श्रावणात शाकाहारी पदार्थांवर भर असतो. त्यातही श्रावणापासून पुढे दिवाळीपर्यंत सतत सण सुरू असतात. आता आपण काही सणांची कर्मकांडं करत नसलो तरी घरात त्यानिमित्तानं गोडधोड होतच असतं. परत त्या त्या सणाला त्या त्या सणाचे पारंपरिक पदार्थ करण्यावर माझा भर असतो कारण त्यामुळेच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपली जाते असं मला वाटतं.
माझी मैत्रीण विद्या स्वामिनाथन हिनं लाल भोपळ्यांच्या घारग्यांची रेसिपी विचारली होती. खरं सांगायचं तर मी घारगे बरेचदा खाल्ले होते पण कधी केले नव्हते. कारण मुळात मला गोड पदार्थ फारसे करता येत नाहीत! आम्ही कॉलनीतल्या मैत्रिणी महिन्यातनं एकदा एकत्र जेवतो. अशाच एका जेवणाला माझ्या सिनियर मैत्रीण उमा भणगे यांनी लाल भोपळ्याचे अतिशय सुंदर घारगे आणले होते, ते मला आठवलं. मग मी त्यांना ही रेसिपी विचारली आणि घारगे करून बघितले. त्यांनी सांगितलेल्या रेसिपीनं घारगे उत्तम झाले. म्हणून आज मी ही रेसिपी शेअर करतेय.
घारग्यांची ही रेसिपी कोकणातली आहे. देशावर लाल भोपळा कुकरला शिजवून त्यात गूळ-वेलची घालून, त्यात कणीक घालून घारगे करतात. पण कोकणातल्या या रेसिपीमध्ये मेथी दाणे, जिरंही घालतात, त्यामुळे घारग्यांना मस्त वेगळा स्वाद येतो. मग तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा.
लाल भोपळ्याचे घारगे

साहित्य: 3 वाट्या लाल भोपळ्याचा किस, 1 वाटी गूळ, दीड टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मेथी दाणे, 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं, पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून मीठ, घारग्याच्या तयार मिश्रणात बसेल तितकी कणीक-तांदळाचं पीठ (साधारणपणे दीड वाटी कणीक असेल तर पाऊण वाटी तांदळाचं पीठ, म्हणजेच कणकेच्या अर्धं तांदळाचं पीठ), खसखस, तळण्यासाठी तेल/ तूप
कृती:
1) प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात भोपळ्याचा किस घाला. किस चांगला वाफवून घ्या.
2) किस अगदी मऊ शिजला की त्यात गूळ घाला. गूळ विरघळू द्या. मिश्रणाला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. त्यात मीठ घाला.
3) ओलं खोबरं, जिरं, मेथी दाणे आणि हळद मिक्सरमधे अगदी बारीक वाटा. मऊ पेस्ट झाली पाहिजे.
4) हे वाटण कोमट झालेल्या भोपळ्याच्या मिश्रणात घाला. नीट मिसळून मिश्रण थंड होऊ द्या.
5) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मावेल तितकं तांदळाचं पीठ आणि कणीक घाला. हे प्रमाण आपल्या अंदाजानंच घ्यावं लागेल. पण साधारणपणे कणकेच्या अर्धं तांदळाचं पीठ असावं.
6) पुरीला भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवावं. पाणी वापरू नये.
7) पोळपाटावर खसखस पसरून घ्या. पुरीला घेतो एवढा उंडा घेऊन तो अनारशाप्रमाणे खसखशीवर थापा किंवा लाटून घ्या.
8) कढईत तेल गरम करून घारगे लाल रंगावर तळून घ्या.