बटाटा ही भाजी बहुतेक सगळ्यांना आवडते. बटाट्याच्या साध्या काच-या असोत, बटाटे उकडून केलेली साधी, कोथिंबीर-कढीपत्ता घातलेली भाजी असो, बटाट्याची उपासाची भाजी असो, कांदा-खोब-याचं वाटण लावलेला रस्सा असो किंवा कांदा घालून केलेली जास्त तेलातली चमचमीत भाजी असो, बटाट्याची किती तरी पध्दतीनं भाजी करता येते. अर्थात बटाटा ही खरंतर तशी भाजी नव्हेच. बटाटा हा मुख्यत्वे पिष्टमय पदार्थ. पण आपण बटाट्याला एक सर्वमान्य भाजी करून टाकलेलं आहे. शिवाय कित्येक पदार्थांमधे व्यंजन म्हणूनही बटाट्याचा मुबलक वापर होतो. बटाटे घातलेले पोहे, साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे, कटलेट, फ्लॉवर-कोबीच्या भाजीत घातला जाणारा बटाटा किंवा एखादी भाजी कमी पडत असेल तर ती वाढवण्यासाठीही आपण सर्रास बटाट्याचा वापर करत असतो. शिवाय बटाटा चिप्स आणि बटाट्याचे पापड हे तर आहेतच. तेव्हा असा हा (मी बहुगुणी म्हणणार नाही! कारण बटाट्यात फारशी पोषणमूल्यं नसतात) बहुउपयोगी बटाटा. कारण तो आपली अडलीनडली वेळ सहज भागवतो. म्हणूनच आज मी जी रेसिपी देणार आहे ती आहे कांदा-टोमॅटो-बटाट्याच्या साध्या रस्सा भाजीची.
कांदा-टोमॅटो-बटाट्याचा साधा रस्सा

साहित्य: २ मोठे कांदे मोठ्या फोडी केलेले, २ मोठे टोमॅटो मोठ्या फोडी केलेले, २ मोठे बटाटे मोठ्या फोडी केलेले, वाटण मसाला – ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, मूठभर कोथिंबीर (एकत्र वाटून घ्यावं), १ टेबलस्पून दाण्याचं कूट, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, बोराएवढा गूळ (नको असल्यास नाही घातला तरी चालेल), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग
कृती:
१) प्रथम एका लहान कुकरमधे तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग घालून फोडणी करावी.
२) आता त्यात चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा फार लाल करू नका. नंतर त्यात टोमॅटोच्या फोडी घालून दोन मिनिटं परतावं.
३) नंतर त्यात वाटलेला मसाला घालून चांगलं परतावं आणि त्यात हळद घालावी.
४) आता बटाट्याच्या फोडी घालून अजून दोन मिनिटं परतून घ्यावं. नंतर त्यात तिखट, काळा मसाला, दाण्याचं कूट, मीठ, गूळ घालून नीट हलवून घ्यावं.
५) जरासं परतून आपल्याला रस्सा हवा असेल तितपत पाणी घालावं (साधारणपणे २ वाट्या पुरे होईल).
६) कुकरचं झाकण लावावं. मंद गॅसवर ठेवल्यास ७-८ मिनिटांत किंवा २ शिट्यांमध्ये ही भाजी होते.
गरम गरम पोळ्यांबरोबर किंवा साध्या गरम भाताबरोबर ही भाजी मस्त लागते. हवी असल्यास वरून अजून कोथिंबीर घालू शकता. रस्सा आपल्या आवडीनुसार कमी-जास्त तिखट करण्यासाठी लाल तिखट-काळ्या मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता.
एवढी भाजी साधारणपणे ३-४ लोकांना पुरेशी होते.
Khup Khup Dhanyawaad Sayali Tai.. Aaj ch ha rassa kela hota ani kharokhar sunder chav ali hoti.. 🙂 ..
LikeLike