी, फिशकरी-भात असे खूप सोपे पर्याय सहज करता येतात जे पोटभरीचे आणि पौष्टिकही आहेत.

स्वयंपाक करणं हे एक आवश्यक काम आहे. वर म्हटलं तसं ते न आवडण्यात काहीच गैर नाही. पण मग ते मदतनीसाकडून तरी करून घ्या. सुदैवानं आपण अशा देशात राहतो की जिथे मदतनीस स्वस्त आहेत आणि सहज मिळतात. नीट नियोजन केलंत तर हे फार सोपं होऊ शकतं. जिथे म्हणजे परदेशात मदतनीस नसतातच तिथे बहुतेकांना कामाचा कंटाळा नसतो कारण सगळं काम स्वतःला करावं लागतं. त्यामुळे तिथे बहुतेकदा स्वयंपाकाचं नियोजन असतंच.

तर मग नियोजन करा आणि स्वयंपाकाचा आनंद घ्या. आवडत नसेल तर मनाविरूद्ध करू नका. पण जे करतात ते बिनडोकपणाचं काम करतात असं सरसकट विधान करू नका!

#किचनमॅनेजमेंट #गृहव्यवस्थापन #स्वयंपाकाचंनियोजन #अन्नहेचपूर्णब्रह्म #homemanagement #kitchenmanagement #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

मटार-सोलाणे-रताळी कबाब

हिवाळ्यात सगळ्याच भाज्या चांगल्या मिळतात. पावसाळ्यात ताज्या मिळाल्या तरी त्यात पाणी, चिखल असतं. पण हिवाळ्यात तसं नसतं. पावसाळा संपलेला असतो. हवा चांगली असते त्यामुळे रसरशीत भाज्या मिळतात. मटारचे कोवळे पोपटी ढीग, गुलाबी रसरशीत गाजरं, पिवळीधमक लिंबं, ताज्या गवारीच्या-घेवड्याच्या शेंगा, बिनबियांची सुंदर जांभळ्या रंगाची वांगी असं सगळं दिसलं की काय घेऊ आणि काय नको असं होतं.

काल तसंच झालं, भाजीला गेले आणि भरमसाठ भाजी घेऊन आले. घरात आता आम्ही इनमिन तीन माणसं. शर्वरीला अनेक भाज्या आवडत नाहीत. पण भाज्या बघितल्या की मला राहावत नाही. मटार तर तसेच खूप खाल्ले जातात. त्यामुळे मटार आणलेच होते. त्याचबरोबर सोलाणे किंवा ओले हरभरेही आणले होते. सोलाण्यांची आमटी मला फार आवडते. त्यामुळे ती तर करायचीच होती. पण थोडे जास्त होते. रताळीही आणलेली होती. त्यामुळे या सगळ्यातून काय करता येईल असा विचार करत होते.

रताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.

काल मी भरपूर मटार, थोडे सोलाणे आणि रताळी वापरून हे कबाब केले. अतिशय चवदार झाले होते. आज त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे.

मटार-सोलाणे-रताळ्याचे कबाब

साहित्य – ३ वाट्या ताजे कोवळे मटार, १ वाटी ताजे कोवळे सोलाणे, ३-४ रताळी उकडून किसलेली, ५-६ लसूण पाकळ्या-५-६ कमी तिखट हिरव्या मिरच्या-१ जुडी कोथिंबीर यांचं वाटण, १ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, परतण्यासाठी १ टीस्पून तेल, थोडं तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

कृती –

१) एका कढईत १ टीस्पून तेल गरम करा. त्यात मटार आणि सोलाणे घाला. हलवून झाकण ठेवा आणि ५ मिनिटं वाफवून घ्या.

२) नंतर हे दाणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून अगदी हलकेच फिरवून घ्या. मिश्रण जाडंभरडं राहायला हवं, पेस्ट करायची नाहीये.

३) एका टोपल्यात हे मिश्रण, रताळ्याचा कीस, लसूण-मिरची-कोथिंबिरीचं वाटण, तिखट-मीठ-हळद आणि तीळ घाला.

IMG_20180109_161445

४) हे मिश्रण छान मळून घ्या. रताळ्यामुळे उत्तम बाइंडिंग होतं.

५) नंतर हातावर थापून लहान लहान गोल टिक्क्या किंवा कबाब करा.

६) नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घालून मंद आचेवर खमंग लाल होऊ द्या.  चटपटीत पुदिना चटणीबरोबर खा.

IMG_20180109_161954

इतक्या साहित्यात ४ लोकांसाठी कबाब होतात. साधारण लहान आकाराचे ३० कबाब होतील.

पुदिना चटणी – जितका पुदिना तितकीच कोथिंबीर घ्या. त्यात आवडीनुसार हिरव्या मिरच्या घाला. मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक वाटा.

मी काल या कबाबांबरोबर क्रीम ऑफ टोमॅटो सूप केलं होतं. कबाब-चटणी आणि सूप हे उत्तम जेवण झालं. अजून पोटभरीचं करायचं असेल तर ब्रेडच्या स्लाइसला थोडं लोणी लावून खमंग भाजा. दोन स्लाइसमध्ये हे कबाब आणि कांद्याच्या रिंग्ज घाला. पुदिना चटणीबरोबर खा. उत्तम लागेल.

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #मुंबईमसाला #healthiswealth #healthyliving #healthyeating #simplerecipe #healthyrecipe #mumbaimasala

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

प्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक

प्रवास करताना अनेकांना एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे प्रवासात खायला मिळणारे वेगळे पदार्थ. काही लोक तर केवळ वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची ओळख करून घेण्यासाठी प्रवास करत असतात. पण प्रवासात काही लोकांची खाण्याची अडचण होते. विशेषतः कुणी जर शाकाहारी असेल तर परदेशात फिरताना अशा लोकांची अडचण होऊ शकते. ब-याच देशांमध्ये शाकाहारी जेवणाची संकल्पनाच नसते, मग अशा ठिकाणी शाकाहारी लोकांची पंचाईत होते.

२०१३ मध्ये आम्ही दहाजण स्पेनला गेलो होतो. त्यातल्या आम्ही दोघीजणी शाकाहारी होतो. पण काही ठिकाणी शाकाहारी म्हणजे काय हे हॉटेलमध्ये समजावून सांगताना नाकी नऊ आले होते.

अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मानसी विजया हिनं मला इनबॉक्समध्ये याबद्दलच कळवलं आहे. मानसीचं कुटुंब दाक्षिणात्य असून शाकाहारी आहे. ती आणि तिचे कुटुंबीय मे महिन्यात युरोपला जाणार आहेत. तर या प्रवासात सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर खायला काय नेता येईल तसंच जर बरोबर इलेक्ट्रिक कुकर असेल तर हॉटेल रूममध्ये काय काय करता येईल याबद्दल लिहाल का असं मानसीनं मला विचारलं आहे. तेव्हा आजची पोस्ट खास मानसीसाठी.

युरोपमध्ये मेमध्येही ब-यापैकी थंड वातावरण असतं. शिवाय तिथे आपल्याइतके बॅक्टेरिया नसल्यानं पदार्थ लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे इथे तुम्हाला बरेच पदार्थ नेता येतील. मानसीची ट्रिप आहे दहा दिवसांची. तिला सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर नेलेले पदार्थ खाता येतील. हे पदार्थ कुठले असू शकतात?

पहिल्या दिवशी खायला बरोबर जरा जास्त तेल लावून खमंग भाजलेले मेथी पराठे आणि रव्याचा सुकामेवा घालून केलेला, साजूक तूप घातलेला शिरा नेता येईल. दुस-या दिवशी खायला तिखटमिठाच्या किंवा साध्या ओवा-मिरं घालून केलेल्या पु-या नेता येतील. बरोबर सुक्या चटण्या, लोणचं असलं की एका वेळचं व्यवस्थित जेवण होऊ शकेल. या पु-या २-३ दिवस सहज टिकतात. त्यामुळे त्या किंवा पराठे परत तिस-या दिवशीही खाता येतील. शिराही २ दिवस नक्कीच टिकतो, त्यामुळे तोही खाता येईल. अशा प्रवासात बरोबर दाण्याची, तिळाची, खोब-याची चटणी तसंच एखादं लोणचं ठेवा. हे तुम्ही ब्रेडबरोबरही खाता येईल. शिवाय परदेशात उत्तम लोणी, चीज, जॅम मिळतं. हे सगळं तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता. परदेशात फळं तर खूप सुंदर मिळतात.

बरोबर जर लहानसा इलेक्ट्रिक कुकर नेलात तर काय काय पदार्थ करता येतील?

प्रवासाला निघण्याच्या काही दिवस आधी तांदूळ आणि मूगडाळ समप्रमाणात धुवून घेऊन ती पंचावर टाकून चांगली वाळू द्या. नंतर कढईत मंद आचेवर भाजून घ्या. खूप लाल करू नका पण सळसळीत मोकळं होईल इतकं भाजा. ते थंड झालं की त्यात चवीप्रमाणे मीठ-हळद-जिरेपूड घाला. थोडे मिरेदाणे आणि लवंगा घाला. हे झिप लॉकच्या पिशवीत भरा. ऐनवेळी अडीच-तीनपट पाणी घालून शिजवा.

इलेक्ट्रिक कुकरमध्ये नुसता पुलावही करता येईल. त्यासाठी बासमती तांदूळ धुवून, पंचावर कोरडे करा. नंतर ते तुपावर हलके भाजून घ्या. त्यात रेडीमेड पुलाव मसाला घालून ठेवा. चवीनुसार मीठ घालून ठेवा. इलेक्ट्रिक कुकरला करताना त्यात बाजारातून मटार, गाजरं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या असं घालून शिजवा. उत्तम पुलाव होऊ शकतो.

उपमा हा असाच झटपट करता येण्याजोगा पदार्थ आहे. रवा कोरडा खमंग भाजून घ्या. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मोहरी-हिंग घाला. उडदाची डाळ घालून खमंग लाल करा. त्यात थोडे काजूचे तुकडे घाला. कढीपत्ता घालून तो चुरचुरीत कोरडा तळा. त्यातच जाडसर वाटलेलं आलं-मिरचीचं वाटण घालून चांगलं परता. त्यात रवा घाला. तोही खमंग भाजा. गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ-साखर घाला. हे झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. ऐनवेळी अडीचपट पाणी घालून शिजवा.

असंच शि-याचंही करता येईल. आधी रवा कोरडा भाजून घ्या. साजूक तुपावर काजू, बदाम, बेदाणे घालून परतून घ्या. मग रवा घाला. भाजलं गेलं की बंद करा. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. हे मिश्रण झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. करताना त्यात आवडीनुसार पाणी किंवा दूध आणि चवीनुसार साखर घाला.

नाचणीचं सत्व हे असंच बहुगुणी आणि पोटभरीचं आहे. नाचणीचं सत्व खाद्यपदार्थांच्या कुठल्याही दुकानात विकत मिळतं. हे नाचणीचं सत्व दूध घालून उकळा. त्यात साखर घाला. एक पोटभरीचा पदार्थ तयार होतो. अनेकदा हे सत्व साखर घातलेलंही मिळतं. किंवा जर गोड आवडत नसेल तर नाचणीच्या सत्वात योगर्ट घालूनही खाता येईल.

पिठांच्या दुकानांमध्ये ज्वारीच्या लाह्यांचं पीठ तयार मिळतं. या ज्वारीच्या लाह्यांच्या पिठात साखर आणि दूध घालून फार मस्त लागतं. गोड आवडत नसेल तर दुकानातून प्लेन योगर्ट आणा आणि मीठ घालून खा. फ्लेवर वाढवायला त्यात ताजी फळं घालू शकता.

हे तर झालं की तुम्ही स्वतः काय करून खाऊ शकता. पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहातो तेव्हा बरेचदा त्यात ब्रेकफास्टचा समावेश असतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना अनेक प्रकारची सिरीयल्स (म्युसेली, ओट्स) असतात. त्यात मध आणि फळं तसंच दूध घालून पोटभर खा. शिवाय युरोपमध्ये सुंदर ब्रेड मिळतात. त्या ब्रेडबरोबर उत्तम चीजेसही मिळतात. ती खा. फळांची तर रेलचेल असते. ती फळं खाच. पण एखादं-दुसरं फळं आपल्या हँडबॅगेत कॅरीही करा. म्हणजे ब्रेकफास्टचा प्रश्न सुटतो. गेल्या वर्षी इस्त्रायलला गेलो असताना एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी म्युसेली, योगर्ट, ताजी फळं आणि डेट हनी (खजुराचा मध) असं इतकं सुंदर मिळायचं की मी खरंतर म्युसेली फॅन नाही, पण मलाही त्याची चटक लागली होती.

दुपारी बाहेर फिरताना जर रेस्टॉरंटमध्ये एखादं थिक सूप मागवलंत तर पोटभर होतं. कारण बरोबर ब्रेड किंवा ब्रेडस्टिक्स असतातच. नाहीतर अनेक ठिकाणी पिझ्झा पीसेस मिळतात. ते घेता येतात. अनेक देशांमध्ये, विशेषतः मेडिटेरेनियन देशांमध्ये फळांचे ताजे रस फार सुंदर मिळतात. ते प्याच.

एअर बीएनबीमध्ये राहात असाल तर मग रात्री परतताना तुम्ही बाजारातून हव्या त्या गोष्टी आणून लहानसा स्वयंपाकही करू शकता. नाहीतर मी वर जे झटपट पदार्थांचे पर्याय दिले आहेत तेही करू शकता. भारतात अनेक ठिकाणी आता रेडीमिक्स मिळतात. त्यात फक्त उकळतं पाणी घालून शिजवलं की काम होतं. तसं काही बरोबर कॅरी करू शकता. विशेषतः ज्या देशांमध्ये ऐन थंडीत प्रवास करता तिथे दिवसभर फिरल्यावर पायाचे तुकडे तर पडलेलेच असतात शिवाय थंडीमुळे संध्याकाळी परत जेवायला बाहेर पडावंसं वाटत नाही. तेव्हा असे काही पर्याय असलेले बरे असतात. किंवा म्हटलं तसं परततानाच पूर्वतयारीनं बरोबर काही घेऊन आलात तर मग फारशी तकतक होत नाही.

फक्त एक लक्षात घ्या. शाकाहारी किंवा मांसाहारी असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपल्या या निवडीचा इतरांना त्रास होता कामा नये. त्याचबरोबर आपण जे बघायला जातोय त्यात तिथली खाद्यसंस्कृती हाही एक महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आपल्याला चालतील, रूचतील असे पदार्थ आवर्जून खाऊन बघा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहारी पदार्थ खाऊन बघा. पण शाकाहारी पदार्थांमध्ये जे पर्याय मिळतील ते जरूर चाखून बघा. खुल्या मनानं खाऊन बघा.

प्रवास आपली जीवनदृष्टी समृद्ध करत असतो. तेव्हा प्रवासाला जाताना खुल्या मनानं जा आणि निर्भीडपणे अनुभव घ्या.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#प्रवासतयारी #प्रवासाचीतयारी #प्रवासातलेपदार्थ #सोपाप्रवास #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #अन्नहेचपूर्णब्रह्म #travelspecial #travelrecipes #simplerecipe #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष