नुकतंच एक छान पुस्तक वाचलं, किचन पोएम्स. धीरूबेन पटेल या गुजरातीतल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नामवंत लेखिका. त्यांचं हे पुस्तक. पण या पुस्तकातल्या मूळ कविता त्यांनी इंग्रजीत लिहिल्या आहेत. उषा मेहता यांनी या कवितांचा मराठीत सुरेख भावानुवाद केला आहे. काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवर रेसिपी पेज सुरू केलंय आणि माझा रेसिपी ब्लॉगही सुरू आहे. स्वयंपाक करणं हा माझा नुसता छंद नाहीये तर माझं पॅशन आहे. त्यामुळेच या कविता मला फार भावल्या. म्हणूनच या पुस्तकातल्या काही कविता मी मधून मधून शेअर करणार आहे. मला खात्री आहे तुम्हालाही त्या भावतील. कशा वाटल्या ते नक्की कळवा.
१
मला माहीत होतं की,
तिकडे स्वयंपाकघर होतं,
घराच्या त्या मागल्या काळोख्या भागात.
इकडे टेबलवर, माझा छान नाश्ता व्हायचा
‘ हे नको, ते नको’ करीत दुपारी जेवायचं इथेच;
आणि रात्रीही इथेच वाट पाहायची जेवणासाठी…
होय, घराच्या आतल्या भागात कुठेतरी,
स्वयंपाकघर होतं—-
हे माहीत होतं मला.
२
एक सोनेरी संध्याकाळ
हळूहळू राखी होत चाललेली…
खूप दमून गेलो होतो आम्ही, मी न् माझी मैत्रीण
हैराण झालो होतो उकाड्यानं
आम्ही तिच्या घरी गेलो,
साधंसं छोटंसं घर
घराच्या मध्यभागी स्वयंपाकघर,
सगळं कसं आनंदी, आणि हसरं,
आई काहीतरी करण्यात गुंतली होती…
डोळ्यात एक चमक तिच्या नि गाल जरासे लाल झालेले
किणकिणत्या आवाजात खोटंखोटं रागावली ती आम्हांला
मग ठेवलं पुढ्यात काहीतरी ताजंताजं खायला
अर्थात चहाही आलाच
एक स्टूल नि खुर्ची ओढून तिथेच बसलो आम्ही
ऐसपैस गप्पा आणि मनमुराद हसत होतो
आईही सामील झालेली आमच्यात…
छान उजेड असलेल्या त्या स्वयंपाकघरात
कित्ती वेळ रंगून गेलो होतो आम्ही…
३
अधूनमधून प्रवास करणं तर चांगलंच
काही नवीन मिळतं बघायला
कळतही जातं वेगळं काही
माणसं भेटतात नवी नवी
मित्र होऊन जातात काहीजण
आणि तरूण झाल्यासारखं वाटतं मनाला
तरीदेखील, प्रवास संपल्यावर
जेव्हा मी स्वयंपाकघरात शिरते,
तेव्हाच शांत होतो जीव माझा
माझी पातेली, सतेली, तवे, कढया
डबे नि बरण्या, ताटं नि वाट्या
सारं जिथल्या तिथं पाहताना, खूप बरं वाटतं
जणू ती वाट पाहात असतात माझी,
म्हणतात, ‘आहोतच ना आम्ही, तू आता आराम कर जरासा’
त्यांच्याकडून मिळणारा हा दिलासा
नाही समजायचा कुणाला
४
आज माझं स्वयंपाकघर म्हणजा
रंगारंगांची दंगल!
हिरवीगार कोथिंबीर, पालक-मेथीच्या जुड्या आणि शेवग्याच्या शेंगा
यांच्या पार्श्वपडद्यावर
वांगी, दुधी, मुळा आणि जांभळा कोबी
लालेलाल टोमॅटो, हिरव्यापिवळ्या ढब्बू मिरच्या
गाजरंही लालकेशरी रचलेली!
नजरबंदीच करून टाकतं हे कोलाज
एकाग्र होऊन पाहात राहते मी
तंद्रीच लागून जाते…
मागून कुणीतरी नाजूक कोपरखळी मारून,
हळूच कुजबुजतं माझ्या कानात
‘का—य?
आज स्वयंपाक-बियंपाक करणार आहेत की नाही आईसाहेबा?’