पुलाव, सांबार-भात, दही-भात, मसालेभात, बिर्याणी! भात आणि भाताचे प्रकार! भाताला भारतीय खाद्यसंस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. भारतातल्या कुठल्याही राज्यात जा, त्या त्या राज्याची भाताची वैशिष्ट्यपूर्ण अशी पाककृती आहेच. अगदी महाराष्ट्रीय जेवणाचंच बघा नं, वरण भातानं जेवणाची सुरूवात होते तर दही भातानं अखेर. भातांच्या अशाच अनेक प्रकारांच्या पाककृती मी माझ्या या पेजवर शेअर करणार आहेच.
शिवाय आता श्रावण सुरू होतोय. काही लोक श्रावणापासून चातुर्मासही पाळतात. म्हणजे श्रावण, भाद्रपद, आश्र्विन आणि कार्तिक या चार महिन्यांमधे कांदा, लसूण आणि हो काहीजण वांगीही खात नाहीत. माझी आजी चातुर्मास पाळायची. तिला वांगी फार आवडायची. पण चार महिने वांगी तर खायची नाहीत. मग ती श्रावण सुरू व्हायच्या आधी भरलेली वांगी, वांग्याची साधी भाजी आणि वांगी भात ( ज्याला ती वांगे भात म्हणायची) आवर्जून करायची. मी स्वतः काहीच पाळत नाही पण आजच्या दोन्ही रेसिपीज माझ्या आजीच्या आठवणीसाठी.
यातली पहिली रेसिपी आहे वांगी भाताची. जो माझ्या सासुबाई अतिशय उत्तम करतात. तेव्हा काहीशी त्यांच्या पध्दतीनं, काहीशी माझ्या पध्दतीनं अशी ही वांगी भाताची रेसिपी.
वांगी भात
साहित्य: एक वाटी बासमती तांदूळ, एक मोठा कांदा, एक मध्यम टोमॅटो, १० ते १२ बिनबियांची छोटी कोवळी जांभळी वांगी ( साधारण दीड वाटी फोडी ), फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, चार मिरी दाणे, ३ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, काळा मसाला / गोडा मसाला २ टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, हळद १ टीस्पून, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तीन ते साडेतीन वाट्या पाणी, ओलं खोबरं-कोथिंबीर वरून घालण्यासाठी.
कृती:
1) भात करण्यापूर्वी दोन तास तांदूळ धुवून पाणी संपूर्णपणे काढून टाकून निथळत ठेवावेत.
2) कांदा, टोमॅटो आणि वांग्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात.
3) भात करताना तांदळाला काळा मसाला आणि लाल तिखट चोळून घ्यावं. एकीकडे भातासाठीचं पाणी गरम करत ठेवावं.
4) पातेल्यात फोडणी करावी, मोहरी तडतडल्यावर चिमूटभर हिंग आणि खडा गरम मसाला घालावा.
5) त्यावर कांदा घालून तो गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यात टोमॅटो घालून दोन मिनिटं परतावा.
6) त्यावर वांग्याच्या फोडी घालून हलवून झाकण ठेवावं.
7) वांग्याच्या फोडी अर्धवट शिजल्यानंतर त्यात तांदूळ घालावेत. ते परतून त्यावर परत झाकण घालावं.
8) दोन मिनिटांनी त्यावर आधण आलेलं उकळतं पाणी ओतावं. मीठ घालावं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालावा.
9) मोठ्या आचेवर पाणी आटेपर्यंत भात शिजवावा.
10) पाणी आटत आलं की मग जाड तव्यावर पातेलं ठेवून मंद आचेवर भात मऊ शिजू द्यावा. हा भात मऊ झाला पाहिजे, तो फडफडीत राहता कामा नये.
भात खाताना त्यावर साजूक तूप आणि खोबरं-कोथिंबीर घालावं.
हा भात साधारण तीन-चार लोकांना पुरतो.
आजची दुसरी रेसिपी आहे ती वांग्याच्या कापांची. हा पदार्थ मी सर्वप्रथम माझ्या सासरीच खाल्ला आणि तो आता मला अतिशय प्रिय आहे.
वांग्याचे काप

साहित्य: दोन मोठी जांभळी किंवा पोपटी बिनबियांची वांगी ( भरतासाठी आणतो तशी ), हळद, तिखट, मीठ चवीनुसार, कापांना लावण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा समप्रमाणात मिसळून त्यात चवीनुसार हळद, तिखट, मीठ घालून घ्यावं. आपण वांगी कापल्यावर त्या कापांनाही तिखट-मीठ लावणार आहोत हे लक्षात घेऊन त्या प्रमाणात घालावं. तळण्यासाठी तेल
कृती:
1) प्रथम वांगी स्वच्छ धुवून, कोरडी पुसून त्यांचे साधारण अर्ध्या इंच जाडीचे काप करून घ्यावेत.
2) या कापांना हळद, तिखट आणि मीठ लावून पंधरा मिनिटं बाजुला ठेवावं.

3) काप तळायचे असतील तेव्हा नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल घालून तापू द्यावं.
4) हे काप तयार केलेल्या तांदळाची पिठी आणि रव्याच्या मिश्रणात घोळवून तव्यावर दोन्ही बाजुंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्यावेत.
एवढे काप साधारण चार माणसांना पुरे होतील.
वरण-भात किंवा खिचडी किंवा अगदी कुठल्याही पोळी भाजीबरोबरही हे काप खायला अप्रतिम लागतात.
अशाच प्रकाराने फणस, कच्ची केळी आणि बटाट्याचेही काप करता येतात