पिठलं हा पदार्थ मूळचा महाराष्ट्रीय आहे की गुजराती असा वाद गुजराती लोक हिरीरीनं घालतात. त्यांच्या मते पिठलं हा मूळचा गुजराती पदार्थ आहे आणि तो आपण मराठी लोकांनी आपलासा केलाय. पण पिठलं हा मूळ मराठीच पदार्थ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही! कारण पिठलं हे फुलक्यांपेक्षा आपल्या भाकरीबरोबरच फर्मास लागतं (आता भाकरी नसेल तर मग फुलक्यांबरोबर खाण्याशिवाय पर्याय उरत नाही ते सोडा!) शिवाय आपल्याकडे पिठल्याचे जे त-हत-हेचे प्रकार केले जातात त्यामुळे तर तो मराठीच पदार्थ आहे याविषयीचा माझा विश्वास दृढ होत जातो! तव्यावरचं पिठलं, दाण्याच्या कुटाचं पिठलं, कोरडा झुणका, कांदा-लसूण-कोथिंबीर घालून केलेलं पिठलं, दही-दूध घालून केलेलं पिठलं, शेवग्यांच्या शेंगांचं पिठलं, चण्याची डाळ भिजवून वाटून केलेलं पिठलं, मराठवाड्यातल्या खेड्यांमधे कामट्यांनी (झाडांच्या वाळलेल्या बारीक फांद्यांनी) हाटून केलेलं पिठलं, कुळथाचं पिठलं असे किती तरी पिठल्याचे प्रकार आपल्याकडे केले जातात. यातला प्रत्येक प्रकार मी खाल्लेला आहे आणि मला हे सगळे प्रकार आवडतात. माझ्या नव-याला त्याच्या आईनं कांदा-लसूण-कोथिंबीर घालून केलेलं पिठलं आवडतं तर माझ्या मुलींना त्यांच्या आईनं दही-दूध घालून केलेलं पिठलं आवडतं. आज मी पिठल्याच्या दोन रेसिपीज शेअर करणार आहे. पहिली रेसिपी आहे दही-दुधाच्या पिठल्याची तर दुसरी रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा घालून केलेल्या पिठल्याची.
दही-दुधाचं पिठलं

साहित्य: १ वाटी डाळीचं पीठ (बेसन), १ वाटी आंबट दही, १ वाटी दूध, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, २ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग
कृती:
१) प्रथम एका भांड्यात डाळीचं पीठ घेऊन त्यात दही, दूध घालून नीट एकजीव करावं. गुठळ्या राहू देऊ नयेत. आपल्याला पिठलं जितकं पातळ हवं असेल त्या अंदाजानं त्यात पाणी घालावं.
२) आता त्यात तिखट, मीठ आणि दाण्याचं कूट घालावं.
३) एका कढईत तेल गरम करावं. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग घालावा. नंतर हळद घालावी. फोडणी खमंग झाली पाहिजे.
४) आता त्यात कालवलेलं डाळीचं पीठ घालावं. नीट हलवून घ्यावं आणि मध्यम आचेवर ठेवावं.
५) जरा उकळी आली की गॅस बारीक करावा आणि झाकण घालून ५-७ मिनिटं ठेवावं.
पिठलं तयार आहे.
या पिठल्याबरोबर भाकरी, ठेचा किंवा भुरका, कच्चा कांदा द्यावा. आवडत असल्यास पिठल्यावर कच्चं तेल घालून खावं. गरम साध्या आसट भाताबरोबरही पिठलं उत्तम लागतं. हेच पिठलं जरा वेगळ्या पध्दतीनं करायचं असेल तर ५-६ लसूण पाकळ्या, १ टीस्पून जिरं आणि १ टेबलस्पून सुकं खोबरं वाटून घेऊन ते फोडणीत घालावं आणि चांगलं परतून मग कालवलेलं पीठ ओतावं. माझी आजी असं करायची.

आजची दुसरी रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा घातलेल्या पिठल्याची
शेवग्याच्या शेंगांचं पिठलं

साहित्य: १ वाटी डाळीचं पीठ (बेसन), २-३ शेवग्याच्या शेंगा (३ इंच लांबीचे तुकडे करून उकडून घ्या, उकडलेलं पाणी त्यातच ठेवा), ६-७ कमी तिखट हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरलेल्या (तिखट असतील तर २-३ घ्या), १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ आमसूलं, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार
कृती:
१) एका पातेल्यात डाळीचं पीठ पाणी घालून कालवून घ्या. आपल्याला पिठलं जितपत पातळ हवं असेल त्या प्रमाणात पाणी घाला. त्यातच मीठ आणि आमसूलं घालून ठेवा.
२) एका कढईत तेल चांगलं गरम होऊ द्या. त्यात मोहरी घालून ती तडतडली की हिंग घाला. ३) हळद घालून त्यात मिरची घालून जरासं परता. नंतर त्यातच कोथिंबीर घाला आणि चांगलं परता.
४) नंतर त्यात शेवग्याच्या शेंगा पाण्यासकट घाला. चांगली उकळी येऊ द्या.
५) उकळल्यावर त्यात कालवलेलं पीठ घाला. नीट हलवा आणि मंद आचेवर ७-८ मिनिटं ठेवा. पिठलं तयार आहे.
हे पिठलंही भाकरीबरोबर फर्मास लागतं. बरोबर अर्थातच ठेचा किंवा लसणाची चटणी हवीच. या पिठल्यावर तूप घातलं तर छान लागतं. गरम मऊ भाताबरोबरही हे पिठलं मस्त लागतं.
करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं ते.
गुजराती लोकं फुलकेच खातात असं काहीही नाही… खरंतर बाजरीची भाकरी हा त्यांचा पारंपारिक खेडवळ पदार्थ, रोजचं अन्न आहे.
LikeLike
शेवग्याच्या शेंगाचे पिठले पहिले अन मला य गो जोशीच्या गोष्टीची आठवण झाली ,,,शेवग्याच्या शेगाचे पिठले ,,,तारका आणि तिच्या भावांमधील नाते उलगडून दाखवणारी सुंदर गोष्ट ,,,धन्यवाद ..
LikeLike
धन्यवाद!
LikeLike
Khup chan recipes aahet
Navin kahi recipes shodhayachi garajch bhasnar nahi.khup chan.
LikeLike