त्या-त्या सणाला ठरलेला पारंपरिक पदार्थ करायचा हा माझा शिरस्ता आहे. म्हणजे बाकी काही कर्मकांड करत नसले तरी परंपरा मला आवडतात. आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या परंपरा तर आवडतातच आवडतात! तेव्हा दस-याची पारंपरिक पाककृती म्हणजे श्रीखंड. श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, काकडीची कोशिंबीर आणि तोंडलीभात असा मस्त मेन्यू करायचा. पोटभर जेवायचं आणि छानशी वामकुक्षी घ्यायची!
श्रीखंड

साहित्य: ३ लिटर म्हशीचं दूध, दोन ते अडीच वाट्या साखर, १ ते दीड टीस्पून जायफळाची पूड, आवडत असल्यास थोडी वेलची पूड, १ टेबलस्पून चारोळी, थोडंसं केशर
कृती:
१) प्रथम दूध तापवून ते थंड करून घ्या.
२) दूध पूर्णपणे थंड झाल्यावर साय न काढता त्यात साधारणपणे एक वाटी विरजण घालून दही लावून ठेवा.
३) दही पूर्ण लागल्यावर मग ते दही एका मोठ्या चाळणीत पंचा घालून त्यावर घाला.
४) पाणी पूर्ण निथळून जाऊ द्या. पंचात दही बांधून ठेवा. साधारणपणे ३ तास ठेवा. चक्का फार कोरडा करू नका नाहीतर श्रीखंड फार घट्ट होतं.
५) तयार चक्का एका पातेल्यात काढा. त्यात साखर घालून नीट एकत्र करा.
६) हे पातेलं फ्रीजमधे ठेवून द्या. २ तासांनी साखर छान विरघळेल. आता त्यात जायफळ पूड घाला आणि मिश्रण नीट हलवून घ्या.
७) पुरणयंत्रातून श्रीखंड गाळून घ्या.
८) एका काचेच्या भांड्यात तयार श्रीखंड काढा. त्यावर केशराच्या काड्या घाला आणि चारोळी घाला.

श्रीखंड तयार आहे.
इतक्या साहित्यात ७-८ वाट्या श्रीखंड होतं. मी वेलची पूड घालत नाही पण आवडत असल्यास घाला. केशर दुधात मिसळून घातलं तर श्रीखंड केशरी रंगांचं होतं. असं करायचं असेल तर श्रीखंड गाळतानाच केशर घाला. साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. श्रीखंड नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावं म्हणजे त्याची मूळ चव जास्त काळ टिकते. स्टीलच्या भांड्यात चव बदलते.
पांढऱ्या श्रीखंडात जी मजा आहे ती केशरी श्रीखंडात नाही.. Thanks सायली..
LikeLiked by 1 person
मस्तच.. वाचूनच चव चाखल्यासारखं वाटलं..
LikeLike