गोकुळाष्टमीच्या दुस-या दिवशी मुंबईत अर्थातच दहीहंडीची धूम असते. बाकीच्या गावांमधेही दहीहंडी होते पण तिचं मुंबईइतकं प्रस्थ कुठेच नसतं. श्रावणात मला माझ्या मूळ गावाची बीडची खूप आठवण येते. माझी आजी गोकुळाष्टमीच्या दिवशी मोठ्या पाटावर ओल्या चिकणमातीनं गोकुळ उभं करायची. अर्थातच आम्ही तिच्या हाताखाली असायचोच. मोठ्या पाटाला आधी मातीचं कुंपण करायचं. मग त्यात वसुदेवाची कृष्णाला नदी पार करून गोकुळात घेऊन जातानाची मूर्ती, कृष्णाच्या देवकी आणि यशोदा या दोन आया, कालियामर्दनाची प्रतिकृती, बलराम, सुदामा हे कृष्णाचे दोघे जीवलग, रुक्मिणी ही कृष्णाची आवडती बायको आणि राधा ही सखी, कृष्णाच्या जीवावर उठलेले कंस आणि पुतनामावशी या सगळ्यांचा समावेश असायचा. आणि अर्थातच कृष्णाचा पाळणाही असायचा. ओल्या मातीतून आजी हे सगळं इतकं छान साकारायची की बस.
गोकुळाष्टमीचा प्रसाद म्हणून अर्थातच गोपाळकाला किंवा दहीकाला केला जायचा. खरं सांगायचं तर मी कित्येक वर्षं गोपाळकाला केला नव्हता. कारण मी गोकुळाष्टमी साजरी करतच नाही. पण आपला एक पारंपरिक पदार्थ म्हणून मला गोपाळकाला खायला आवडतो. आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी म्हणून मी माझी मैत्रीण मन्ना (मनीषा मुंडले) हिला त्याची रेसिपी विचारली कारण तिच्या आईकडे दरवर्षी गोपाळकाला करतात. त्या रेसिपीनं आज मीही काला करून बघितला. तेव्हा आज ही रेसिपी तुमच्यासाठी.
गोपाळकाला किंवा दहीकाला

गोपाळकाल्याला खरंतर साहित्य मोजून घ्यायचं नसतं. ते आपापल्या आवडीप्रमाणे घ्यायचं असतं. मन्नानंही मला फक्त काय काय घालतात ते सांगितलं. मी माझ्या अंदाजानं काला केला. पण जे अगदीच नवशिके आहेत त्यांच्यासाठी मी माझं प्रमाण सांगते आहे.
साहित्य: 3 वाट्या साळीच्या लाह्या, 2 वाट्या ज्वारीच्या लाह्या, अर्धी वाटी चण्याची डाळ, 1 पेरू, 1 काकडी, 2 वेलची केळी किंवा 1 साधं केळं, 2-3 कमी तिखट हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, 1 टेबलस्पून गोड लोणचं (बेेडेकरांचं रसलिंबू वापरा, नसेल तर कुठलंही लिंबाचं गोड लोणचं) , 1 टेबलस्पून तिखट लोणचं, दही लागेल तसं ( दहीभातासारखंच करायचं आहे तेव्हा त्या प्रमाणात दही घ्या), फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, मीठ आणि साखर चवीनुसार
कृती:
1) काला करण्याआधी 2 तास चण्याची डाळ भिजवून ठेवा. दोन्ही लाह्या गॅसवर किंचित भाजून घ्या. नंतर आपल्याला त्या दह्यातच कालवायच्या आहेत पण तशाच वापरल्या तर मग त्या चिवट लागतात म्हणून भाजा.
2) काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. केळीही बारीक चिरा. पेरू जाड किसणीनं किसून घ्या (चिरला तरी चालेल पण बिया तोंडात येतात म्हणून मी किसते.)
3) काला करण्यासाठी एका मोठ्या टोपल्यात दोन्ही लाह्या, चिरलेलं साहित्य, गोड आणि तिखट लोणचं, लागेल तसं दही, साखर, मीठ असं सगळं घाला. नीट कालवून घ्या.
4) वरून हिंग मोहरीची खमंग फोडणी घाला.
5) गोपाळकाला तयार आहे.
मन्ना यात पेअर आणि सफरचंदही घालते. तुम्ही तेही घालू शकता. फोडणी नाही घातली तरी चालू शकतं पण फोडणीनं स्वाद वाढतो.