तळलेल्या मोदकांची रेसिपी शेअर केल्यावर ब-याच जणांनी उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर करायची विनंती केली. आता खरी गोष्ट अशी की, मी स्वतः कधीच उकडीचे मोदक केले नव्हते. पण मग या निमित्तानं मीही उकडीचे मोदक करून बघायचे ठरवलं. तसे मी आज ते केले. अजून खाल्ले नाहीत, पण बरे झाले असावेत! माझ्या घरी मला मदत करणारी माझी मदतनीस राणी हिनं मला उकड कशी करायची ते सांगितलं (ती कोकणातली आहे). सारण मी परवा तळलेल्या मोदकांना केलं होतं तसंच केलं आणि हे मोदक केले. तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा कसे झाले ते.
उकडीचे मोदक

सारणासाठीचं साहित्य: २ वाट्या ओलं खोबरं, पाऊण वाटी किसलेला गूळ, प्रत्येकी पाव वाटी बदाम-पिस्त्याचे काप, पाव वाटी काजुचे बारीक तुकडे, पाव वाटी बेदाणे, थोडीशी चारोळी, पाव टीस्पून जायफळ पूड, चिमूटभर मीठ, एक टीस्पून तूप
वरच्या पारीसाठीचं साहित्य: २ वाट्या तांदळाचं पीठ, दीड वाटी पाणी, दोन चिमटी मीठ, १ टेबलस्पून तेल
सारणाची कृती:
१) एका कढईत गूळ, खोबरं, सुका मेवा, तूप, मीठ घालून नीट मिसळून घ्या.
२) कढई गॅसवर ठेवा मंद आचेवर झाकण घालून १० मिनिटं शिजू द्या.
३) आता त्यात जायफळ पूड घाला. नीट मिसळा. परत पाच मिनिटं शिजू द्या.
४) गॅस बंद करा. सारण थंड होऊ द्या.

उकडीची कृती:
१) प्रथम एका कढईत पाणी गरम करायला ठेवा. त्यात मीठ आणि तेल घाला.
२) पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि त्यात तांदळाचं पीठ घालून नीट मिसळून घ्या.
३) आता कढई परत गॅसवर ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटं झाकण ठेवून शिजू द्या. गॅस बंद करा.
४) झाकण तसंच ठेवा. १० मिनिटांनी झाकण काढा. उकड थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तेलाचा हात लावून मळून घ्या.
मोदकाची कृती:
१) उकड नीट मळून घ्या. हाताला थोडंसं तेल लावून लिंबाएवढा उंडा घेऊन त्याला हातावरच पुरीसारखा आकार द्या. पारी शक्य तितकी पातळ करा.
२) आता फोटोत दाखवल्याप्रमाणे त्यात सारण घालून त्याला पाकळ्या पाडा.
३) पाकळ्या एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्या. असे सगळे मोदक करून घ्या.
४) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यावर बसेल अशी चाळणी ठेवा.
५) त्यावर केलेले मोदक ठेवा. गॅस चालू करून मध्यम आचेवर १० मिनिटं उकडा.
मोदक तयार आहेत. गरम उकडीचे मोदक साजुक तूप घालून खा.