मसाला भरून भाज्या किंवा मांसाहारी पदार्थ करण्याची पध्दत जगभर प्रचलित आहे. स्टफ्ड मश्रूम्स, स्टफ्ड पटेटोज विथ चीज, स्टफ्ड कॅप्सिकम असेल किंवा टर्किश रेसिपी डोल्मा (Dolma) असेल या सगळ्या भरून केल्या जाणा-या पाककृती आहेत. भारतातही बहुतांश सगळ्या प्रांतांमध्ये भरून भाज्या करण्याची पध्दत आहेच. आपल्याकडेही भरली कारली, भरली भेंडी, भरलं पडवळ, भरली वांगी केली जातातच. हैदराबादला म्हणजे खरं तर सगळ्या आंध्रातच बगारे बैंगन हा भरल्या वांग्यांच्या भाजीचा अप्रतिम प्रकार मिळतो. शेंगदाणे, तीळ भाजून वाटून आणि चिंचेचा कोळ मुक्त हस्ताने घालून हा अफलातून प्रकार बनवतात. मला स्वतःलाही भरल्या भाज्या खूप आवडतात. आपल्याकडे भरल्या वांग्याची भाजी खूप प्रकारांनी केली जाते. मी आज जी रेसिपी देणार आहे ती अशाच एका प्रकाराची आहे. करायला सोपी आहे. आजची रेसिपी आहे भरली वांगी.
भरली वांगी

साहित्य: अर्धा किलो जांभळी बिनबियांची वांगी (मसाला भरतो तशी चिरून घ्या), ४ कांदे (गॅसवर डायरेक्ट भाजून घ्या), अर्धी वाटी दाण्याचं कूट, अर्धी वाटी तिळाचं कूट, ८-१० लसूण पाकळ्या, बोराएवढा गूळ, १ टेबलस्पून काळा मसाला, १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, थोडीशी मोहरी
मसाल्याची कृती:
१) भाजलेले कांदे, लसूण मिक्सरमधे फिरवून बारीक वाटून घ्या.
२) नंतर त्यात दाण्याचं कूट, तिळाचं कूट, काळा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि गूळ घालून मिक्सर अगदी एकदाच फिरवा.
३) दाण्याचं, तिळाचं कूट जास्त बारीक करायचं नाहीये. वांग्यात भरण्याचा मसाला तयार आहे.
भाजीची कृती:
१) प्रथम वांग्यांमधे तयार मसाला भरून तयार ठेवा.
२) एका नॉनस्टिक कढईत तेल चांगलं गरम करा. गरम झालं की त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
३) आता त्यात हिंग घाला. नंतर त्यात भरलेली वांगी घाला. चांगलं हलवून घ्या.
४) अगदी मंद आचेवर झाकण ठेवून वांगी अगदी मऊ होईपर्यंत वांगी शिजवा.
भरली वांगी तयार आहेत.
एवढी भाजी ४-५ जणांना पुरते. आवडत असल्यास १ टेबलस्पून चिंचेचा कोळ घाला. गूळ नाही घातला तरी चालू शकेल. आवडत असल्यास तयार मसाल्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. बिनबियांची वांगी मिळाली नाहीत तर साधी काटेरी वांगीही चालतील.
या भाजीबरोबर गरम भाकरी, ठेचा, ताकाची कढी असा बेत फर्मास लागतो. करून बघा आणि नक्की कळवा कशी झाली ते.
मस्त झाली भाजी. मसाला खुपच छान आहे.
LikeLike