सणांना प्रत्येक घरात, त्या त्या कुटुंबाचा वर्षानुवर्षं ठरलेला मेन्यू असतो आणि तोच केला जातो. म्हणजे माझ्या आईकडे गणपतीच्या दिवशी साधं वरण, भात, पंचामृत, काकडीची कोशिंबीर, गवारीच्या शेंगांची किंवा तत्सम भाजी, पालकाची पातळ भाजी, भजी, पोळ्या आणि मोदक असा बेत वर्षानुवर्षं केला जातो. मराठवाड्यात उकडीचे मोदक केले जात नाहीत. सुक्या सारणाचे मोदक करतात.
आज मी असेच काही मेन्यू सुचवणार आहे.
माझ्या घरी मी गणपतीला करते तो बेत असा असतो:
साधा भात, काळ्या वाटाण्यांची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, मेथी-पालकाची मुद्दा भाजी, काकडीची कोशिंबीर, पोळ्या, भजी आणि तळलेले मोदक. मी मोदक तळून करते पण सारण ओलं खोबरं-गूळ वापरून करते.
अजून एक बेत असा करता येऊ शकतो: पुरी, बटाट्याची भाजी, फ्लॉवर-मटाराचा रस्सा, गाजर-टोमॅटोची कोशिंबीर, मसालेभात, टोमॅटोचं सार आणि मोदक हे हवेतच.
तिसरा बेत असा करता येईल: साधं वरण किंवा गोडं वरण, ताकाची कढी, मेथी किंवा पालकाची भरडा भाजी, वांगी-बटाटा रस्सा भाजी, गाजर-मुळा-टोमॅटो-काकडीची पचडी, पोळ्या, साधी खिचडी, तळलेले पापड आणि अर्थातच मोदक
असाही बेत करता येईल: वालाचं बिरडं, कोबीची चणा डाळ घालून केलेली भाजी, लाल भोपळ्याचं रायतं, ओल्या नारळाची चटणी, तोंडली-काजू भात, आमसुलाचं सार किंवा टोमॅटोचं सार, अळू-वडी, पोळ्या, मोदक
हाही एक बेत करून बघा: हरभ-याची किंवा मसुराची मसाला वाटून केलेली उसळ, फ्लॉवर-मटाराची साधी सुकी भाजी, चिंच-गुळाची आमटी, साधा भात, दुधी भोपळ्याचं रायतं, भजी-पापड, पोळ्या आणि मोदक
या सगळ्या मेन्यूंमधल्या जेवणाबरोबर पंचामृत, मेतकूट, सुक्या चटण्या, लोणचं हे जेवणाचा स्वाद वाढवतीलच. तेव्हा करून बघा आणि नक्की कळवा.