मी याआधी राजम्याची रेसिपी शेअर केली होती तेव्हा लिहिलं होतं की राजमा आणि छोले या पंजाबी पदार्थांनी आपल्या स्वयंपाकाघरात महत्वाचं स्थान मिळवलं आहे. हे दोन्ही पदार्थ महाराष्ट्रात अगदी घराघरात केले जातात. विशेषतः तरूण पिढीला तर हे दोन पदार्थ फारच भावतात. आमच्या घरीही हे दोन्ही पदार्थ नियमितपणे होत असतात. माझ्या दोन्ही मुलींना छोले विशेष प्रिय आहेत. छोल्यांची उसळ तर आमच्या घरी होतेच पण त्याच बरोबर छोले भिजवून, शिजवून केला जाणारा हमस किंवा हुमस हा लेबनीज पदार्थही आमच्याकडे वारंवार होतो. या पदार्थाची रेसिपीही पुढे कधीतरी शेअर करेनच. पण आज मी पंजाबी छोल्यांची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी माझी बहिण मेघना पाटील हिची आहे. या पध्दतीनं केलेले छोले अतिशय रूचकर होतात. तेव्हा आजची रेसिपी आहे छोले.
छोले

साहित्य: १ वाटी छोले (रात्रभर भिजवा), २ मोठे कांदे (उभे लांब चिरा), ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, १ टोमॅटो (मिक्सरमधे वाटून घ्या), १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून एव्हरेस्ट किंवा इतर कोणताही छोले मसाला, १ टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून लाल तिखट (ऐच्छिक), अगदी किंचित हळद, मीठ चवीनुसार, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, ४-५ मिरी दाणे, १-२ दालचिनीचे लहान तुकडे, २ लवंगा, १-२ तमालपत्रं, १ टेबलस्पून तेल
कृती:
१) प्रथम भिजवलेले छोले परत एकदा स्वच्छ धुवून घ्या. त्यात थोडंसं मीठ घालून ते कुकरला शिजवायला लावा. लहान कुकरमधे डायरेक्ट शिजवल्यास तीन शिट्या करून १०-१२ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा. किंवा कुकरच्या भांड्यात ठेवल्यास तीन शिट्या करून १५ मिनिटं बारीक गॅसवर ठेवा. छोले अगदी मऊ शिजायला हवेत.
२) चिरलेला कांदा एका भांड्यात घेऊन त्यात १ ते दीड कप पाणी घालून ते गॅसवर शिजवून घ्या. कांदा पारदर्शक झाला की शिजला असं समजा. कांदा उपसून ठेवा, पाणी टाकून द्या.
३) कांदा गार झाल्यावर तो मिक्सरमधे घालून त्यातच आलं-लसूण घालून वाटून घ्या.
४) आता एका कढईत तेल गरम करा. त्यात खडा मसाला घाला आणि तो तडतडू द्या.
५) नंतर त्यात कांद्याचं वाटण घालून मधूनमधून हलवत चांगलं शिजू द्या. कांदा शिजला की त्यात वाटलेला टोमॅटो घालून परता.
६) टोमॅटो चांगला परतला गेला की त्यात दही घाला. दही घातल्यानं मसाला लवकर परतला जातो आणि त्याला चवही चांगली येते.
७) दह्याचं पाणी आटून त्याला तेल सुटलं की मग त्यात छोले मसाला, धणे पूड, हळद, तिखट, मीठ घालून चांगलं परता. आता त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हा सगळा मसाला छान होऊ द्या.
८) नंतर त्यात शिजवलेले छोले त्यातल्या पाण्यासकट घाला. नीट हलवून घ्या. मंद आचेवर मधून मधून हलवत छोले मसाल्यात चांगले शिजू द्या. पाणी आपल्याला जितपत रस हवा असेल तितकं ठेवा.
छोले तयार आहेत. या छोल्यांबरोबर गरम साधे पराठे किंवा साध्या पोळ्याही छान लागतात. शिवाय बरोबर मसाला कांदा द्या. मसाला कांद्यासाठी कांदा उभा पातळ चिरा, त्यात थोडं तिखट, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर घाला.
छोले काळ्या रंगाचे हवे असतील तर छोले शिजवायला लावाल तेव्हा त्यात एका कापडाच्या पुरचुंडीत २ टीस्पून चहाची पावडर घालून ती पुरचुंडी बांधून छोल्यांमधे घालून शिजवा. शिजल्यावर पुरचुंडी काढून टाका. गरम मसाला फारसा आवडत नसेल तर तोही असाच पुरचुंडीत बांधून शिजवताना घाला आणि नंतर काढून टाका म्हणजे स्वाद येईल. मी छोले नेहमी लोखंडी कढईतच करते. त्यामुळेही रंग छान येतो.
करून बघा आणि नक्की कळवा कसे झाले ते.
Hello Sayli mavshi…
Chole recipe ek number.. thanks to u n meghana tai . Kal try keli, khup chan jamun ali hoti. mala khandeshi kadhi gole chi recipe haviy. Asel tar pls share kara.
LikeLike
Hi again Sayali,
Followed this recipe for today’s tiffin. I just roasted the onions and tomatoes though, made paste out of it separately for the color. 🙂
Taste amzaing.
Thank you
LikeLike