दाल माखनी किंवा माह की दाल

तयार दाल माखनी
तयार दाल माखनी

राजम्याप्रमाणेच आपण दाल माखनी किंवा माह की दाल या खास पंजाबी डाळीला अगदी आपलं म्हटलं आहे. पंजाबात थंडीमुळे असावं पण एकूणच पौष्टिक पदार्थ खाण्यावर खूप भर असतो. म्हणजे आपण ज्या डाळी किंवा कडधान्य पचायला जड असतात असं म्हणतो असे प्रथिनयुक्त पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणात असतात. राजमा, माह की दाल, छोले नियमितपणे खाल्ले जातात. बरोबर अर्थातच घी आणि मख्खन यांचा सढळ हातानं केलेला वापर! आणि त्याबरोबर लस्सी हवीच. पण हे पदार्थ खरंच पौष्टिक आणि चविष्ट असतात हेही तितकंच खरं. आज मी माह की दाल किंवा दाल माखनीची रेसिपी शेअर करणार आहे.

 दाल माखनी

साहित्य: १ वाटी अख्खे काळे उडीद, अर्धी वाटी राजमा, २ कांदे अगदी बारीक चिरलेले, ५-६ टोमॅटोचा रस, ५-६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, २ हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, दीड टीस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून लोणी किंवा बटर, नसल्यास तूपही चालेल, २ लवंगा, ३ वेलच्या, १ छोटा दालचिनीचा तुकडा, १-२ टेबलस्पून साय, १ लहान कप दूध, मीठ चवीनुसार

कृती:

 1) दाल माखनी करायच्या आदल्या रात्री राजमा आणि काळे उडीद स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत घाला. सकाळी उपसून त्यात साधारणपणे २ कप पाणी आणि अर्धा टीस्पून मीठ घालून एकत्र शिजायला लावा.
2) २ शिट्या करून किमान अर्धा तास मंद आचेवर शिजवा. अगदी मऊ शिजायला हवं. नंतर हे मिश्रण मॅशरनं किंवा रवीनं अगदी एकजीव घोटून घ्या.
3) एका कढईत लोणी गरम करा. त्यात लवंगा, वेलच्या आणि दालचिनी घाला.
4) त्यात चिरलेला कांदा आणि मिरची घाला. कांदा लाल होईपर्यंत परता.
5) लसूण आणि आलं मिक्सरमधे एकत्र वाटून त्यात घाला.
6) चांगलं परतून त्यात टोमॅटोचा रस घाला. टोमॅटो चांगला शिजू द्या.
टोमॅटोचा रस चांगला शिजल्यावर मग शिजलेलं मिश्रण घाला
टोमॅटोचा रस चांगला शिजल्यावर मग शिजलेलं मिश्रण घाला
7) नंतर त्यात लाल तिखट घालून परता
8) आता त्यात शिजलेलं राजमा आणि काळ्या उडदाचं मिश्रण घाला.
9) चांगलं हलवा. थोडं पाणी घाला. पण बेतानंच घाला कारण दाल माखनी घट्टच असते.
10) उकळी आली की त्यात साय घोटून घाला तसंच दूध घाला. मीठ घाला आणि अतिशय मंद आचेवर पंधरा मिनिटं शिजू द्या.
उकळी आल्यावर घोटलेली साय तसंच दूध घाला
उकळी आल्यावर घोटलेली साय तसंच दूध घाला
तयार दाल माखनी किंवा माह की दाल जाडसर गरम पराठा, लोणचं आणि कांद्याबरोबर खा. किंवा गरम भाताबरोबर खा. अप्रतिम लागते!

One thought on “दाल माखनी किंवा माह की दाल

Leave a comment