मॅकरोनी विथ चीज

कितीही वेगववेगळ्या प्रकारचे पदार्थ केले तरी माझ्या मुलींना असं वाटतं की मी खायला तेच ते करते. मग एखाद्या दिवशी दोघीही जणी आज चांगलं काही तरी खायला कर असं म्हणतात. त्यांच्या भाषेत चांगलं काही तरी म्हणजे, मैदा, बटर, चीज असं रिफांइड साहित्य वापरलेले पदार्थ! जे फारसे वापरायला मी तयार नसते. म्हणजे मी रेडीमेड बटरऐवजी घरी केलेलं लोणी किंवा घरचं तूप वापरते, मैद्याऐवजी मी नेहमी कणीक वापरते, अगदी व्हाइट सॉस करायलाही. चीज मला स्वतःलाही आवडतं शिवाय चीजमधे प्रथिनांचं प्रमाणही जास्त असतं. पण तरीही ते प्रमाणात खावं असा माझा आग्रह असतो. पण एखादा दिवस असा येतोच की, त्यांना असा त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ फारच खावासा वाटतो. मग मात्र मी अशी एखादी रेसिपी करतेच. त्यातलीच एक रेसिपी मी आज शेअर करणार आहे. आजची रेसिपी आहे मॅकरोनी विथ चीज.

तयार मॅकरोनी विथ चीज
तयार मॅकरोनी विथ चीज

साहित्य:  १ पॅकेट मॅकरोनी, २ कांदे मध्यम चिरलेले, १ वाटी फरसबी बारीक चिरलेली, १ वाटी कॉर्न दाणे उकडलेले, १ वाटी गाजर स्लाइस केलेले, १ वाटी सिमला मिरची लांब पातळ चिरलेली, १ ते २ वाट्या मश्रूम पातळ स्लाइस केलेले, २ टोमॅटो मोठे चिरलेले, ५ टोमॅटोंचा रस, ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, १ वाटी किसलेलं चीज, १ कप दूध, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल (नसेल तर कुठलंही तेल चालेल), १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून मिरपूड, १ टीस्पून साखर, अर्धा टीस्पून मोहरीची पूड, १ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टीस्पून रेड चिली सॉस, १ टीस्पून ओरिगानो, १ टीस्पून मिक्स्ड इटालियन हर्ब्ज, १ टीस्पून चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार

कृती:

१) गॅसवर मोठ्या भांड्यात ५-६ कप पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात १ टीस्पून तेल आणि चिमूटभर मीठ घालून त्यात मॅकरोनी घाला. मॅकरोनी साधारणपणे ५ मिनिटांत शिजते. मॅकरोनी फार जास्त शिजवू नका पण कच्चीही राहू देऊ नका.

२) मॅकरोनी शिजत आली की पारदर्शक होते. शिजलेली मॅकरोनी मोठ्या चाळणीत उपसून घ्या आणि त्यावर थंड पाणी ओता म्हणजे ती शिजण्याची प्रक्रिया थांबेल. पाणी पूर्ण निथळलं की, मॅकरोनी एका ताटात काढून त्यावर थोडंसं तेल घालून हलक्या हातानं मिसळून घ्या. असं केल्यानं मॅकरोनी एकमेकांना चिकटत नाही.

३) एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घालून ते गरम करा. त्यावर ठेचलेला लसूण घाला. एकदाच हलवून त्यात कांदा घाला.

४) कांदा जरासा पारदर्शक झाला (लाल करायचा नाहीये) की त्यात फरसबी आणि गाजर घाला.

५) झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. नंतर त्यात मश्रूम घालून एक मिनिटभर परता. मश्रूमला पाणी सुटायला लागलं की त्यात टोमॅटो आणि टोमॅटोचा रस घाला. झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत शिजू द्या.

६) नंतर त्यात कॉर्न दाणे आणि सिमला मिरची घाला. परत एक वाफ काढा.

७) आता त्यात तिखट, मीठ, साखर, केचप, चिली सॉस, मिरपूड, मोहरीची पूड हे सगळं घाला. नीट एकत्र करा आणि या सॉसमधे १ कप पाणी घाला.

८) सॉसला चांगली उकळी येऊ द्या. उकळल्यावर गॅस बंद करा.

९) जेव्हा मॅकरोनी विथ चीज तयार करायचं असेल तेव्हा एका बेकिंगच्या भांड्यात मॅकरोनी घ्या. त्यात तयार सॉस घाला. नीट मिसळून घ्या. चव बघून मीठ-मिरपुडीचं प्रमाण वाढवा.

१०) त्यात दूध घाला (बरेच जण व्हाईट सॉस करून घालतात पण मी नुसतं दूध घालते). ओरिगानो, इटालियन हर्ब्ज घाला. नीट एकत्र करून घ्या.

११) त्यावर किसलेलं चीज घाला. वर चिली फ्लेक्स घाला. ओव्हनमधे किंवा मायक्रोवेव्हला २०० डिग्रीवर २० मिनिटं बेक करा. ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसेल तर एका नॉनस्टिक भांड्यात घाला. मंद गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्या.

मॅकरोनी विथ चीज तयार आहे.

मॅकरोनीत जर व्हाईट सॉस घालायचा असेल तर

१) १ टेबलस्पून कणीक थोड्याशा लोण्यावर किंवा तुपावर हलकी भाजून घ्या.

२) गार झाल्यावर त्यात पाव कप दूध घालून चांगली पेस्ट करून घ्या.

३) नंतर त्यात २ कप कोमट दूध घाला. मंद आचेवर गॅसवर हलवत शिजवा.

४) सॉस घट्ट झाला की गॅस बंद करा. त्यात मीठ-मिरपूड आणि आवडत असल्यास चिमूटभर जायफळाची पूड घाला.

५) मॅकरोनी तयार करताना त्यात टोमॅटो सॉसबरोबर हा सॉस घाला. मग दूध घालू नका. बाकीची कृती तशीच करा.

भाज्या आपल्या आवडीनुसार वापरा. सगळ्याच वापरल्या पाहिजेत असं नाही. पण जितक्या जास्त भाज्या वापराल तितकी चव चांगली येईल. वन डिश मील म्हणून केलीत तर चार जणांना पुरेल. आणि संपूर्ण जेवणातला एक पदार्थ म्हणून केलात तर ५-६ जणांना पुरेसा होईल. मॅकरोनी, एखादं सूप आणि गार्लिक टोस्ट असा बेत करता येऊ शकतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: