बारा-तेरा वर्षांपूर्वी चेन्नईला गेले होते. पाहताक्षणी चेन्नईच्या प्रेमातच पडले होते. लांबचलांब पसरलेला मरीना बीच, थिऑसॉफिकल सोसायटीचा विलक्षण निसर्गरम्य असा सुंदर परिसर, मोगरा, अबोली आणि मरव्याच्या गज-यांचा ढीग, हिगिन बॉथम्स आणि लँडमार्क ही पुस्तकांची दुकानं ( तेव्हा मुंबईत लँडमार्क आलं नव्हतं), चेन्नई ज्यासाठी प्रसिध्द आहे ती रेशमी कांजीवरम साड्यांची दुकानं आणि कितीतरी गोष्टी होत्या. पण जी आठवण अजूनही माझ्या मनात आणि नाकातही पक्की बसली आहे ती म्हणजे चेन्नईच्या रस्त्यांवरून चालताना आजुबाजुला दरवळणारा सांबार आणि कॉफीचा घमघमाट! दक्षिणेत तुम्ही या दोन्ही सुवासांकडे दुर्लक्ष करूच शकत नाही.
मला वाटतं दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती ही भारतातल्या पंजाबी खाद्यसंस्कृतीच्या बरोबरीनं लोकप्रिय खाद्यसंस्कृती आहे. दाक्षिणात्य पदार्थ किती चवीनं आणि आवडीनं खाल्ले जातात हे मुंबईतल्या माटुंगा भागात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळतं. इथल्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये मिळणा-या सांबाराची चव ही त्या त्या रेस्टॉरंटची वेगळी ओळख दर्शवणारी आहे. मद्रास कॅफे, म्हैसूर कॅफे इथं उडुपी सांबार मिळतं तर आर्यभवनमधे खास तामिळ सांबार.
मला स्वतःलाही दक्षिणी पदार्थ अतिशय प्रिय आहेत. सांबार तर विशेष प्रिय. आज मी जी सांबाराची रेसिपी शेअर करणार आहे त्या सांबाराचा मसाला मी माझी जवळची मैत्रीण सोनाली पाध्ये हिच्या आईकडून शिकले आहे. आम्ही कॉलेजमधे असताना बर्वेकाकुंनी केलेलं सांबार म्हणजे माझा जीव की प्राण होता. म्हणून आज ही रेसिपी.
सांबार

सांबार मसाल्यासाठीचं साहित्य: १ टेबलस्पून धणे, १ टीस्पून मेथी दाणे, १ टीस्पून उडीद डाळ, २ टीस्पून सुकं खोबरं, तिखट असतील तर २-३ कमी तिखट असतील तर ४-५ सुक्या लाल मिरच्या (जास्त मसाला एकदम करून ठेवायचा असेल तर १ वाटी धणे, पाव वाटी मेथी दाणे, पाव वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी सुकं खोबरं आणि मिरच्या आवडीनुसार) हे सगळं साहित्य किंचितशा तेलावर खमंग भाजून त्याची पूड करून घ्या.
इतर साहित्य: एक वाटी तूरडाळीचं शिजवून घोटलेलं वरण, १ वाटी लांब चिरलेला कांदा, अर्धी वाटी लांब चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी दुधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी, सांबार मसाला, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, पोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, मीठ चवीनुसार, कोथिंबीर.
कृती:
1) प्रथम एका भांड्यात कांदा, टोमॅटो आणि दुधी भोपळ्याच्या फोडी एकत्र करून पाणी घालून शिजवून घ्या.
2) भाज्या आधी शिजवल्यामुळे अगदी कमी तेलाच्या फोडणीत सांबार करता येतं. भाज्या शिजवल्यानंतर, त्यातल्या पाण्यासकट ठेवा.
3) दुस-या भांड्यात फोडणीसाठी तेल घाला, तेल तापल्यावर मोहरी घाला, आता त्यात जरा जास्त हिंग, कढीपत्त्याची पानं, हळद घालून खमंग फोडणी करा.
4) त्यावर शिजवलेल्या भाज्या पाण्यासकट घाला.
5) त्याला उकळी आल्यावर त्यात सांबार मसाला, चिंचेचा कोळ, मीठ आणि कोथिंबीर घालून छान उकळू द्या.
6) नंतर त्यात शिजवलेलं वरण घालून आपल्याला हवं तेवढं पातळ करा. हवं असल्यास वरून एक टीस्पून ओलं खोबरं घाला. चांगलं उकळून गॅस बंद करा.
इडली-चटणी बरोबर किंवा डोसा-भाजी-चटणीबरोबर द्या.

बरेच लोक सांबारात लाल भोपळ्याच्या फोडी घालतात पण दुधी भोपळ्याच्या फोडींमुळे सांबार जास्त चविष्ट होतं असं मला वाटतं.