पावसाळा सुरू झाला की पालेभाज्या फारशा मिळतही नाहीत आणि त्या कराव्याशाही वाटत नाहीत. मग त्याच त्याच फळभाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी कडधान्यांचा मोठा आधार असतो. साधारणपणे उसळी सगळ्यांना आवडतात. हवं तर मसालेदार रस्सा करा किंवा साध्या फोडणीच्या करा, कडधान्यांना आपली स्वतःची अशी खास चव असते त्यामुळे ती चवदारच लागतात. मसूर, मूग, मटकी, चणे, चवळी या खास महाराष्ट्रीय उसळी. शिवाय आपण छोले आणि राजमा या खास पंजाबी कडधान्यांनाही आपलंसं करून घेतलंच आहे. आजकाल मिश्र कडधान्यंही मिळतात, त्यामुळे मिश्र उसळीही करता येतातच.
उसळींना बरेच लोक आलं-लसूण घालतात किंवा कांदा खोब-याचं वाटण लावतात. काहीजण गरम मसाला घालतात तर काहीजण साध्या हिंग मोहरीच्या फोडणीवर काळा/गोडा मसाला आणि गूळ घालून करतात. थोडक्यात काय तर आपण घालू तो मसाला लेऊन कडधान्यं आपल्याला हवी ती चव देतात बापडी! पण जेवणाला मजा आणतात हेही खरंच. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे तुरीच्या दाण्यांच्या उसळीची.
तुरीच्या दाण्यांची उसळ

साहित्य: एक वाटी तुरीचे वाळवलेले दाणे, 2 कांदे, एक टोमॅटो, एक टेबलस्पून सुकं खोबरं, एक छोटी जुडी कोथिंबीर, एक टीस्पून तिखट, दीड ते दोन टीस्पून काळा/ गोडा मसाला, दोन टीस्पून तेल, पाव टीस्पून हळद, फोडणीसाठी मोहरी, हिंग, मीठ चवीनुसार
कृती:
1) तुरीचे दाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवावेत. सकाळी उपसून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून ठेवावेत.
2) 2 कांदे डायरेक्ट गॅसवर खमंग भाजून घ्यावेत.
3) मिक्सरमध्ये भाजलेले कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि सुकं खोबरं घालून बारीक वाटण करावं.
4) लहान कुकरमधे तेलाची नेहमीसारखी फोडणी करावी. अनुक्रमे मोहरी, हिंग, हळद घालावी.
5) नंतर त्यात वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतावं. त्यात तुरीचे दाणे घालावेत. तिखट, मीठ, काळा मसाला घालावा.
6) साधारणपणे एक कप पाणी घालून शिटीसकट कुकरचं झाकण लावावं. प्रेशर आल्यावर दहा मिनिटांत किंवा चार शिट्यांमधे उसळ शिजते.
रस्सा जितका हवा तितकं पाण्याचं प्रमाण कमी-जास्त करावं.
आवडीप्रमाणे गूळ घालायचा असेल तर घालू शकता.
आलं-लसूण आवडत असेल तर 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं वाटणात घालू शकता, मला सगळ्या पदार्थात आवडत नाही त्यामुळे मी घालत नाही.
मी ब-याच भाज्या आणि उसळी डायरेक्ट कुकरला शिजवते, त्यामुळे अतिशय कमी तेलात पदार्थ होतो. कढईत करायची असेल तर तेलाचं प्रमाण वाढवा.
एवढी उसळ साधारणपणे चार जणांना पुरते. याच पध्दतीनं मसूर किंवा चण्याची उसळ करता येते.
मला तुमची रेसीपी खुप आवडतात अशा वेगवेगळ्या रेसीपी पाठवत रहा.
LikeLiked by 1 person