शाकाहारी लोकांसाठी दूध हा प्रथिनं पुरवणारा महत्वाचा अन्न घटक आहे. दूध, दही, ताक किंवा पनीर या सगळ्याच पदार्थांमधून प्रथिनांचा चांगला पुरवठा होत असतो. अर्थात ही शाळेत शिकलेली पुस्तकी माहिती झाली. कारण हल्ली आपण जे दूध पितो त्यातून आपल्याला कितपत पोषण मिळतं हा भाग अलाहिदा. पण जेव्हा घरात खूप दूध उरलेलं असेल तेव्हा तुम्ही घरगुती पनीर करून त्याची चवदार भाजी करू शकता. घरात केलेलं पनीर अतिशय उत्तम होतं. शिवाय तुम्ही तुम्हाला हव्या त्या दुधाचं करू शकता. म्हणजे जर तुम्हाला सायीसकट करायचं असेल तर तसं किंवा साय पूर्ण काढून करायचं असेल तर तसंही. साय पूर्ण काढूनही पनीर उत्तम होतं. अर्थात सायीसकट केलेल्या दुधाचं पनीर जास्त चविष्ट होतं हेही खरंच! आज मी घरगुती पनीर घालून केलेल्या एका भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. पनीर घरी करायचं नसेल तर बाहेरूनही आणू शकता. आजची रेसिपी आहे पनीर आणि सिमला मिरचीची भाजी.
पनीर-सिमला मिरची भाजी
पनीरचं साहित्य: 1 लिटर दूध, एका लिंबाचा रस, 1 मोठी वाटी दही
पनीरची कृती:
1) प्रथम एका पातेल्यात दूध उकळायला ठेवावं.
2) दुधाला चांगली उकळी आली की गॅस अगदी बारीक करून त्यात फेटलेलं दही आणि लिंबाचा रस घालावा.
3) दूध पूर्ण फुटून चोथा पाणी वेगळं होईपर्यंत हलवत रहावं. नंतर गॅस बंद करावा.
4) एका लहान बुडाच्या चाळणीत (साधारणपणे कप बशीतली बशी असते त्या व्यासाच्या) स्वच्छ पंचा घालून त्यात फुटलेलं दूध घालावं.
5) पूर्ण पाणी निथळू द्यावं. नंतर पंचात गुंडाळून तसंच चाळणीत दाबून पाणी काढून टाकावं. अर्धा तास तसंच ठेवावं.
पनीर तयार आहे. हे पनीर हवं असल्यास लगेच वापरा किंवा फ्रीजमध्ये दोन दिवस टिकतं. एवढ्या पनीरचे साधारणपणे 2 वाट्या चौकोनी तुकडे होतात.
भाजीचं साहित्य: दोन वाट्या पनीरचे लहान चौकोनी तुकडे, 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून, 4-5 मध्यम टोमॅटोचा रस, 2 सिमला मिरच्या लांब पातळ कापून तुकडे केलेल्या, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, दीड टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून साखर, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा कप दूध, 1 टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार
भाजीची कृती:
1) एका कढईत तूप गरम करा.
2) तूप गरम झाल्यावर त्यात कांदा घालून छान लाल होईपर्यंत परता.
3) नंतर त्यात आलं लसणाची पेस्ट घालून परता.
4) पेस्ट चांगली परतली गेल्यावर त्यात टोमॅटोचा रस आणि सिमला मिरची घाला. मंद गॅसवर झाकण ठेवून सिमला मिरची शिजू द्या. सिमला मिरचीचा फार लगदा करू नका.

5) नंतर त्यात धणे-जिरे पूड, लाल तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला आणि साखर घालून 2 मिनिटं चांगलं परता.
6) आता त्यात पनीरचे तुकडे आणि मीठ घालून नीट हलवून घ्या.
7) नंतर त्यात दूध कोमट करून घाला. 5 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. भाजी तयार आहे.

ही भाजी गरम साध्या फुलक्यांबरोबर किंवा साध्या पराठ्यांबरोबर उत्तम लागते.
एवढी भाजी 4 जणांना पुरते.