श्रावण सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. सारस्वतांमध्येही ही भाजी करतात पण त्या भाजीला ब्राह्मणी भाजीची सर नाही! पुण्यातल्या लग्नांमधल्या पंक्तिंमधे अळूची भाजी, जिलेबी, मसालेभात, जिलेबीचा पाक घातलेली कोबीची भाजी आणि मठ्ठा असा जो काही बेत असतो ना! अहाहा! माझी मैत्रीण आणि उत्तम अभिनेत्री विभा दीक्षित-देशपांडे हिचाही तिच्या स्वतःच्या लग्नात खास हाच मेन्यू हवा असा आग्रह होता. तेव्हा आजची रेसिपी आहे अळूचं फतफतं ( शब्द फारसा बरा नाहीये पण भाजी उत्तम लागते! ) किंवा अळूची पातळ भाजी.
अळूची पातळ भाजी

साहित्य: दोन जुड्या भाजीचा अळू (साधारण 25-30 मध्यम आकाराची पानं ), पाव वाटी चणा डाळ भिजवलेली, अर्धा वाटी शेंगदाणे भिजवलेले, पाव वाटी काजू तुकडा भिजवलेला, 10-12 ओल्या खोब-याच्या कातळ्या, 2 टेबलस्पून बेसन/ डाळीचं पीठ, 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ, दोन मध्यम लिंबांएवढा गूळ ( गुळाचं प्रमाण चव बघून कमी जास्त करा, ही भाजी गोडसरच असते.), फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, मोहरी, 2 चिमूट हिंग, पाव टीस्पून हळद, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, कढीपत्त्याची 10-12 पानं, 8-10 मेथी दाणे, 1 ते दीड टीस्पून तिखट

कृती:
1) प्रथम अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करावीत.
2) नंतर त्याचे देठ वेगळे करून पानं अगदी बारीक चिरून घ्यावीत. नंतर देठ सोलून तेही अगदी बारीक चिरावेत.
3) कुकरमध्ये भाजी आणि देठ एकत्र करून शिजायला लावावेत. बरोबर दुस-या भांड्यात भिजवलेले शेंगदाणे शिजायला लावावेत.
4) चणा डाळ गॅसवर वेगळी शिजवून घ्यावी म्हणजे तिचा लगदा होणार नाही. काजु तुकडाही वेगळा शिजवून घ्यावा. कुकरच्या दोन शिट्यांमध्ये भाजी शिजते.
5) शिजलेली भाजी एका पातेल्यात काढून घोटून घ्यावी. त्यात साधारण दीड ते दोन वाट्या पाणी घालून भाजी पळीवाढी करून घ्यावी.
6) त्यात बेसन, चिंचेचा कोळ, गूळ घालून चांगलं हलवून घ्यावं.
7) भाजी एकजीव झाली की त्यात शिजलेले शेंगदाणे, चण्याची डाळ, काजुचे तुकडे आणि खोब-याच्या कातळ्या घालाव्यात. भाजी गॅसवर उकळायला ठेवावी.
8) एका छोट्या कढईत फोडणीसाठी तेल घालावं. तेल गरम झाल्यावर मोहरी घालावी, ती तडतडली की त्यात अनुक्रमे मेथीदाणे, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, हळद आणि तिखट घालावं.
9) भाजीवर वरून ही फोडणी घालावी. भाजीला एक उकळी आली की गॅस बंद करावा.
अळूची ही आंबटगोड पातळ भाजी गरमागरम साध्या भाताबरोबर खावी. अर्थातच वरून साजूक तूप घालावंच! चव असून वाढेल.
Super like your blog….beautifully done…. Recipes n photos look so good…btw I like to add ambat chuka to my bhaji just like aai does..
LikeLike