उकडशेंगोळे

काल भुरक्याच्या रेसिपीमध्ये मी उकडशेंगोळ्यांचा उल्लेख केला होता. महाराष्ट्राच्या ब-याचशा भागात वेगवेगळ्या प्रकारची शेंगोळी केली जातात. काही भागात गोड शेंगोळीही केली जातात. कोकणातला खाजं किंवा मराठवाड्यातला गट्गीळं नावाचा प्रकारही शेंगोळ्यांचा गोड प्रकारच. कणकेची शेंगोळी करून ती गुळाच्या पाकात टाकली जातात.

उकडशेंगोळे हा मात्र वन डिश मीलचा एक झणझणीत प्रकार आहे. पावसाळी हवेत रात्रीच्या जेवणात हा प्रकार केला तर सूपही नको आणि इतर काही पदार्थही नकोत!

उकडशेंगोळे

तयार उकडशेंगोळे
तयार उकडशेंगोळे


साहित्य: दोन वाट्या ज्वारीचं पीठ, एक वाटी कणीक, पाऊण वाटी डाळीचं पीठ (बेसन), हळद, तिखट, मीठ चवीनुसार, चिमूटभर हिंग, जि-याची पूड १ टीस्पून, अर्धा टीस्पून अख्खं जिरं, १५-२० लसूण पाकळ्या, मोहरी, तेल, पाणी

कृती: 1) ज्वारीचं पीठ, कणीक आणि बेसन एकत्र करून घ्या. त्यात चवीनुसार तिखट, मीठ घाला. हळद, हिंग, जि-याची पूड, जिरं घालून पीठ भाकरीच्या पिठाइतकं सैल भिजवा.

पिठं एकत्र करून भिजवा
पिठं एकत्र करून भिजवा

2) भिजवलेल्या पिठाची वळकटी करून तिला शेंगोळ्याचा आकार द्या. अशी सगळी शेंगोळी करून घ्या.

अशा आकाराची शेंगोळी करून घ्या
अशा आकाराची शेंगोळी करून घ्या

3) पातेल्यात तेल कडकडीत गरम करा. नेहमीपेक्षा थोडी जास्त मोहरी घाला.

4) मोहरी तडतडली की त्यात ठेचलेला भरपूर लसूण घाला. त्यावर लगेचच हळद आणि थोडं लाल तिखट घाला. आणि त्यावर साधारण एक लिटर पाणी ओता. फोडणी खमंग झाली पाहिजे पण जळता कामा नये.

5) पाण्याला चांगली उकळी आली की त्यात तयार शेंगोळ्यांपैकी ४-५ शेंगोळी मोडून पाण्यात कालवून घाला म्हणजे पाण्याला दाटपणा येईल.

6) नंतर त्यात शेंगोळी घाला. पाण्यात थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार घाला.

7) शेंगोळी शिजली की गॅस बंद करा.

शेंगोळी लहान कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीला घालूनही करता येतात. पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावा आणि मंद गॅसवर ७ ते १० मिनिटं ठेवा.
गरम शेंगोळ्यांवर भुरका घाला, किंवा सुक्या खोब-याची लसणाची चटणी घाला किंवा साजूक तूप घाला आणि खा. शेंगोळ्यांना पाणी शक्यतो जास्त घाला. लसणाच्या स्वादाच्या या सूपसारख्या पाण्याची लज्जत काही औरच असते.
काही लोक उकळताना कोथिंबीरही घालतात पण मी घालत नाही कारण माझी आई घालत नाही. कोथिंबिरीमुळे लसणाचा स्वाद मारला जातो असं ती म्हणते.

7 thoughts on “उकडशेंगोळे

  1. देशावरच्या तुमच्या छान छान रेसिपीज वाचुनच पोट भरते.
    खरच तुम्ही सतत अशा आणि तुमच्या साबांच्या सारस्वत पध्दतीच्या रेसिपीज देत रहा.
    God bless you.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: