अनंत चतुर्दशी दोन दिवसांवर आली आहे. दहा दिवसांचे गणपती सोडले तर बहुतेकांच्या घरातल्या गणरायाचं विसर्जन झालंय. श्रावणापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं भरपूर गोडधोड खाऊन झालंय. मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकं वर काढतेय, की फारच अरबट-चरबट खाल्लंय का गेल्या काही दिवसांत आपण? आता येते काही दिवस जरा डाएटकडे विशेष लक्ष द्यावं असंही वाटायला लागलंय. म्हणूनच आज मी अशाच दोन डाएटवाल्या रेसिपीज शेअर करणार आहे. या दोन्ही रेसिपीज कोशिंबीरीच्या आहेत. पहिली रेसिपी आहे ती आहे दुधी भोपळ्याच्या रायत्याची तर दुसरी रेसिपी आहे मटकीच्या कच्च्या कोशिंबीरीची.
दुधी भोपळ्याचं रायतं

साहित्य: १ मध्यम आकाराचा दुधी भोपळा (साधारणपणे ३ वाट्या लहान चौकोनी तुकडे), २ वाट्या दही, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून मोहरीची पूड, अर्धा टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी – २ टीस्पून तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची ८-१० पानं, १ हिरवी मिरची तिरपी चिरून
कृती:
१) प्रथम दुधी भोपळ्याची सालं काढून एकसारखे चौकोनी तुकडे करावेत.
२) कुकरच्या भांड्यात घालून कुकरमध्ये दोन शिट्या करून किंवा बारीक गॅसवर १० मिनिटं शिजवावेत. त्यात पाणी घालू नये. हे तुकडे थंड होऊ द्यावेत.
३) आता ते एका वाडग्यात काढून त्यात दाण्याचं कूट, जिरे पूड, मोहरीची पूड, लाल तिखट, मीठ, साखर, दही आणि कोथिंबीर घालून नीट हलवून घ्यावं.
४) एका छोट्या कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी, जिरं, हिंग घालून फोडणी करावी. त्यात मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालावा.
५) गॅस बंद करून ही फोडणी रायत्यावर घालावी आणि नीट हलवून घ्यावं.

दुधीचं रायतं तयार आहे. हे दुधीचं रायतं सणांना केल्या जाणा-या साग्रसंगीत जेवणातला एक पदार्थ म्हणून करता येईल. किंवा रोजच्या जेवणातही करता येईल. याच पध्दतीनं केलेलं लाल भोपळ्याचं रायतंही उत्तम लागतं.
आजची दुसरी रेसिपी आहे मटकीच्या कच्च्या कोशिंबीरीची.
मटकीची कोशिंबीर

साहित्य: २ वाट्या मटकी, १ कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून साखर, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार

कृती:
१) मटकी कच्चीच ठेवावी, एका वाडग्यात काढावी.
२) त्यात कांदा, टोमॅटो, मीठ, साखर, लाल तिखट, लिंबाचा रस घालावा. सगळं नीट एकत्र करावं.

मटकीची कोशिंबीर तयार आहे. ही कोशिंबीर गरम मुगडाळीची खिचडी, टोमॅटोचं सार आणि तळलेले पापड यांच्याबरोबर फर्मास लागते.