मला स्वतःला फारसं गोड खायला आवडत नाही. त्यामुळेच असेल पण मला फारसे गोड पदार्थ चांगले करता येत नाहीत. पण आता माझ्या रेसिपी पेजच्या निमित्तानं मीही नवीन गोड पदार्थ करून बघतेय. माझ्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. शेवटच्या दिवशी प्रसादासाठी मी कणकेचा शिरा केला होता. मला जे हातावर मोजता येतील असे गोड पदार्थ आवडतात त्यात कणकेचा शिराही आहे. माझी आजी तो फार छान करायची. मी औरंगाबादला गेल्यावर, अगदी ब्याण्णव्या वर्षीही आजी माझ्यासाठी तो करायची. आता माझी बहिण मेघना माझ्यासाठी हा शिरा आवर्जून करते. तेव्हा आज मी तुमच्यासाठी कणकेच्या शि-याची रेसिपी शेअर करणार आहे.
कणकेचा शिरा

साहित्य: १ वाटी कणीक, अर्धी ते पाऊण वाटी साजुक तूप, पाऊण वाटी गूळ, २ वाट्या दूध, प्रत्येकी १ टेबलस्पून बदामाचे काप, काजुचे तुकडे, बेदाणे आणि चारोळी
कृती:
१) प्रथम एका नॉनस्टिक कढईत कणीक घालून, सतत हलवत ती गुलाबी रंगावर भाजावी.
२) कणीक गुलाबी झाली की मग त्यात तूप घालून अजून छान भाजावं. कणकेचा खमंग वास आला पाहिजे आणि रंग गुलाबी-लाल झाला पाहिजे. पण कणीक भाजताना काळजीपूर्वकरित्या भाजा, कारण कणीक लवकर जळते.
३) आता त्यात दूध कोमट करून घाला आणि नीट हलवून घ्या. त्यात गुठळ्या होता कामा नये. कढईवर झाकण ठेवा आणि दणदणीत वाफ येऊ द्या.
४) चांगली वाफ आल्यानंतर त्यात गूळ घाला तसंच सुकामेवा घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण घाला.
५) अगदी मंद आचेवर मधूनमधून हलवत ४-५ मिनिटं वाफ येऊ द्या. शिरा तयार आहे.
आवडत असल्यास शि-यात वेलचीची पूड घालू शकता. पण ती न घालताच हा शिरा उत्तम लागतो. हा शिरा अतिशय लुसलुशीत होतो. कणीक मात्र चांगली भाजली गेली पाहिजे. ती नीट भाजली नाही तर शि-याचा लगदा होईल.