कोजागिरीचं दूध

लहानपणी कोजागिरी म्हणजे मोठी मजा असायची. किती तरी दिवस आधी कोजागिरीचं प्लॅनिंग असायचं. नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीत रात्री गच्चीवर भेळेसारखं काही तरी चटपटीत खाणं आणि नंतर मस्त आटवलेलं दूध अशी मेजवानी असायची. दूध करण्यासाठी दुधवाल्याला खास लक्षात ठेवून जास्त दूध घालायला सांगायचं, सुक्यामेव्याची खरेदी करायची असा सगळा जामनिमा असायचा. आता घराच्या बाहेर पडलं की कोप-यावर हवं तेव्हा हवं तेवढं दूध मिळतं. सुकामेवाही हल्ली आपण नियमितपणे घरात ठेवतो. पण तेव्हा तसं नसायचं. सुकामेवा सणासुदीलाच घरात यायचा. अशा या निगुतीनं केलेल्या दुधाचं पातेलंच गच्चीवर न्यायचं आणि मग त्या पातेल्यात चंद्राचं प्रतिबिंब बघायचं. मगच लख्ख चांदण्यात त्या दुधाचा आस्वाद घ्यायचा. या दुधाबरोबर रंगणा-या गप्पांना काय मजा यायची! किती तरी आठवणी आहेत.

आता आपण कोजागिरीच विसरतो. मुंबईत तर चंद्र दिसणंच दुरापास्त. पुन्हा उंचचउंच इमारतींच्या गच्चीपर्यंत कोण पोहोचतंय? त्यामुळे कोजागिरीच्या आठवणीच राहिल्या आहेत. पण बाकी काही नाही तरी मस्त आटवलेलं दूध प्यायला काय हरकत आहे? म्हणूनच मी आज कोजागिरीचं दूध केलं आहे. त्याचीच रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे.

कोजागिरीचं दूध

photo 2

साहित्य: ४ लिटर म्हशीचं दूध, १ वाटी साखर, १ टीस्पून जायफळ पूड, १५-१६ काजू, ८-१० बदाम, पाव वाटी चारोळी

कृती:

१) सगळ्यात आधी दूध आटवायला ठेवा.

२) काजू-बदामाची मिक्सरमधे जाडसर भरड पूड करा.

३) दूध आटवताना पातेल्याच्या तळाशी एक स्टीलची बशी पालथी घाला. असं केल्यानं दूध उतू जात नाही.

४) दूध मंद आचेवर ठेवा आणि चांगलं आटवून घ्या. दूध घट्ट व्हायला आणि दुधाला गुलाबी रंग यायला साधारणपणे दोन तास तरी लागतात.

५) साधारणपणे दोन तासांनी आणि दुधाला चांगला रंग आला की गॅस बंद करा. ६) नंतर त्यात साखर, जायफळ पूड, काजु-बदामाची पूड घाला.

७) नीट हलवून घ्या. त्यात चारोळी घाला.

८) परत गॅसवर ठेवा. पाच मिनिटं उकळून गॅस बंद करा.

कोजागिरीचं दूध तयार आहे. हे दूध फ्रीजमधे थंडगार करा आणि मग प्या. गरम आवडत असेल तर तसं प्या. आवडत असल्यास वेलची पूड घाला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s