स्वीट कॉर्न किंवा अमेरिकन कॉर्नला गेल्या काही वर्षांत फारच महत्व मिळालं आहे. एके काळी आपल्याकडे सर्रास पांढरी कणसं मिळायची. या कणसांचे दाणे फार गोड नसायचे. त्यामुळे त्यांची उसळ छान लागायची किंवा नुसतं भाजून तूप-मीठ लावून खायलाही ही कणसं मस्त लागायची. पण गेल्या काही वर्षांत ही कणसं बाजारातून जवळपास हद्दपार झाली आहेत. अगदी ठराविक ठिकाणीच ही कणसं मिळतात. त्याउलट अमेरिकन कॉर्नचा मात्र सुळसुळाट झालाय. या कणसांचे दाणे नको इतके गोड असतात असं मला वाटतं. पण हे दाणे सॅलडमधे किंवा सूपमधे घालायला छान लागतात. पण यांची उसळ मात्र मला आवडत नाही, ती फारच गोडसर होते. हे दाणे घालून केलेला एक पुलावचा प्रकार माझ्या मुलींना खूप आवडतो. तीच रेसिपी मी आज शेअर करणार आहे.
कॉर्न पुलाव

साहित्य: २ वाट्या बासमती तांदूळ (पुलाव करण्याआधी दोन तास धुवून, पाणी काढून निथळत ठेवा), २ वाट्या स्वीट कॉर्न (उकडून ठेवा), १ वाटी किसलेलं गाजर, १ वाटी लांब पातळ चिरलेली सिमला मिरची, आवडत असल्यास १ टेबलस्पून सेलरीचे बारीक चिरलेले देठ, १ टीस्पून एव्हरेस्ट किंवा कुठलाही गरम मसाला, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तूप, फोडणीसाठी- ४ लवंगा, २ दालचिनीचे छोटे तुकडे, ८ मिरी दाणे, वरून घालायला ४ चीज क्युब्ज किसलेले (ऐच्छिक), थोडंसं ओरिगानो (ऐच्छिक), ५ वाट्या पाणी
कृती:
१) प्रथम तांदळाला गरम मसाला चोळून घ्या. गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
२) दुस-या पातेल्यात तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात लवंग, दालचिनी आणि मिरी दाणे घाला.
३) ते तडतडलं की त्यात आधी सिमला मिरची घाला. जरासं परतून मग गाजराचा किस आणि कॉर्नचे दाणे घाला.
४) सेलरी आवडत असेल तर तीही घाला. जरासं परतून घ्या. फार परतायचं नाहीये कारण या भाज्या भाताबरोबर शिजणार आहेत.
५) नंतर त्यावर मसाला चोळलेले तांदूळ घाला. चांगलं परतून घ्या.
६) तोपर्यंत पाण्याला उकळी आली असेल. ते आधणाचं पाणी तांदळात ओता. मीठ घाला आणि मध्यम आचेवर भात शिजू द्या.
७) भात शिजत आला म्हणजे पाणी आटलं की पातेलं तव्यावर घालून मंद आचेवर पूर्ण शिजू द्या.
८) भात शिजला की त्यात किसलेलं चीज आणि ओरिगानो घाला आणि हलक्या हातानं मिसळून घ्या.
कॉर्न पुलाव तयार आहे. वन डिश मील म्हणून केला तर इतका भात ४-५ लोकांना पुरतो. आणि जर साग्रसंगीत जेवणाबरोबर केलात तर मग ७-८ माणसांना पुरेल. या भाताबरोबर एखादं सूप करा किंवा दही बुंदी करा आणि एखादं सॅलड करा. संपूर्ण जेवण होईल.