रव्याचे मऊ लाडू

काल आम्हा फेसबुक मित्रमैत्रिणींचं एक गेटटुगेदर मुंबईत झालं. एकूण २६-२७ लोक होते. त्यातल्या फक्त दोघांना मी याआधी प्रत्यक्ष भेटले होते. एक माझा कॉलेजमधला मित्र अतुल खेरडे आणि मी दूरदर्शनला काम करत असतानाची सहकारी सोनाली जोशी असे दोन जण सोडले तर बाकी सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटले. पण खरं सांगते मला फार मजा आली. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणा-या, वेगवेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असणार-या पण तरीही लेखन, वाचन, संगीत आदींच्या समान आवडीमुळे एकमेकांशी मैत्र जुळलेल्या या सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. शिवाय ख्यातनाम लेखक आणि महाराष्ट्रातले पायोनियर सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर विट्ठल प्रभू आणि त्यांच्या पत्नीही आमच्या या मेळाव्यात आनंदानं सहभागी झाले होते. मी रेसिपी पेज चालवते म्हटल्यावर मी काहीतरी करून आणावं अशी ब-याच जणांची इच्छा होती. विशेषतः माझा मित्र अतुल यानं मला रव्याचे मऊ लाडू करून आण अशी फर्माईश केली होती. खरं सांगायचं तर मला दडपण आलं होतं. कारण एक तर मला गोड पदार्थ फारसे करता येत नाहीत आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत या लोकांनी माझ्या रेसिपीज फक्त वाचल्या होत्या आणि फोटो बघितले होते. त्यामुळे माझी झाकली मूठ होती! पण मग मी माझी साहित्य सहवासातली मैत्रीण तनुजा बांदिवडेकर हिचा धावा केला. ती गोड पदार्थ फार सुंदर करते. तिनं मला रव्याचे मऊ लाडू कसे करायचे हे शिकवलं. आणि तिच्यामुळे ते फार छान झाले. माझ्या सगळ्या नव्या मित्रमंडळीला लाडू फार आवडले. लाडवांची रेसिपी शेअर करण्याचा त्यांचा आग्रह आहे. तेव्हा आजची रेसिपी आहे रव्याचे लाडू.

रव्याचे लाडू

रव्याचे तयार लाडू
रव्याचे तयार लाडू

साहित्य: ४ वाट्या अगदी बारीक रवा, २ वाट्या साजूक तूप (घरचं नसेल तर चितळेंचं वापरा, त्याला वास चांगला असतो), साडेतीन वाट्या साखर, दीड वाटीहून थोडंसं जास्त दूध, दीड ते २ वाट्या खोवलेला ओला नारळ, अर्धा टीस्पून वेलची पूड, आवडीनुसार चारोळी आणि बेदाणे, हवं असल्यास बदामाचे काप

रव्याच्या लाडुंसाठी लागणारं साहित्य
रव्याच्या लाडुंसाठी लागणारं साहित्य

कृती:

१) प्रथम एका जाड बुडाच्या कढईत घालून मंद आचेवर रवा भाजायला घ्या. आधी रवा कोरडाच भाजा.

२) जरा भाजला गेल्याचा वास यायला लागला की त्यात तूप घाला. नीट हलवून घ्या आणि मंद आचेवर मधूनमधून हलवत चांगलं भाजा. रवा चांगला भाजला गेला पाहिजे पण फार लाल करायचा नाहीये.

३) रवा भाजून होत आला की एका भांड्यात दूध आणि साखर घालून मंद आचेवर हलवत पाक करायला ठेवा. साखर विरघळली की दूध फाटेल. दूध असल्यामुळे हा पाक फाटतोच.

४) दुसरीकडे भाजत आलेल्या रव्यात, खोवलेला नारळ, बेदाणे, चारोळी घाला नीट हलवून जरासं भाजा.

५) गॅस बंद करून वर वेलची पावडर घाला.

६) दुधाचा पाक लवकर होतो. आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. पाक झाला आहे की नाही ते बघण्यासाठी एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन पाकाचा थेंब टाकून बघा. तो थेंब पाण्यात जरासा जमला की पाक तयार आहे असं समजा.

७) गॅस बंद करा. आता हा पाक कढईतल्या भाजलेल्या रव्यात घाला. नीट एकजीव मिसळून घ्या आणि हे मिश्रण थंड करायला ठेवा.

८) मिश्रण मधूनमधून हलवत रहा. मिश्रण लाडू वळण्याइतकं घट्ट होण्यासाठी साधारणपणे अडीच ते ३ तास लागतात.

९) नंतर या मिश्रणाचे लाडू वळा. हे लाडू वळायला अतिशय सोपे आहेत.

इतक्या मिश्रणाचे साधारणपणे लहान आकाराचे ५०-६० आणि मध्यम आकाराचे ४० लाडू होतात.

5 thoughts on “रव्याचे मऊ लाडू

    1. शिवांगी, हे लाडू फार टिकत नाहीत. फार तर दोन दिवस बाहेर राहतात. हवं तर करून फ्रीजमधे ठेवा. कारण त्यात ओला नारळ वापरलेला आहे. 🙂

      Like

  1. Mala jaad ravyachya ladunchi recipe sanga pls. Me jithe rahate tithe barik rava milat nahi….aani jaad ravyache ladu changale hot nahit. Thanks.

    Like

  2. मला रव्याचे लाडु अमेरिकेत पाठवायचे आहेत तर तेथे लाड़ू किती दिवस रहातील

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: