माझं माहेर देशस्थ आणि सासर सारस्वत. त्यामुळे दोन्ही घरांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बराच फरक होता. देशस्थ मूळ शाकाहारी तर सारस्वत पक्के मांसाहारी. तरी माझ्या सासुबाई ( विजया राजाध्यक्ष ) या पूर्वाश्रमीच्या कोकणस्थ असल्यानं आमच्या घरी इतर सारस्वतांच्या मानानं शाकाहारी जेवणाचं प्रमाण जास्त होतं. मी शुध्द शाकाहारी आहे. लग्न होईपर्यंत मी मासे कधी बघितलेही नव्हते. माझा नवरा आणि मुली मात्र पृथ्वीतलावरचे माणूस सोडून सर्व चल प्राणी खायला तयार असतात. त्यामुळे हळूहळू मांसाहारी पदार्थ करायला शिकले. माझ्या सासुबाई अतिशय सुंदर मांसाहारी स्वयंपाक करतात. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडून मी सगळे सारस्वती प्रकार करायला शिकले. आज त्यांनीच शिकवलेली तिस-यांच्या आमटीची मांसाहारी रेसिपी मी शेअर करणार आहे.
तिस-यांची (शिंपल्यांची किंवा शिवल्यांची) आमटी

साहित्य: एक वाटा स्वच्छ केलेल्या तिस-या (साधारणपणे अडीच ते तीन वाट्या), खोवलेलं ओलं खोबरं एक ते दीड वाटी, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला बटाटा, पाच-सहा सुक्या बेडगी मिरच्या ( या मिरच्यांमुळे रंग छान येतो आणि त्या फारशा तिखट नसतात ), सात-आठ मिरी दाणे, दीड ते दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टीस्पून हळद, फोडणीसाठी तेल.
तिस-या साफ करण्याची कृती: तिस-या दोन-तीनदा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या कारण त्यांना भरपूर वाळू असते. स्वच्छ झाल्यावर विळीवर हलक्या हाताने त्या उघडून मांस असलेला अर्धा भाग ठेवा आणि रिकामा भाग टाकून द्या. अशा सगळ्या तिस-या साफ करून घ्या.

मसाल्याची कृती: मिक्सरच्या भांड्यात खोबरं, मिरच्या, मिरी दाणे, चिरलेल्या कांद्यापैकी पाव कांदा, हळद आणि तिखट घालून बारीक पेस्ट बनवून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा.

कृती:
1) एका कढईत थोडंस तेल घाला. तेल तापल्यावर त्यात कांदा घालून जरासं परता. कांदा लाल करायचा नाहीये.
2) कांदा परतल्यावर त्यात बटाटा घाला आणि एकदा हलवून साधारण दोन कप पाणी घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
3) बटाटा शिजत आला की त्यात तिस-या घाला.
4) चांगली उकळी आली की वाटलेला मसाला घाला.
5) चिंचेचा कोळ आणि मीठ घालून एक उकळी काढा आणि गॅस बंद करा.
गरम तिस-या गरमागरम साध्या भाताबरोबर द्या.