झटपट चिकन

माझ्या दोन्ही मुलींना मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. खरं तर म्हणूनच मी मांसाहारी पदार्थ करायला शिकले. माझ्या धाकट्या मुलीला, शर्वरीला चिकनचा तिखट रस्सा खायची लहर अधूनमधून येत असते. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती माझी मुलगी शर्वरी हिची मैत्रीण प्राचीसाठी. काही दिवसांपूर्वी प्राचीच्या आईनं (जी माझीही मैत्रीण आहे) मला प्राचीसाठी चिकनच्या काही चमचमीत रेसिपीज शेअर करायला सांगितलं होतं. म्हणून मी आज ही रेसिपी शेअर करणार आहे. चिकनची ही रेसिपी अतिशय सोपी, सुटसुटीत तर आहेच, शिवाय झटपट होणारी आहे. आजची रेसिपी आहे झटपट चिकन.

झटपट चिकन

तयार चिकन रस्सा
तयार चिकन रस्सा

साहित्य: १ किलो चिकन (तुकडे करून स्वच्छ धुतलेलं), ३-४ मोठे कांदे (लांब पातळ चिरलेले), १ वाटी किसलेलं सुकं खोबरं, १ ते दीड टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून खसखस, २-३ तमालपत्रं, १-२ बडी वेलची, ४-५ लवंगा, ८-९ मिरी दाणे, २-३ सुक्या लाल मिरच्या, १ टीस्पून शहाजिरं, २ टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

चिकनला लावण्यासाठीचा मसाला:  १०-१२ लसूण पाकळ्या, दीड इंच आलं, २ मिरच्या, एक वाटी कोथिंबीर हे सगळं बारीक वाटून घ्या. आणि चिकनला साधारणपणे तासभर हे वाटण आणि १ टीस्पून हळद आणि थोडंसं मीठ, अर्धी वाटी दही असं लावून ठेवा.

चिकनला मसाला लावून ठेवा
चिकनला मसाला लावून ठेवा

कृती:

मसाल्याची कृती –

१) प्रथम एका कढईत थोडं तेल घालून लांब चिरलेला कांदा चांगला काळसर लाल होईपर्यंत चांगला परतून घ्या. बाजुला काढून ठेवा.

२) आता कढई धुवून घेऊन मग त्यात सुकं खोबरं कोरडंच चांगलं लाल भाजा.

३) नंतर थोड्या तेलावर धणे, मिरच्या, खसखस आणि गरम मसाला चांगला भाजून घ्या.

४) सगळं चांगलं थंड होऊ द्या. नंतर आधी कोरडा मसाला वाटून घ्या.

५) मग त्यात परतलेला कांदा घाला आणि मिक्सरमधे चांगली एकजीव पेस्ट करा. हवं असल्यास थोड्या पाण्याचा वापर करा.

चिकनची कृती:

१) प्रथम एका पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात मसाला लावून मुरत ठेवलेले चिकनचे तुकडे घाला.

२) मध्यम आचेवर चिकनचे तुकडे मधूनमधून हलवत ५-७ मिनिटं परता. मग पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर जरा वेळ चिकन शिजू द्या.

३) आता त्यात वाटलेला मसाला घाला. सगळं नीट हलवून घ्या आणि मग लाल तिखट आणि मीठ घाला. परत एकदा सगळं नीट मिसळून घ्या. पातेल्यावर परत झाकण घाला.

४) मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या. आता त्यात आपल्याला रस हवा असेल त्या प्रमाणात पाणी घाला. साधारण २ कप पाणी घातलं तर पुरेसा दाट रस्सा होईल.

५) मोठ्या आचेवर उकळी येऊ द्या. नंतर आच मंद करा. चिकन मऊ शिजेपर्यंत शिजवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

झटपट चिकन तयार आहे.

चिकनच्या या रश्श्याबरोबर तुम्ही गरम पोळ्या किंवा भाकरी खाऊ शकता. किंवा गरम भाताबरोबर रस्सा खाऊ शकता. बरोबर चिरलेलं काकडी, कांदा, टोमॅटो, लिंबू द्या. रस्सा अजून तिखट हवा असेल तर चिकनला लावायच्या मसाल्यात मिरचीचं प्रमाण वाढवा. शिवाय लाल तिखटाचं प्रमाण वाढवा. मी तेल कमी घालते. पण हवं असल्यास तेलाचं प्रमाणही वाढवू शकता.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s