मी लहानपणी मराठवाड्यातल्या ज्या बीड या गावी वाढले, त्याची लोकसंख्या त्यावेळी फारतर 60 ते 70 हजार इतकी होती. मी आता ज्या वांद्रे पूर्व भागात राहते त्याची लोकसंख्याही याहून जास्त आहे. आमचं बीड तेव्हा फार टुमदार, छोटंसं असं गाव होतं. किंवा कदाचित आपल्या लहानपणीच्या आठवणी आपल्यासाठी सगळ्यात सुखद आठवणी असतात म्हणून असेल, पण मला तरी तेव्हा ते तसं वाटायचं. लहान गाव असल्यानं अर्थातच बहुतेक सगळे लोक एकमेकांना ओळखायचे. आमचं घर तसं गावाबाहेरच होतं. वीस हजार स्क्वेअर फुटांच्या भल्यामोठ्या प्लॉटवर आमचं घर होतं. मागे पुढे मोठ्ठं अंगण आणि मागच्या आवारात मोठ्ठी बाग. आसपासचे सगळे लोक आमच्या बागेतून अळू, कढीपत्ता आणि त-हत-हेची फुलं न्यायला यायचे. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे श्रावण लागला आहे. आणि श्रावण लागला की मला अपरिहार्यपणे बीडची आठवण येते. श्रावणात आमच्या बागेतून दुर्वा आणि आघाडा न्यायला किती तरी लोक यायचे. समोरच्या अंगणातल्या मोठ्या गुलमोहराच्या झाडाला झोका बांधलेला असायचा. त्यावर उंचचउंच झोके घ्यायला आम्हा तिघींच्या मैत्रिणी यायच्या.
श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी आमच्याकडे, म्हणजे माझ्या माहेरी ज्येष्ठा ही मोठी महालक्ष्मी बसते. आम्ही मूळचे कर्नाटकातले. आमच्याकडे उभ्या महालक्ष्म्या नाहीत तशाच मुखवट्याच्याही नाहीत. आमच्याकडे छोट्या गडूवर ( छोटा तांब्या) फुलपात्र ठेवून महालक्ष्मी बसवतात. आमच्याकडे महालक्ष्म्या लिहितात. म्हणजे शाई. चुना, हळद-कुंकू वापरून महालक्ष्मीचा चेहरा फुलपात्रावर रंगवतात. माझी आजी हे सगळं करायची, महालक्ष्मी लिहायला ती माझी मदत घ्यायची. दुसरी महालक्ष्मी गणपतीत महालक्ष्म्या बसतात त्या दिवशी बसते आमच्याकडे. महालक्ष्म्या जेवतात त्या दिवशी आजी पुरणपोळी, 4-5 प्रकारच्या भाज्या, पंचामृत, मेतकूट, कोशिंबीर, कटाची आमटी, साधं वरण-भात, भजी असा मस्त स्वयंपाक करायची. पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी साजुक तूप छोट्या वाटीतून द्यायची. माझ्या डोळ्यासमोर अजूनही आजीनं वाढलेलं ते ताट आहे. आजी जेवताना पुरणाच्या दिव्यांनी आम्हाला ओवाळायची. एक गंमतीची गोष्ट म्हणजे तेव्हा माझे काका नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी होते. ते दरवेळेला महालक्ष्म्यांना येऊ शकायचे नाहीत. मग आम्ही जेवायला बसलो की आजी माझ्या बाबांना, काकांची नोकरी असलेलं गाव कुठल्या दिशेला आहे ते विचारायची आणि त्या दिशेला ओवाळायची!
म्हणून अजिबात धार्मिक नसले, काहीही मानत नसले तरी श्रावण आला की आजी-आजोबांची आठवण अपरिहार्यपणे मनात येतेच आणि त्याबरोबरच या सगळ्या गोष्टींचीही