मला वाटतं भारतात असंख्य प्रकारांनी खिचडी केली जाते. प्रत्येक राज्यात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत खिचडी करतातच. गुजराती लोकांची डाळ खिचडी आणि कढी तर प्रसिध्दच आहे. मारवाड्यांमध्ये घोट्टडी खिचडी (घोटून केलेली आसट खिचडी) करतात. दक्षिणेतला पोंगल हा खिचडीचाच एक प्रकार, शक्रे पोंगल हा खिचडीचा गोड भाऊ किंवा बहिण म्हणा हवं तर! बंगाल्यांमधेही खिचडी करतात. ईशान्य भारताच्या खाद्यसंस्कृतीची मला फारशी माहिती नाही पण तिथेही खिचडीचा एखादा प्रकार नक्की असणारच याची मला खात्री आहे. काश्मिरमधे खिचडीला खेशियर म्हणतात. पंजाबातही खिचडी केली जातेच. मुस्लिम लोक करतात तो खिचडा हाही साधारण सारखाच प्रकार. अर्थात ठिकठिकाणी करण्याची पध्दत वेगळी आणि वापरात येतं ते साहित्यही वेगळं. कधी तूर डाळ, कधी मूग डाळ तर कधी मसूर डाळीचा वापर होतो. मूग डाळीतही काही ठिकाणी सालीची डाळ वापरतात तर काही ठिकाणी बिन सालीची.
महाराष्ट्रातही ब-याच वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली जाते. माझ्या बहिणीच्या मैत्रिणीकडे फोडणीत शेंगदाणे, आलं-लसूण घालून खिचडी करतात, मस्त लागते ती! व-हाडात तूर डाळीची साधी खिचडी करून वरून लसूण-सुक्या लाल मिरचीची फोडणी घेतात. भोगीची खिचडी तर काय अप्रतिमच लागते. मूग डाळ-तांदळाबरोबर, धणे-जिरे पावडर, गोडा मसाला, ओलं खोबरं, कोथिंबीर घालून केलेली ही खिचडी केवळ लाजवाबच! आज मी अशाच एका खिचडीची रेसिपी देणार आहे. ही खिचडी खानदेशी खिचडीचा एक प्रकार आहे. या प्रकाराला खिचडी-तेल असं म्हणतात. या खिचडीवर वरून फोडणी घेऊन खातात. माझी मैत्रीण शैलू कोलते हिची ही रेसिपी आहे. तिखट-झणझणीत आवडणा-यांना हा प्रकार नक्की आवडेल.
खिचडी-तेल

साहित्य: एक वाटी मूग डाळ, एक वाटी तांदूळ ( माझी मैत्रीण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेते पण मी समसमान प्रमाण घेते.) पाव टीस्पून हळद, दोन चिमूट हिंग, एक टीस्पून जिरं, मीठ चवीनुसार
फोडणीसाठी साहित्य: अर्धी ते पाऊण वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, एक मध्यम कांदा बारीक चिरलेला, एक मध्यम बटाटा बारीक चिरलेला, 12-15 लसूण पाकळ्यांचे गोल पातळ तुकडे, 3-4 सुक्या लाल मिरच्या
कृती:
1) डाळ-तांदूळ धुवून घ्या.
2) मध्यम आकाराच्या कुकरमध्ये डाळ-तांदूळ, हळद, हिंग, जिरं आणि मीठ असं सगळं घाला. त्यात 5 वाट्या पाणी घाला. खिचडी फडफडीत आवडत असेल तर चार वाट्या पाणी घाला.
3) आपण नेहमी करतो तशा शिट्या करून खिचडी शिजवून घ्या. मध्यम गॅसवर साधारण दहा मिनिटात खिचडी शिजते.
फोडणीची कृती:
1) एका लहान कढईत तेल घाला. तेल कडकडीत गरम होऊ द्या. गॅस बारीक करा.
2) त्यात मोहरी घालून तडतडू द्या. आता त्यात लसणाचे तुकडे घालून ते लाल होऊ द्या.
3) नंतर त्यात कांदा-बटाट्याच्या फोडी घाला.
4) कांदा-बटाटा शिजला की त्यात हिंग घाला.
5) आपल्या चवीनुसार लाल तिखट आणि मीठ तसंच हळद घाला.
6) शेवटी सुक्या लाल मिरच्या घाला. फोडणीचा गॅस बंद करा.

खिचडी देताना एका बोलमध्ये किंवा ताटात खिचडी घ्या त्यावर ही फोडणी घाला आणि खा. बरोबर उतारा म्हणून थंड ताक किंवा मठ्ठा द्या. ही फोडणी झणझणीतच करायची असते.
ही खिचडी साधारण चार माणसांना पुरते.