कालच श्रावण संपलाय. आणि गणपतीसाठी अजून तीन दिवस आहेत. श्रावणातल्या सणांमुळे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेलच ना? शिवाय पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत ब-याच घरांमध्ये मांसाहारी पदार्थ करत नाहीत. तेव्हा पुढचे दोन तीन दिवस मी आपल्या या पेजवर जरा चटपटीत पदार्थांच्या रेसिपीज देण्याचा प्रयत्न करणार आहे. चटपटीत म्हणजे अगदी चटकमटक नाही तर रोजच्या जेवणातलेच पण जरा झणझणीत पदार्थ. आजचा जो पदार्थ आहे तो खास मांसाहारी लोकांसाठी आहे. आणि विशेष म्हणजे माझी मोठी मुलगी सावनी हिनं करून बघितलेली ही रेसिपी आहे. ती फार छान झाली होती असं हा पदार्थ खाल्लेल्यांनी सांगितलंय. मी तर सामिष पदार्थ खात नाही. तेव्हा तुम्ही करून बघा आणि कसा होतो ते कळवा नक्की.
आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे पोर्तुगीज बेक्ड एग्ज
पोर्तुगीज बेक्ड एग्ज

साहित्य: ४ चिकन सॉसेज स्लाइस करून, १ कप पनीर किंवा रिकोटा चीज छोटे चौकोनी तुकडे करून, ८ अंडी, ८ लसूण पाकळ्या बारीक चिरून , ४ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून, ४ टोमॅटो बारीक चिरून, २ कांदे बारीक चिरून, ४ चीज क्युब्ज किसून, २ तमालपत्रं,१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, थाइम, ओरिगानो, पॅपरिका, तिखट, मीठ, मिरपूड चवीनुसार,

कृती:
१) प्रथम एका पॅनमधे ऑलिव्ह ऑईल घालून ते गरम होऊ द्या.
२) त्यात कांदा, लसूण, तमालपत्रं घालून जरासं परता.
३) आता त्यात मिरची, टोमॅटो, पनीर, सॉसेज घाला. सगळे मसाले घाला. जरासं परतून साधारणपणे २ टेबलस्पून पाणी घाला. मंद आचेवर २०-२५ मिनिटं शिजू द्या.

४) गॅस बंद करून त्यातली तमालपत्रं काढून टाका. तयार मिश्रण एका बेकिंग बोलमधे काढा.
५) त्यावर काळजीपूर्वक अंडी फोडून घाला. त्यावर चवीनुसार मीठ-मिरपूड घाला. वर किसलेलं चीज पसरा.
६) बोल एल्युमिनियम फॉईलनं बंद करा.
७) ओव्हन प्री-हिट करून १८० डिग्रीवर साधारणपणे २०-२५ मिनिटं बेक करा.
हे तसं तर वन डिश मील होऊ शकतं. पण हवं असल्यास साध्या टोस्टबरोबर खा
Nice
LikeLike