उपासाची थालिपीठं

मी कुठलेही उपास करत नाही पण मला उपासाचे पदार्थ फार म्हणजे फार प्रिय आहेत. म्हणून बाकी कुठल्या दिवशी नाही पण आषाढी एकादशीला मी उपासाचे सगळे पदार्थ करते. अगदी साबुदाणा खिचडी, भगर किंवा वरीचा भात, दाण्याची आमटी, साबुदाणा वडे, उपासाची बटाट्याची भाजी, उपासाचं थालिपीठ, बटाट्याचे पापड, रताळ्याचे गोड काप. यादी वाचूनच कळतंय ना की आपण उपासाला किती पिष्टमय पदार्थ खातो ते! खरं तर उपास करणा-याला शक्ती रहावी म्हणून इतके कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ उपासाच्या दिवशी खाण्याची प्रथा असणार. पण आपण मात्र एकादशी दुप्पट खाशी ही म्हण सार्थ करतो. परत त्यात गंमतीची गोष्ट अशी की, उपास हे साधारणपणे धार्मिक कारणांसाठी केले जातात. पण त्यासाठी जे पदार्थ चालतात त्यातले बहुतांश पदार्थ हे परदेशातून येऊन आपल्याकडे स्थिरावले आहेत. म्हणजे बघा ना बटाटा आणि मिरची पोर्तुगीजांनी आणले. साबुदाणा मूळचा ब्राझिलचा पण नंतर तो दक्षिण अमेरिकेत लोकप्रिय झाला आणि नंतर स्पॅनिश तसंच पोर्तुगीजांनी त्याचा जगभर प्रसार केला. रताळंही मूळचं दक्षिण अमेरिकीच. पण हे काहीही असो. उपासाचे पदार्थ आवडत असल्यामुळे आमच्या घरी आठवड्यातून एकदा नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी किंवा उपासाची थालिपीठं होत असतात. तर आजची रेसिपी आहे उपासाच्या थालिपीठाची.

उपासाचं थालिपीठ

उपासाचं तयार थालिपीठ
उपासाचं तयार थालिपीठ

साहित्य:  २ वाट्या साबुदाणा (४ तास भिजवा), ४ मोठे उकडलेले बटाटे, १ वाटी उपासाची भाजणी, १ वाटी दाण्याचं कूट, १ टीस्पून साखर, अर्धी वाटी दही, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, थालिपीठं लावायला तूप

वाटण मसाला: ५-६ कमी तिखट हिरव्या मिरच्या, १ इंच आलं, २ टीस्पून जिरं मिक्सरमध्ये वाटून घ्या.

कृती:

१) प्रथम उकडलेला बटाटा किसून घ्या किंवा कुस्करून घ्या.

२) एका परातीत भिजवलेला साबुदाणा, बटाटा, भाजणी एकत्र करून नीट मिसळून घ्या.

३) आता त्यात वाटण, दही, कोथिंबीर, मीठ, साखर घालून नीट एकत्र करून घ्या.

४) लागल्यास पाण्याचा हात लावून थालिपीठाचं पीठ भिजवा. पण बहुतेक पाणी लागणार नाहीच.

५) थालिपीठं लहान-मोठी जशी हवी असतील तसे पिठाचे गोळे करून घ्या.

६) तव्याला तूप लावून त्यावर गोळा ठेवून थालिपीठ लावा.

७) गॅसवर मध्यम आचेवर चांगलं लाल, खुसखुशीत होईपर्यंत होऊ द्या. दोन्ही बाजुंनी भाजा.

उपासाचं थालिपीठ तयार आहे. उपासाच्या गोड लोणच्याबरोबर, दही किंवा लोण्याबरोबर द्या.

इतक्या पिठात मध्यम आकाराची ७-८ थालिपीठं होतात.

आवडत असल्यास लाल तिखट वापरू शकता. आवडत असल्यास वाटणात थोडं ओलं खोबरंही घालू शकता.

3 thoughts on “उपासाची थालिपीठं

  1. Tried your sabudana thalipeeth this morning. Divided all quantities by half, since I needed only 3-4 pieces. This was first attempt at this. The first one on a slightly curved tawa was difficult to turn around and broke. Then I used a flat non-stick and increased the ghee some more and they became easier. And like all such dishes, the last was the best. I will need to modify the type of chillies used, and a little shift in proportions and I am sure I can call guests to sample this. Thank you for widening my field.

    Like

    1. तुमच्या फीड बॅकबद्दल धन्यवाद! पुढच्या वेळेला नक्की अजून चांगली होतील. कारण जितकी प्रॅक्टिस तितका पदार्थ उत्तम जमतो. 🙂

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: