श्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतात आणि म्हणूनच तिथल्या खाद्यसंस्कृतीत नारळाचं महत्व अनन्यसाधारण आहेच. म्हणूनच आजच्या या पौर्णिमेला नारळी भात करण्याची प्रथा आहे. तेव्हा आजची रेसिपी आहे नारळी भात. माझी ही रेसिपी आहे झटपट होणारी, तेव्हा नक्की करून बघा आणि कळवा.
नारळी भात

साहित्य: 1 वाटी बासमती तांदूळ, पाऊण वाटी खोवलेला नारळ, आवडीनुसार अर्धा ते पाऊण वाटी किसलेला गूळ (अर्धी वाटी घातलात तर भात अगदी बेताचा गोड होतो.), 1 टेबलस्पून साजुक तूप, 4 लवंगा, 4 वेलच्या, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, पाव टीस्पून जायफळाची पूड, पाव टीस्पून मीठ, केशराच्या 7-8 काड्या, अर्धी वाटी काजू तुकडा

कृती:
1) प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा.
2) एका लहान कुकरमध्ये तूप गरम करा. तूप चांगलं गरम झालं की त्यात लवंगा, वेलच्या आणि दालचिनी घाला.
3) आता त्यात निथळलेले तांदूळ घालून चांगलं परता.
4) त्यात किसलेला गूळ, खोवलेलं खोबरं, मीठ, जायफळ पूड, काजू तुकडा, केशराच्या काड्या घाला. सगळं नीट मिसळून घ्या.

5) गूळ विरघळला की त्यात दीड वाटी पाणी घाला आणि कुकरचं झाकण शिटीसकट लावा. दोन शिट्यांमधे किंवा मंद गॅसवर दहा मिनिटांत भात शिजतो.
या भातात काही जण पिवळा रंग घालतात. पण मला स्वतःला पदार्थांमधे रंग वापरायला आवडत नाही म्हणून मी घालत नाही. हवा असल्यास घाला.
गुळाऐवजी साखरही वापरता येईल, पण गुळामुळे भात खमंग होतो.
एवढा भात साधारणपणे चार जणांना पुरेसा होतो.
Very beautiful article, well explained!
LikeLike