आधी श्रावण होता म्हणून आणि नंतर गणपती होते म्हणून मी या पेजवर बहुतेकदा शाकाहारी रेसिपीज शेअर केल्या आहेत. पण आता नवरात्रही येऊ घातलंय तेव्हा त्याआधी काही मांसाहारी पाककृती देण्याचा माझा विचार आहे. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे पापलेटच्या आमटीची. पापलेट हा मासा लोकप्रिय आहे. म्हणजे जे मासे खाण्यातले दर्दी आहेत ते पापलेटला फारशी किंमत देत नाहीत. वेर्ल्या, मोदकं, कर्ली, मुडदुशा आदी माशांना त्यांची अधिक पसंती असते. मासे जितके बारीक आणि त्यात जितके काटे तितके ते अधिक चवदार असतात असं म्हणतात. पण जे लोक मासे नव्यानं खायला शिकले आहेत किंवा मूळ मत्स्याहारी नाहीत असे लोक पापलेट आवडीनं खातात. सरंगा, खापरी पापलेट वगैरे प्रकार हे पापलेटच्याच सदरात मोडतात. आजची ही जी आमटीची रेसिपी आहे ती सारस्वतांमध्ये रसगोळीची आमटी म्हणून प्रसिध्द आहे. पूर्वीच्या काळी पाट्या वरवंट्यावर आमटीचं वाटण केलं जायचं. तेव्हा नारळ वाटून त्याचा पातळ रस काढला जाई आणि जाड मसाल्याची गोळी वाटली जाई म्हणून ही रसगोळीची आमटी. पण आता बहुसंख्य सगळेजण मिक्सरमध्येच आमटीचं वाटण करतात. अर्थात सारस्वत हे मासे खाण्यात इतके अट्टल असतात की अजूनही काही घरांमधे पाट्या-वरवंट्यावर वाटण केलं जातं! ही रेसिपी अर्थातच मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे.
पापलेटची आमटी

साहित्य: मध्यम आकाराचं एक पापलेट (साधारणपणे ७-८ तुकडे), १ वाटी खोवलेलं ओलं खोबरं, ३-४ लाल बेडगी मिरच्या (यांना रंग चांगला असतो आणि त्या विशेष तिखट नसतात), ६-७ मिरी दाणे, १ टीस्पून धणे, १ बारीक चिरलेला कांदा, पाव टीस्पून हळद, अर्धा ते एक टीस्पून तिखट, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, मीठ चवीनुसार, १ टीस्पून तेल, माशांना लावायला: अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट, थोडंसं मीठ
वाटणाची कृती: ओलं खोबरं, मिरच्या, मिरी दाणे, धणे, चिरलेल्या कांद्यातला पाव कांदा, हळद, तिखट हे सगळं मिक्सरमधे घालून अगदी बारीक वाटून घ्यावं. वाटताना पाण्याचा वापर करावा. अगदी मऊ पेस्ट झाली पाहिजे.
आमटीची कृती:
१) प्रथम एका उथळ कढईत तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात उरलेला बारीक चिरलेला कांदा घाला.
२) कांदा जरासा परता पण लाल करू नका.
३) कांदा जरासा शिजला की त्यात वाटलेला मसाला घाला आणि हलवून घ्या. त्यात साधारणपणे दोन वाट्या पाणी घाला.
४) या रसाला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ आणि मीठ घाला.
५) हलवून त्यात मसाला लावलेले पापलेटचे तुकडे घाला.
६) मोठ्या गॅसवर दोन उकळ्या काढा. मासे फार लवकर शिजतात. म्हणून काळजीपूर्वक लक्ष ठेवा.
७) मासे शिजले की गॅस बंद करा.
पापलेटची आमटी तयार आहे. तयार आमटी गरम साध्या भाताबरोबर द्या. बरोबर तळलेल्या माशाचा तुकडा आणि सोलकढी असेल तर क्या बात है!
एवढी आमटी दोन जणांना पुरेशी होते. याच पध्दतीनं सुरमई, सरंगा, कोलंबी किंवा कुठल्याही माशांची आमटी करता येते.
Khuppach chhaan distey aamti. Maaze lagna honaar aahe lavkarach. Tumhe hya recipes khup upyogi aahet. Me sagla try karin! Thank you 🙂
LikeLiked by 1 person