खरंतर आपल्याकडे उसळी पोळीबरोबर खातात. पण मला स्वतःला जरा रसदार उसळी भाताबरोबर खायला आवडतात. पंजाब्यांचं राजमा-चावल हे असंच एक अप्रतिम काँबिनेशन आहे. भरपूर टोमॅटो वापरून केलेला रसदार राजमा आणि वाफाळता भात! वा! खास पंजाबी पध्दतीनं राजमा करतात तेव्हा तो बरेचदा तुपाच्या फोडणीत करतात. पंजाबी पदार्थ असल्यामुळे अर्थातच आलं-लसूण हवंच आणि थोडा खडा गरम मसालाही. मात्र आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे पंजाबीच पण त्यात गरम मसाला आणि लसूण वापरलेला नाही. साध्या मसाल्यांमधे केलेला हा राजमा पोळीबरोबर आणि भाताबरोबरही अप्रतिम लागतो. माझी साहित्य सहवासातलीच एक मैत्रीण मैथिली सोधी हिची ही रेसिपी आहे. मुख्य म्हणजे मैथिली मूळची तामिळ आहे त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थ तर सुंदर करतेच ती, पण नवरा पंजाबी असल्यानं पंजाबी पदार्थही फार सुरेख करते. तेव्हा आजची रेसिपी राजमा.
राजमा

साहित्य: 1 वाटी लाल बारीक राजमा, 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून, 4-5 टोमॅटोंचा रस, 2 इंच आलं लांबट पातळ काप केलेलं, 1 टेबलस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, दीड टीस्पून लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, मीठ चवीनुसार
कृती:
1) सकाळी राजमा करायचा असेल तर आदल्या रात्री राजमा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी राजमा उपसून घ्या.
2) आल्याची सालं काढून ते अगदी पातळ लांब चिरा ( साधारण जाड किसणीनं किसल्यावर कसं दिसेल तितके पातळ काप करा. )
3) कुकरच्या भांड्यात राजमा, आलं आणि अर्धा टीस्पून मीठ आणि 3 वाट्या पाणी घालून राजमा शिजायला लावा.

4) साधारणपणे दोन शिट्या करून 15-20 मिनिटं मंद गॅसवर राजमा शिजू द्या.
5) शिजल्यावर राजमा बाजुला काढून ठेवा, त्यातलं पाणी तसंच असू द्या. राजमा अगदी मऊ शिजायला हवा.
6) आता एका कढईत तेल गरम करा. तेल तापलं की त्यात जिरं घालून तडतडू द्या.
7) नंतर त्यात कांदा घालून लाल रंग येईपर्यंत कांदा परता. त्यात टोमॅटोचा रस घाला आणि मंद आचेवर टोमॅटो चांगला शिजू द्या. टोमॅटोचा कच्चा वास राहता कामा नये.
8) नंतर त्यात धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगलं परता. हवा असल्यास चिमूटभर गरम मसाला घाला.

9) मसाला चांगला झाला की त्यात शिजवलेला राजमा पाण्यासकट घाला. मंद आचेवर चांगली उकळी येऊ द्या. या राजम्याला चांगला रस हवा. उकळल्यावर गॅस बंद करा.
तयार राजमा गरम साध्या भाताबरोबर द्या.
एवढा राजमा 4 जणांना पुरेसा होतो.