हल्ली भारतात निदान मोठ्या शहरांमधे तरी ब्रेडचे विविध प्रकार सर्रास मिळतात. सँडविच हा एक असा पदार्थ आहे की तुम्ही तो असंख्य पध्दतीनं करू शकता. म्हणजे सँडविच करताना तुम्ही ब्रेडचे वेगवेगळे प्रकार वापरू शकता, जसे की पांढरा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, वेगवेगळे हर्ब्ज घातलेला ब्रेड, वेगवेगळ्या मिश्र धान्यांचा ब्रेड, बागेत (Baguette), फोकाचिया, सार डो (Sour dough) ब्रेड, राय (Rye) ब्रेड. शिवाय सँडविचचं सारण करतानाही तुम्ही आपल्याला हवं ते साहित्य, हवे ते मसाले वापरू शकता. कधी पुदिना चटणी, काकडी-टोमॅटोसारख्या भाज्या वापरून तर कधी पनीर-कॉर्न-सिमला मिरचीची भाजी करून, तर कधी उकडलेलं चिकन किंवा उकडलेली अंडी किंवा तयार ऑम्लेट वापरूनही तुम्ही सँडविच करू शकता. किंवा कधी नुसतंच लोणी-चीज-काकडी-टोमॅटो घालून करू शकता किंवा कधी घरातल्या कोरड्या चटण्या, लोणच्याचा खार वापरून, घरातल्या उरलेल्या भाज्या-उसळी वापरूनही सँडविचेस सहज करता येतील. जसं की, उकडलेल्या बटाट्याची भाजी उरली असेल तर त्यात लसूण-मिरची वाटून घाला, त्यात मीठ-मिरपूड घाला, जरासं चीज मिसळा, चीज नको असेल तर पनीर कुस्करून घाला. मस्त चवीचं सारण तयार होईल. मग असे प्रयोग करा आणि आपल्याला हव्या त्या चवीचं सँडविच बनवा, साधं खा किंवा टोस्ट करा. मी आज जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे साध्या व्हेज सँडविचची आणि त्यासोबत खाता येईल अशा दह्याच्या डिपची.
1) पुदिना, कोथिंबीर स्वच्छ धुवून जरा कोरडं होऊ द्यावं.
2) मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, कांदा, लिंबाचा रस, साखर, मीठ घालून बारीक वाटून घ्यावं. तयार पुदिना चटणी
डिपची कृती:
1) एका स्वच्छ पंचात घालून दही चाळणीत ठेवावं. साधारणपणे पाऊण तासात पुरेसं पाणी निथळेल.
2) नंतर तो चक्का एका भांड्यात काढावा. त्यात लसूण-मिरची वाटून घालावं.
3) मीठ-मिरपूड आणि चिरलेली सिमला मिरची घालून हलक्या हातानं मिसळून घ्यावं. तयार दह्याचं डिप
सँडविचची कृती:
1) काकडी, टोमॅटो, बटाटा यांच्या पातळ चकत्या कराव्यात. हवं असल्यास गाजरही किसून घ्यावं.
2) प्रथम ब्रेडला पुदिना चटणी लावावी.
3) नंतर त्यावर अनुक्रमे काकडीच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या, किसलेलं चीज, किसलेलं गाजर, बटाट्याचे काप, तयार सँडविच मसाला किंवा मीठ-मिरपूड घालावं.
4) वर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार आहे.
5) हवं असल्यास हेच सँडविच तुम्ही टोस्टरमधे टोस्ट करू शकता.
6) सँडविच तयार झाल्यावर बरोबर दह्याचं डिप, पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर खावं.
दह्याच्या या डिपबरोबर बटाटा चिप्स, सेलरी स्टिक्स, काकडी, गाजराचे लांब काप अप्रतिम लागतात. शिवाय हे डिप तुम्ही सँडविच स्प्रेड म्हणूनही वापरू शकता. या डिपमध्ये हवं असल्यास कांदा बारीक चिरून घालू शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, शेपू किंवा पार्सले घालू शकता. किंवा आपल्या आवडीनुसार कुठलेही हर्ब्ज घालू शकता. हे डिप पराठ्यांबरोबरही छान लागतं.