ऋषिपंचमीच्या दिवशी एक खास भाजी केली जाते, तिला ऋषिपंचमीची भाजी असंच म्हणतात. सारस्वतांमधे या भाजीला कंदमूळ म्हणतात. ऋषी कंदमूळं खाऊन आपली गुजराण करत असत म्हणून ही भाजी कंदमूळ. या भाजीत अर्थातच बरेचसे कंद घालतात. शिवाय ब-याचजणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत अशा किती तरी भाज्या यात घालतात. थोडक्यात ही एक मिसळीची भाजी किंवा मिक्स व्हेजिटेबल आहे असं म्हणा ना! या भाजीला विशेष मसाले नसतातच. फक्त ओली मिरची आणि ओल्या खोब-याचं वाटण आणि अंबाडे नाही मिळाले तर आंबटपणासाठी चिंचेचा कोळ हाच या भाजीचा मसाला. पण सगळ्या भाज्यांचं मिश्रण करून ही जी काय चव लागते नं, केवळ अप्रतिम! अनुभवावरून सांगते, माझ्या नव-याला एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत त्या भाज्या घातलेलं कंदमूळ मात्र त्याला अतिशय प्रिय आहे. तेव्हा आजची रेसिपी आहे, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ.
ऋषिपंचमीची भाजी किंवा ऋषीची भाजी किंवा कंदमूळ

साहित्य: ४ जुड्या भाजीचा अळू, १ मोठी जुडी लाल माठ, १५-२० माठाच्या जाड देठांचे तुकडे, प्रत्येकी पाव किलो लाल भोपळा, सुरण, रताळं, दोडका, पडवळ; पाव किलो कणगी तसंच करांदा (मिळालं तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल.), ४ कच्ची केळी, पाव किलो भुईमुगाच्या शेंगा सोलून दाणे काढा, १५-१६ कणसाचे तुकडे, साधारणपणे २ वाट्या फरसबीच्या शेंगा अर्धे तुकडे केलेल्या, ५-६ अंबाडे (नसल्यास ३-४ टेबलस्पून चिंचेचा कोळ), दीड वाटी ओलं खोबरं आणि ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, २ शहाळी (पाणीही वापरायचं आहे आणि आतली मलईही तुकडे करून वापरायची आहे), मीठ चवीनुसार
कृती:
१) प्रथम अळू आणि माठ स्वच्छ धुवून ठेवा.
२) भाज्या कोरड्या झाल्यावर अळू आणि माठ बारीक चिरा. अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा.
३) माठाचे देठ सोलून घ्या आणि आपण शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करतो तेवढे तुकडे करा.
४) कच्ची केळी आणि रताळ्याची सालं काढून त्यांचे २-३ इंचाचे तुकडे करा.
५) लाल भोपळा आणि सुरणाचेही तसेच मोठे तुकडे करा.
६) दोडक्याच्या शिरा काढून तसेच मोठे तुकडे करा. पडवळाचेही आतल्या बिया काढून मोठे तुकडे करा.
७) कणसाचे २-३ इंचाचे तुकडे करा.
८) अंबाडे सोलून तसेच अख्खे ठेवा.
९) एका मोठ्या पातेल्यात अळू, लाल माठ, माठाचे देठ घाला. साधारणपणे २ वाट्या पाणी घालून शिजायला ठेवा.
१०) अर्धवट शिजल्यावर त्यात माठाचे देठ, कच्ची केळी, सुरण आणि रताळ्याचे तुकडे घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.
११) आता क्रमानं फरसबी, दोडका, पडवळ, कणसं, शेंगांचे दाणे, लाल भोपळ्याचे तुकडे घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या
१२) भाज्या शिजत आल्या की त्यात सोललेले अंबाडे घाला. शहाळ्याचं पाणी तसंच मलई घाला. हलवून खोबरं-मिरचीचं वाटण घाला. अंबाडे नसतील तर चिंचेचा कोळ घाला. चवीनुसार मीठ घाला. भाजी चांगली शिजू द्या.
१३) सतत हलवू नका, नाही तर भाज्यांचे तुकडे मोडतील. भाजी तयार आहे.
भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. शिवाय यात घातल्या जाणा-या काही भाज्या याच आठवड्यात बाजारात दिसतात. तेव्हा आठवडाभरातच ही भाजी करता येते. तेव्हा ही भाजी करा आणि कशी झाली ते नक्की कळवा.
ही भाजी माझा नवरा नुसतीच खातो. बरोबर फक्त घट्ट दही हवं. त्यामुळे ही भाजी वन पॉट मील म्हणून करता येऊ शकते. नाही तर इतर जेवणाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. मी आज त्या बरोबर कोथिंबीरीचा भात करणार आहे. त्याचीही रेसिपी लवकरच!
Mast
LikeLike
तोंडाला पाणी सुटले…
मस्त…
नक्की करेल
LikeLike