आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे, ती फार म्हणजे फारच लोकप्रिय आहे! ती घरोघरी केली जाते. आमच्या मराठवाड्यात या रेसिपीला तुकडे, कुस्करा, फोडणीची पोळी, पोळीचा चिवडा ते अगदी माणिकपैंजण या भारदस्त नावानं ओळखलं जातं. अर्थात ही रेसिपी फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित नाही. ती महाराष्ट्रात तरी घरोघरी केली जातेच जाते. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा लग्न ठरल्यावर तिच्या घरी गेला तेव्हा माणिकपैंजण खाल का? अशी गोड विचारणा झाली. त्यानं बापड्यानं माणिकपैंजण या नावामुळे पटकन हो म्हटलं. समोर आली ती फोडणीची पोळी! मराठवाड्यात पोळीसारखीच फोडणीची भाकरीही करतात. उरलेल्या पोळी/भाकरीचे एकत्र तुकडे फोडणीला टाकून त्यावर ताकाचा हबका मारून केलेले तुकडे अफलातून लागतात. शिवाय आम्ही पोळी/भाकरी कुस्करून त्यावर काळा मसाला, तिखट, मीठ, कच्चं तेल आणि वर बारीक चिरलेला कांदा घालून खातो. हा प्रकारही भन्नाट लागतो. या प्रकारात आपण आपल्या आवडीप्रमाणे वैविध्य आणू शकता. म्हणजे फोडणीला कांदा-टोमॅटो घातला तर जरा ओलसर अशी पोह्यांसारखी रेसिपी करता येईल. किंवा त्यात मिश्र भाज्या घातल्या तर त्याचं पोषणमूल्य अजून वाढवता येईल. आज माझ्या घरी पोळ्या उरल्या होत्या म्हणून मी साधी फोडणीची पोळी केली होती, त्याचीच ही रेसिपी.
फोडणीची पोळी/भाकरी

साहित्य: उरलेल्या पोळ्या किंवा भाकरी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल तिखट, हळद, मीठ, आवडत असल्यास साखर, मीठ (या साहित्याला प्रमाण नाही, जितक्या पोळ्या उरल्या असतील त्या अंदाजानं घ्या.)
कृती:
१) प्रथम पोळ्या किंवा भाकरीचे जाडसर तुकडे करावेत आणि मिक्सरमध्ये घालावेत. आता मिक्सर एकदाच फिरवावा म्हणजे फार बारीक तुकडे होणार नाहीत.
२) त्यातच मीठ, तिखट, हळद, साखर घालून परत एकदा फिरवावं.
३) एका कढईत तेल घालून ते गरम करावं. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून नेहमीसारखी फोडणी करावी.
४) आता त्यात शेंगदाणे घालून ते लाल होऊ द्यावेत.
५) शेंगदाणे लाल झाले की त्यात कांदा घालून एक वाफ येऊ द्यावी.
६) कांदा शिजला की त्यात मिक्सरमध्ये फिरवलेले तुकडे घालावेत.
७) नीट हलवून झाकण ठेवून एक वाफ काढावी. फोडणीची पोळी/भाकरी तयार आहे.
फक्त भाकरीचे तुकडे असतील तर त्यावर पातळ ताकाचा हबका मारून मग झाकण घालून वाफ येऊ द्यावी. त्यात साखर घालू नये. माझी नणंद फोडणीच्या पोळीवर ओलं खोबरंही घालते, चांगलं लागतं, घालून बघा.
याच रेसिपीनं फोडणीचा भातही करता येतो. फक्त भातातही साखर घालू नये. थोडी पोळी-थोडा भात असं उरलं असेल तर एकत्र करूनही ही रेसिपी करू शकता.
All your recipes too good. I will must try it.
LikeLike