तूप-जि-याची फोडणी म्हटलं की उपासाचे पदार्थच डोळ्यासमोर येतात. साबुदाणा खिचडी किंवा दाण्याची आमटी किंवा बटाट्याची उपासाची भाजी आपण तूप-जि-याच्या फोडणीत करतो. पण रोजच्या जेवणातले काही पदार्थही तूप-जि-याच्या फोडणीत फार छान लागतात. म्हणजे ताकाच्या मठ्ठ्याला तूप-जि-याची हिंग घातलेली फोडणी शिवाय त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता घातला की काय फर्मास लागतं! करून बघा. किंवा तूप-जि-याची फोडणी घालून भेंडीची ताक घालून केलेली भाजीही मस्त लागते. आज मी याच फोडणीची एक रेसिपी शेअर करणार आहे, ती आहे तूप-जि-याच्या फोडणीच्या वरणाची. हे वरण झटपट होणारं आहे, शिवाय अतिशय सौम्य चवीचं आहे पण तरीही चवदार लागतं. करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं ते.
तूप-जि-याच्या फोडणीचं वरण

साहित्य: १ वाटी तूरडाळीचं शिजवलेलं वरण, ८-१० लसूण पाकळ्या गोल तुकडे करून, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, १०-१२ कढीपत्त्याची पानं, २-३ हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे, १ टीस्पून साखर, पाव टीस्पूनपेक्षा थोडा कमी हिंग, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तूप, १ टीस्पून जिरं
कृती:
१) प्रथम तूरडाळीचं शिजवलेलं वरण चांगलं घोटून घ्या. त्यात पुरेसं पाणी घालून ते पळीवाढं करून घ्या.
२) एका कढईत तूप घालून ते चांगलं गरम करा. तूप चांगलं तापल्यावर त्यात जिरं घालून तडतडू द्या.
३) नंतर त्यात लसणाचे तुकडे घालून परता. पण लसूण फार लाल करू नका.
४) आता त्यात मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालून हलवा. लगेचच हिंग घाला.
५) नीट हलवून त्यात पातळ केलेलं वरण घाला. वरणाला जरा उकळी येऊ द्या.
६) मग त्यात मीठ, साखर आणि कोथिंबीर घाला. असून एक उकळी काढा. गॅस बंद करा.
तूप-जि-याच्या फोडणीचं वरण तयार आहे.
हे वरण गरमागरम साध्या भाताबरोबर द्या. एवढं वरण साधारणपणे ४ जणांना पुरेसं होतं.