मिसळ

मिसळ आणि कोल्हापूर हे एक अतूट नातं आहे. मिसळीच्या मागे कोल्हापुरी हा शब्द हवाच हवा. मिसळ खाताना नाका-डोळ्यांतून पाणी आलंच पाहिजे, घाम फुटलाच पाहिजे! मटकीची उसळ, बटाट्याचा रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर असा सगळा जामानिमा केल्यावर मिसळ चवदार नाही लागली तर नवलच! काही ठिकाणी मिसळीमधे फोडणीचे कांदे-पोहे पण घालतात. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला गेलो असताना खासबागेतली प्रसिध्द मिसळ खाल्ली होती. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिसळीवर घातला जाणारा पातळ रस्सा किंवा कट. मुंबईच्या भाषेत सांगायचं तर तर्री आलेला रस्सा. ठाण्यातली मामलेदारची मिसळ प्रसिध्द आहे. इथे कमी तिखट, मध्यम तिखट आणि जहाल तिखट अशा तीन प्रकारची मिसळ मिळते. मी इथली जहाल मिसळ खाल्ली आहे. मस्त लागते! या तिखटपणावर उतारा म्हणून मग थंडगार ताकाचा पेला देतात बरोबर. दादरलाही प्रकाश आणि आस्वादमधे मिसळ मिळते. पण त्याला काही मजा नाही. ती आपली मटकीच्या ब्राह्मणी उसळीवर कांदा-फरसाण घालून दिलेली मिसळ. मिसळ खायचीच तर ती झणझणीतच खायला हवी. अर्थात मी इथे मिसळीचं खूप वर्णन केलंय खरं. पण आमच्या घरी मी सोडून बाकीचे इतर लोक अतिजहाल तिखट खात नाहीत. त्यामुळे मी जी मिसळ करते ती मध्यम तिखटच असते. तेव्हा आजची रेसिपी आहे, मिसळ.

मिसळ

photo 2
तयार मिसळ

साहित्य: १ वाटी मटकी (आदल्या दिवशी सकाळी भिजवा. संध्याकाळी उपसून मोड आणायला ठेवा), २ कांदे बारीक चिरून, २ टोमॅटो बारीक चिरून, १-२ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून रेडीमेड उसळ/मिसळ मसाला, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद

वाटण मसाला: १ टोमॅटो, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, १ टेबलस्पून ओलं खोबरं, १ दालचिनीचा तुकडा, २ लवंगा, ५-६ मिरी दाणे, मूठभर कोथिंबीर, थोडीशी शिजलेली मटकी. हे सगळं साहित्य अगदी बारीक एकजीव वाटून घ्या.

वाटलेला मसाला
वाटलेला मसाला

कृती:

१) मोड आलेली मटकी लहान कुकरला भरपूर पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून शिजायला लावा. पाण्याला उकळी आल्यावर मग कुकरची शिटी लावा. जेमतेम एक शिटी करून गॅस बंद करा. मटकीचा लगदा होता कामा नये.

२) कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हिंग घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं परता.

३) कांदा चांगला शिजला की मग त्यात टोमॅटो घाला.

४) टोमॅटो शिजल्यावर त्यात हळद आणि १ टीस्पून तिखट घाला. चांगलं परतून घ्या.

५) नंतर त्यात वाटलेला मसाला घाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत मधूनमधून हलवत मसाला चांगला होऊ द्या.

६) त्यात शिजवलेली मटकी पाण्यासकट घाला. रस अगदी पातळ असायला हवा.

७) उसळीला उकळी आली की त्यात तिखट, काळा मसाला, मिसळ मसाला घाला. परत थोडंसं मीठ घाला. सगळं नीट हलवून घ्या आणि खळखळून उकळी येऊ द्या.

८) उकळल्यावर गॅस बंद करा. मिसळ तयार आहे.

मिसळ देताना, बोलमधे प्रथम शिजलेली उसळ घाला. त्यावर फरसाण घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. वरून लिंबू पिळा. पावाबरोबर आवडत असल्यास तशी खा किंवा नुसतीच खा.

माझी ही रेसिपी फार तिखट नाहीये. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर मसाल्याचं आणि तिखटाचं प्रमाण वाढवा. उकडलेला बटाटा आवडत असेल तर मिसळ देताना उसळीवर आधी बटाट्याच्या फोडी घाला किंवा रस्सा करताना त्यातच बटाटा घाला. मी कुठलाही मसाला घालते. परवा माझ्याकडे मिसळ मसाला नव्हता तर मी शेव भाजीचा मसाला वापरला. मिसळ फर्मास झाली होती. तेव्हा आपल्या आवडीनुसार कुठलाही मसाला बिनधास्त वापरा!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s