श्रावण नुकताच सुरू झालाय. बरेच लोक श्रावणात मांसाहार करत नाहीत. काही लोक तर कांदा लसूणही खात नाहीत. शिवाय बरेचजण उपासही करतात. उपास म्हटलं की अर्थात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, वरीचे तांदूळ (भगर), दाण्याची आमटी, रताळ्याचा किस, बटाट्याची उपासाची भाजी, उपासाचं थालिपीठ… वा! वा! वा! माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय.
साबुदाण्याची खिचडी आपण सगळेच करतो. पण तरीही आज मी साबुदाणा खिचडीची रेसिपी देणार आहे. स्वयंपाकाची फारशी सवय नसणा-यांसाठी किंवा नव्यानं स्वयंपाक शिकायला लागलेल्यांसाठी ही रेसिपी आहे.
साबुदाणा खिचडी

साहित्य: दोन वाट्या साबुदाणा, पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट, तीन बटाटे उकडून बारीक चिरलेले, एक इंच आलं आणि तीन कमी तिखट मिरच्या एकत्र वाटून, 2 टेबलस्पून साजुक तूप फोडणीसाठी, जिरं, मीठ-साखर चवीनुसार, ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबाचा रस आवडीनुसार
कृती:
1) साबुदाणा स्वच्छ धुवून त्यावर साधारण अर्धा ते पाऊण इंच पाणी ठेवून तो दोन-तीन तास भिजू द्यावा.
2) खिचडी करताना एका भांड्यात साबुदाणा, दाण्याचं कूट, मीठ, साखर, लिंबाचा रस, वाटलेलं आलं-मिरची आणि चिरलेल्या बटाट्याच्या फोडी असं एकत्र मिसळून घ्यावं.
3) एका कढईत तूप गरम करावं. त्यात जिरं घालून ते तडतडू घ्यावं.
4) त्यावर साबुदाण्याचं हे मिश्रण घालावं.
5) खिचडी करताना गॅस मध्यम आचेवरच ठेवावा. फार वेळ झाकण ठेवू नये नाहीतर खिचडी चिकट होते. साधारण 5-7 मिनिटांत खिचडी शिजते.
खिचडी काढून घेऊन त्यावर खोवलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्यावी.
एवढी खिचडी साधारण चार लोकांना पुरते.