नामवंत गुजराती कवयित्री धीरूबेन पटेल यांच्या किचन पोएम्स या पुस्तकातल्या काही कविता मी काही दिवसांपूर्वीच आपल्या या पेजवर शेअर केल्या होत्या. या मूळ कविता इंग्रजीत आहेत. उषा मेहता यांनी या कवितांचा सुरेख भावानुवाद केला आहे. त्याच पुस्तकातल्या आणखी काही कविता मी आज शेअर करणार आहे. तुम्हाला त्या नक्की आवडतील.
१
स्वयंपाक म्हणजे विलक्षण जादू
मात्र, करता यायला हवा चांगला!
मग घरातल्यांवर तुमचं किती उत्कट प्रेम आहे
सांगावंच लागत नाही हे शब्दांनी!
डोळे विस्फारतात त्यांचे
ओठांवर असते, कृतज्ञ हास्यरेखा
लग्गेच उद्गारतात, ‘कित्ती छान’ !
उत्स्फूर्त असतो हा संवाद, परिपूर्णही,
कुणाच्या भावना दुखावलेल्या नसतात
कुठला गैरसमज नसतो
असतो निखळ आनंद,
जेवणा-यांचा, नि ‘जेवण’ बनवणा-याचा
२
देवानी तरी
कशाला निर्माण करायच्या तांदळाच्या एवढ्या जाती?
हा घेऊ की तो घेऊ
किती अवघड होतं ठरवताना
काही तांदुळदाणे लांब, काही आखूड
काही जड, काही हलके
काही शुभ्र पांढरे तर काही धुवट कपड्यांच्या रंगाचे,
काही पिवळट छटांचे, जुन्या जुन्या रेशमापासून बनवल्यासारखे
प्रत्येक जातीच्या तांदळाच्या गरजाही वेगवेगळ्या
काहींना थोडंसंच लागतं पाणी, लाज-या पोरीनं घोट घ्यावा तसं
तर काहींना, हे एवढं पाणी
म्हशींना लागतं ना डुंबायला, तसं!
काही तांदुळदाणे, चिकटूनचिकटून, घट्ट मित्रांसारखे
तर काही सुटेसुटे,
शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर,
विखुरणा-या आनंदी पोरांसारखे
होय रे, देवा परमेश्वरा, थोरच आहेस तू
तुझ्या सामर्थ्याला पार नाही बाबा
पण परमेश्वरा, हे प्रिय परमेश्वरा,
माझ्यावर उपकार करण्यासाठी
तू फक्त एकाच जातीचे तांदूळ केले असतेस तर…
३
नवी निर्मिती होत असतानाचा ‘तो’ थरार
जो, कवी, चित्रकार अनुभवतात.
जो, जाणवतो शिल्पकारांना, संगीतकारांना,
सर्वच कलावंतांना,
तोच मीही अनुभवते,
जेव्हा मी अंतःस्फूर्तीनं एखादा नवा पदार्थ करते.
जगाला त्याची जाणीव नसेल
पण मला काहीच नाही वाटत त्याचं
कारण, ‘तो’ जादुई क्षण तर
फक्त माझाच असतो ना!
मूळ इंग्रजी कविता: धीरूबेन पटेल अनुवाद: उषा मेहता