कारल्याची चिंच-गुळाची भाजी

मुळा, कंटोळी किंवा कर्टुली, परवर, कारलं एवढंच काय अगदी मेथीही; या भाज्या अशा आहेत की त्यांची चवच आवडावी लागते. या भाज्या खूप आवडणारे नाही तर अजिबात न आवडणारे असेच दोन प्रकार असतात. फ्लॉवर, कोबी किंवा तत्सम भाज्या आवडत नसतील तर निदान चालतात तरी. पण मी वर उल्लेख केलेल्या भाज्यांबद्दल तसं नाही म्हणता येत. मला मात्र या सगळ्या भाज्या अतिशय आवडतात. कारण या भाज्यांना एक वेगळी, खास अशी चव असते. मेथी कडू लागते म्हणून तिचं पाणी काढणं किंवा त्या भाजीत भरपूर गूळ घालून तिची चव मारून टाकणं मला नाही पटत. कारलंही मला फार आवडतं. कारल्याच्या काच-या, कारल्याची बडिशेपेची पूड, धणे पूड, आमचूर घालून केलेली पंजाबी पध्दतीची भाजी किंवा कारल्याची चिंच-गूळ घालून केलेली भाजी मला अतिशय प्रिय आहे. आज मी कारल्याच्या भाजीची रेसिपी देणार आहे. मला माहितीये की ब-याच जणांना कारलं आवडत नाही पण ते आवडणा-यांसाठी आजची ही रेसिपी.

कारल्याची चिंच-गुळाची भाजी

कारल्याची तयार भाजी
कारल्याची तयार भाजी


साहित्य: पाव किलो कारली (हिरवी किंवा पांढरी कुठलीही चालतील), 2 टेबलस्पून दाण्याचं कूट, 2 टेबलस्पून तिळाचं कूट, 1 टेबलस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, 2 टीस्पून काळा मसाला, 1 टीस्पून तिखट, 1 ते दीड टीस्पून चिंचेचा कोळ, साधारण तेवढाच गूळ, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग


कृती:
1) प्रथम एका कारल्याचे साधारणपणे 2 इंचाचा एक असे तुकडे करून घ्या.
2) त्यानंतर आपण मसाला भरून भाज्या करतो तशा चिरा कारल्यांना द्या.
3) आतल्या सगळ्या बिया काढून टाका. अगदी कोवळ्या असतील तर बिया ठेवल्या तरी चालतील.
4) एका पातेल्यात 3-4 कप पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात चिरलेली कारली घाला.
5) कारली अर्धवट शिजेपर्यंत उकळू द्या. अर्धवट शिजल्यावर आणि कारल्यांचा रंग बदलल्यावर कारली पाण्यातून उपसून ठेवा. पूर्ण पाणी निथळू द्या.
6) एका भांड्यात दाण्याचं कूट, तिळाचं कूट, धणे-जिरे पूड, काळा मसाला, लाल तिखट, चिंच-गूळ, हळद आणि मीठ असं सगळं एकत्र करा. नीट मिसळून एकजीव मसाला करा.

तयार मसाला
तयार मसाला


7) निथळलेल्या कारल्यांमधे हा मसाला भरा.

भरलेली कारली
भरलेली कारली


8) एका पॅनमधे किंवा कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात भरलेली कारली घाला.

कारली मंद आचेवर शिजवा
कारली मंद आचेवर शिजवा


9) नीट हलवून झाकण ठेवा. अर्धा कप गरम पाणी घाला.
10) मंद आचेवर मधूनमधून हलवत कारली नीट शिजू द्या. पाणी पूर्ण आटलं पाहिजे. मसाला कारल्यांच्या अंगासरशी रहायला हवा.
कारल्याची भाजी तयार आहे.
मसाल्याचं प्रमाण आपल्याला हवं तसं कमी जास्त करू शकता. ही भाजी जराशी तिखट आणि आंबट-गोड चांगली लागते.

One thought on “कारल्याची चिंच-गुळाची भाजी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: