वन डिश मील हा प्रकार आता आपल्याकडेही रूळत चाललाय. अर्थात वन डिश मील हे नाव नवं पण पूर्वीही आपल्याकडे असे प्रकार होतेच की. थालिपीठं, खिचडी, उकडशेंगोळे, वरणफळं हे सगळे वन डिश मीलचेच प्रकार नाहीत का? आजच्या धकाधकीच्या जीवनात संध्याकाळी उशीरा कामावरून परत आल्यावर साग्रसंगीत स्वयंपाक करत बसण्याऐवजी असा एखादा साधा पण पौष्टिक प्रकार केला की काम भागतं. बरोबर एखादं सॅलड किंवा कोशिंबीर केली की झालं. आज मी अशाच एका प्रकाराची रेसिपी शेअर करणार आहे. पुलावाचा हा प्रकार तुम्ही तुमच्या सोयीनं वन डिश मील म्हणून करा किंवा साग्रसंगीत जेवणातला एक प्रकार म्हणून करा. हा सौम्य पुलावाचा प्रकार चवदार लागतो. आजची रेसिपी आहे साधा व्हेज पुलाव आणि दही बुंदी.
व्हेज पुलाव

साहित्य: २ वाट्या बासमती तांदूळ, १ वाटी चकत्या करून अर्धे केलेले गाजराचे तुकडे, १ वाटी लांब पातळ चिरलेला कांदा, १ वाटी फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे, १ वाटी फरसबी तिरप्या आकारात चिरलेली, १ वाटी मटार, अर्धी वाटी सिमला मिरची पातळ लांब कापून तुकडे केलेली, १ टीस्पून एव्हरेस्ट किंवा तत्सम कोणताही गरम मसाला, ४ लवंगा, ८ मिरी दाणे, २ दालचिनीचे लहान तुकडे, ४ वेलच्या, २ तमालपत्रं, १ टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार, ५ वाट्या पाणी (जर गरम मसाला आवडत नसेल तर रेडीमेड पुलाव-बिर्याणी मसाला मिळतो तो १ टेबलस्पून घाला, पण मग खडा मसाला घालू नका.)
कृती:
- भात करण्याआधी दीड ते दोन तास तांदूळ धुवून पूर्ण पाणी काढून निथळत ठेवा.
- भात करताना तांदळाला गरम मसाला चोळून घ्या.
- एका पातेल्यात तूप घालून ते चांगचं गरम होऊ द्या. दुस-या गॅसवर पाणी गरम करायला ठेवा.
- तूप गरम झाल्यावर त्यात आधी खडा गरम मसाला घाला. तो तडतडला की कांदा घाला. जरासं परतून इतर सगळ्या भाज्या घाला.
- भाज्या जराशा परतून घ्या. जास्त परतू नका कारण त्या भाताबरोबर शिजणार आहेत.
- आता त्यात मसाला लावलेले तांदूळ घाला. चांगलं परतून घ्या. २ मिनिटं झाकण ठेवा.
- झाकण काढून त्यात आधणाचं पाणी ओता. चवीनुसार मीठ घाला.
- मध्यम गॅसवर पाणी आटेपर्यंत शिजवा.
- पाणी आटत आलं की जाड बुडाच्या तव्यावर पातेलं ठेवा आणि मंद आचेवर झाकण ठेवून भात पूर्ण शिजू द्या.
गरमागरम पुलाव दही बुंदीबरोबर द्या.
दही बुंदी

साहित्य: ३ कप दही, १ तयार रायता बुंदीचं पाकिट किंवा २ वाट्या बुंदी, दीड टीस्पून जिरे पूड, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून साखर, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून, मीठ चवीनुसार
कृती:
- प्रथम दही चांगलं घुसळून घ्या.
- त्यात साखर, मीठ, जिरे पूड आणि लाल तिखट घाला, नीट मिसळून घ्या.
- त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- अगदी देताना त्यात बुंदी मिसळा
साखर आवडत नसेल तर घालू नका. मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा. बरेच जण बुंदी पाण्यातून काढून पिळून घेतात. पण पाण्यातून न काढता केलेल्या रायत्याला जास्त चांगली चव येते. त्याचं टेक्श्चरही चांगलं लागतं.
वन डिश मील म्हणून करताना हा पुलाव आणि दही बुंदी ४ जणांना पुरेसं होतं. साग्रसंगीत जेवणात करणार असाल तर मग ते जास्त लोकांना पुरेल.