दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. कालपासून मी थोडा-थोडा फराळ करायला सुरूवात केली आहे. आज मी तुमच्यासाठी चकली, चिवडा आणि गुलकंद करंज्यांच्या रेसिपीज शेअर करणार आहे.
चकली

साहित्य: ५ फुलपात्रं चकलीची भाजणी ( मी याआधीच्या पोस्टमधे भाजणीची रेसिपी शेअर केली होती, पण जर ती नसेल तर रेडीमेड भाजणीही चालेल), ३ फुलपात्रं पाणी, ५ टीस्पून घरचं लोणी किंवा तेल, २-३ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, २ टेबलस्पून तीळ, १-२ टीस्पून ओवा, मीठ चवीनुसार. (कधीकधी रेडीमेड भाजणीत मसाला घातलेला असतो, ते बघून घ्या) तळण्यासाठी तेल.
कृती:
१) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
२) पाण्याला खळखळून उकळी आली की त्यात लोणी किंवा तेल, तिखट, मीठ, हळद, तीळ आणि ओवा घाला. गॅस बंद करा.
३) आता त्यात भाजणी घाला आणि चमच्यानं एकत्र करून घ्या.
४) गरम असताना नीट एकत्र होणार नाही तेव्हा जसं जमेल तसं एकत्र करा. झाकून ठेवून द्या.
५) २-३ तासांनी किंवा पीठ थंड झाल्यावर ते परातीत काढून घ्या. चांगलं मळून घ्या. मळताना लागेल तसं साधं पाणी घाला. चकलीचं पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरासं घट्ट हवं.
६) मळलेलं पीठ चकलीच्या सो-यात घाला. चकल्या पाडा.
७) कढईत तेल कडकडीत गरम करा. नंतर आच मध्यम ठेवा. चकल्या लाल रंगावर तळा. तेलाचं तापमान सतत एकसारखं राह्यला हवं. म्हणून तेल जरा थंड झालंय असं वाटलं तर आच वाढवा. पण गरम झाल्यावर परत मध्यम ठेवा. चकल्या फार लाल करू नका.
चकल्या तयार आहेत.
चकल्यांना हळद कमीच घालावी म्हणजे रंग छान येतो. मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.
चिवडा

साहित्य: पाव किलो पातळ पोहे, ३ वाट्या कुरमुरे, २ वाट्या सुक्या खोब-याचे काप, १ ते दीड वाटी शेंगदाणे, १ वाटी डाळं, १ वाटी कढीपत्ता, १ टेबलस्पून धणे पूड, १ टेबलस्पून जिरे पूड, २ टेबलस्पून पिठासाखर, १ टेबलस्पून लाल तिखट, १ ते दीड टीस्पून हळद, १ टीस्पून आमचूर, मीठ चवीनुसार, दीड वाटी तेल, मोहरी, थोडासा हिंग
वाटण मसाला: एक गड्डा सोललेला लसूण, १ मोठी कोथिंबीरीची जुडी, ३-४ हिरव्या मिरच्या
हे सगळं वाटून गोळा करून घ्या.
कृती:
१) एका कढईत अगदी थोडे थोडे पोहे घालत मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्या. सतत हलवू नका. पोहे अगदी थोडे थोडे घालून भाजा. जमल्यास हॅंडल असलेली कढई घ्या. म्हणजे कढईच उचलून हलक्या हातानं पोहे भाजता येतील.
२) कुरमुरेही कुरकुरीत भाजून घ्या.
३) आता कढईत तेल घालून त्यात खोब-याचे काप तळून घ्या आणि ते बाहेर काढा. नंतर शेंगदाणे तळून घ्या, तेही बाजुला ठेवा. सगळ्यात शेवटी डाळं तळून घ्या आणि बाजुला ठेवा.
४) आता त्याच तेलात थोडी मोहरी घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला.
५) त्यात वाटलेला मसाल्याचा गोळा घाला. हा मसाला सतत हलवत अगदी कोरडा होईपर्यंत चांगला परता. त्यात हळद घाला आणि गॅस बंद करा.

६) परतलेल्या मसाल्यावर पोहे, कुरमुरे घाला. त्यावर तळलेले दाणे, खोब-याचे काप आणि डाळं घाला. त्यावर धणे-जिरे पूड, पिठी साखर, आमचूर, तिखट, मीठ घाला.
७) सगळं नीट एकत्र करा. हवं तर मोठ्या वर्तमानपत्रावर सगळं काढून हलक्या हातानं नीट मिसळून घ्या. डब्यात भरा. पूर्ण थंड झाल्यावर झाकण लावा.
चिवडा तयार आहे
गुलकंद करंज्या
पारीसाठीचं साहित्य: १ वाटी रवा, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ, अर्धा टीस्पून साखर, १ टेबलस्पून तूप किंवा तेल
सारणासाठीचं साहित्य: ३ वाट्या ओलं खोबरं, १ वाटी साखर, २ टेबलस्पून गुलकंद
पारीची कृती:
१) मिक्सरमधे रवा आणि मैदा कोरडाच अगदी बारीक होईपर्यंत फिरवा.
२) नंतर परातीत काढून त्यात तूप किंवा तेल कडकडीत गरम करून घाला.
३) मीठ आणि साखर घाला. हे सगळं हातानं कोरडंच चोळून अगदी एकजीव करा.
४) नंतर बेताचं पाणी घालून पीठ भिजवून ठेवा. पुरीसाठी भिजवतो तितपत घट्ट भिजवा.
सारणाची कृती:
१) नॉनस्टिक कढईत खोबरं आणि साखर एकत्र करून कोरडं होईपर्यंत शिजवून घ्या. मोठ्या आचेवर ठेवा आणि सतत हलवा.
२) मिश्रण कोरडं झालं की गॅस बंद करा. जरासं थंड झालं की त्यात गुलकंद मिसळा.
करंजीची कृती:
१) नेहमीसारखी पुरी लाटा. अर्ध्या भागावर थोडंसं सारण भरा.
२) करंजी दुमडा, कातण्यानं कापा.
३) तूप गरम करून तळा.
माझी बहिण करंज्या तयार करून डब्यात अल्युमिनियम फॉइल घालून, त्याला तुपाचा हात लावून त्यावर करंज्या ठेवते. त्यावर परत फॉइल घालते. परत करंज्या ठेवते. आणि वर फॉइल घालून डबा बंद करून फ्रीजरमधे ठेवते. हव्या असतील तेव्हा गरम तळते. मीही यावेळी असंच केलं आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तळणार आहे. पण मी करंज्यांच्या कृतीचे फोटो काढायला काल घाईत विसरले आहे. तेव्हा आज या रेसिपीचे फोटो नाहीत.
करंज्या तळण्याआधी दहा मिनिटं फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवा. जर त्या उकलल्या असतील तर दुधाचा हात लावून बंद करा आणि तळा.
खुनच सुंदर माहीती दिली आहे.
LikeLike
मी तुम्ही सांगितली तशीच चकली केली,गरम आहे तोवर छान खुसखुशीत राहते, पण थंड झाल्यावर मऊ पडते!!!, काय करु….
LikeLike
Thanks mam
LikeLike
Chaklichi bhajni Chan ahe me challa Kelly saglyana avdly
LikeLike