नाचणी हे जरासं दुर्लक्षित धान्य आहे असं मला नेहमी वाटतं. नाचणीत उच्च प्रतीची पोषणमूल्यं तर असतातच पण त्याचबरोबर नाचणीला स्वतःची अशी एक खास चव असते. आदिवासी भागात नाचणी जास्त प्रमाणात पेरली जाते आणि खाल्लीही जाते. महाराष्ट्रात नाचणीची भाकरी, नाचणीचं सत्व, नाचणीचे पापड केले जातात. तर कर्नाटकात नाचणीचे उंडे करतात जे सांबाराबरोबर खातात. नाचणीचे दोसेही आता ब-याच ठिकाणी मिळतात. मी बाहेर जे नाचणीचे दोसे खाल्ले ते फक्त नाचणीचं पीठ भिजवून केलेले होते. मी मात्र नाचणीच्या पिठाबरोबर उडदाची डाळ वापरून हे दोसे करते. हा पदार्थ नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे आणि चवदारही.
नाचणीचे दोसे

साहित्य: २ वाट्या नाचणीचं पीठ, एक वाटी उडदाची डाळ, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, ३-४ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार, तेल

कृती:
1) संध्याकाळी उडदाची डाळ भिजत घाला.
2) साधारण तीन ते चार तास भिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
3) एका भांड्यात वाटलेली उडदाची डाळ, नाचणीचं पीठ आणि मीठ घालून साधारण दोश्यांसाठी पीठ करतो तितपत पातळ मिश्रण करून आंबवण्यासाठी ठेवा. सकाळी हे पीठ छान फुगून येईल.
4) दोसे करताना त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घाला.
5) तवा गरम करा. त्यावर थोडंसं तेल घालून थोडं पाणी शिंपडा. स्वच्छ कपड्यानं तवा पुसून घ्या. नेहमीचे दोसे घालतो तसे दोसे घाला.
6) बाजुनं थोडंसं तेल सोडा. लाल रंगावर भाजून काढा.
नाचणीचा दोसा नारळाच्या चटणीबरोबर किंवा कुठल्याही कोरड्या चटणीबरोबर अथवा लोण्याबरोबर वाढा.
या पिठाचे साधारण चार माणसांना नाश्त्यासाठी पुरतील एवढे दोसे होतात
खूप छान आहेत रेसिपीजरेसिपीज.
LikeLike
Made Ragi Dosa following your recipe. Dosas were crisp and much better compared to my previous attempts of making ragi dosa. My husband who is a diabetic felt this recipe may be appreciated /acceptable to persons who are new to ragi preparations and not used to the typical ragi taste. Thank you.
LikeLike
Thanks!
LikeLike