नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण. श्रावण सुरू झाला की आजी कहाण्यांच्या पुस्तकातल्या कहाण्या रोज वाचायला लावायची. शुक्रवारची कहाणी, रविवारी आदित्य राणुबाईची कहाणी, जिवतीची कहाणी अशा सगळ्या कहाण्या मी वाचायचे आणि ते ऐकत आजी पूजा करायची. एक आटपाट नगर होतं अशी त्या प्रत्येक कहाणीची सुरूवात असायची. आता आपण काहीच मानत नाही, पण माझी आजी सगळं मानायची. नागपंचमीच्या दिवशी काही चिरायचं नाही, काही भाजायचं नाही असे काही समज होते. त्यामुळे त्या दिवशी ज्या शेंगा मोडता येतात अशा शेंगांची मोडून केलेली भाजी, भरड्याचे (चणा डाळीच्या जाडसर पिठाचे) वडे आणि पुरणाचे दिंड असा स्वयंपाक आमच्या घरी व्हायचा. आज मी त्याच पुरणाच्या दिंडांची रेसिपी देणार आहे. पुरणाचे दिंड मी कित्येक वर्षांत खाल्ले नाहीयेत. पण आज मी किती तरी वर्षांनी ते केले आहेत, तुम्हीही करून पहा.
पुरणाचे दिंड

साहित्य: दीड वाटी हरभरा डाळ (चणा डाळ), दीड वाटी चिरलेला गूळ, अर्धा टीस्पून जायफळ-जायपत्रीची मिश्र पूड, चिमूटभर मीठ, चिमूटभर हळद, एक टीस्पून तेल, पोळ्यांना भिजवतो तशी भिजवलेली कणीक
कृती:
पुरणाची कृती:
1) प्रथम हरभरा डाळ स्वच्छ धुवून एक तास भिजवून ठेवावी.
2) नंतर त्यात दोन वाट्या पाणी, मीठ, हळद आणि तेल घालून ती कुकरला शिजवून घ्यावी. भिजवलेली डाळ साधारण 2-3 शिट्यांमधे शिजते. डाळ शिजल्यावर जर त्यात पाणी राहिलं असेल तर ती चाळणीत उपसून घ्यावी. उरलेल्या पाण्याची कटाची आमटी करता येते.
3) नंतर एका नॉनस्टिक कढईमधे शिजलेली डाळ, गूळ आणि जायफळ-जायपत्रीची पूड एकत्र करून घेऊन पुरणाला चटका देण्यासाठी ते गॅसवर ठेवावं. पुरण हलवत-हलवत कोरडं होऊ द्यावं.
4) पुरण पूर्ण शिजलं आहे की नाही हे पाहण्यासाठी कढईतल्या पुरणामधे उलथनं (कालथा) उभं ठेवावं. ते जर सरळ उभं राहिलं तर पुरण नीट शिजलं आहे असं समजावं आणि गॅस बंद करावा.
5) पुरण जरा कोमट झालं की पुरणयंत्रातून गाळून घ्यावं.
दिंडांची कृती:
1) भिजवलेल्या कणकेचा मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन तो पोळी लाटतो तसा मोठ्या पुरीएवढा लाटावा.
2) त्याच्या मधोमध मोठ्या लिंबाएवढा पुरणाचा गोळा हातावर दाबून चपटा करून ठेवावा.
3) नंतर ती पोळी फोटोमध्ये दाखवली आहे तशी दुमडून त्याची घडी घालावी. असे सगळे दिंड करून घ्यावेत.
4) एका पातेल्यात साधारण एक लिटर पाणी उकळायला ठेवावं. त्या पातेल्यावर बसेल अशी चाळणी ठेवावी.
5) पाण्याला उकळी आली की त्या चाळणीवर दिंड ठेवावेत. त्यावर बसेल असं झाकण ठेवावं आणि दिंड वाफवावेत.12 ते 15 मिनिटांत दिंड तयार होतात.
हे गरम दिंड साजूक तूप घालून खावेत.
एवढ्या साहित्यात मध्यम आकाराचे दहा दिंड होतात. गुळाऐवजी साखरेचंही पुरण करता येतं. प्रमाण तेच घ्यावं. पण गुळाचं पुरण जास्त खमंग आणि चवदार लागतं