मित्र-मैत्रिणींनो, आधी तर सॉरी. दिवाळी संपत आली आहे आणि ब-याच जणांनी मला बेसनाच्या लाडूंची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. पण आमच्या नेट-क्या दिवाळी अंकाच्या कामामुळे मला ती वेळेवर शेअर करता आली नाही. कारण रेसिपी शेअर करायची असेल तर ती मला आधी करावी लागते, त्याचे फोटो काढावे लागतात, तरच मला ती आपल्या या पेजवर शेअर करता येते.
खरं सांगायचं तर मला स्वतःला गोड पदार्थ फारसे चांगले करता येत नाहीत. स्वतःला फारसं गोड खायला आवडत नाही म्हणून असेल कदाचित, पण असं आहे एवढं मात्र खरं. त्यात पुन्हा मला लाडू तर अजिबातच करता येत नाहीत. अन्न हेच पूर्णब्रह्मच्या निमित्तानं मीही लाडू करायला शिकले आहे! काही दिवसांपूर्वी मी रव्याच्या लाडूंची रेसिपी शेअर केली होती तशीच आज बेसनाच्या लाडूंची रेसिपी देते आहे. मी जे लाडू केले त्यात तूप जास्त झालं होतं. त्यामुळे लाडू अगदी गरगरीत गोल झाले नाहीत. पण म्हणून तुम्हाला रेसिपी देताना मात्र तुपाचं प्रमाण मी कमी करून सांगते आहे.
बेसनाचे लाडू
साहित्य: २ वाट्या जाडसर रवाळ बेसन (डाळीचं पीठ), पाव ते अर्धी वाटी साजूक तूप (चितळ्यांचं वापरावं कारण त्याचा वास चांगला असतो), १ ते सव्वा वाटी पिठीसाखर, अर्धा टीस्पून वेलची पूड, वर लावण्यासाठी बेदाणे, काजू किंवा बदाम काहीही चालेल. (तयार जाड बेसन फार जाड वाटलं तर थोडंसं मिक्सरमधे कोरडंच फिरवून घ्या)
कृती –
१) एका नॉनस्टिक कढईत बेसन भाजायला घाला. आधी तूप न घालता कोरडंच भाजा. मध्यम आच ठेवून सतत हलवत भाजा. बेसन लवकर जळतं म्हणून लक्षपूर्वक भाजा.
२) बेसनाचा खमंग वास यायला लागला आणि रंग लालसर व्हायला लागला की त्यात तूप घाला. सगळं तूप एकदम घालू नका. थोडंथोडं घालून अंदाज घ्या आणि मग हवं तसं घाला.
३) तूप घालून परत मध्यम आचेवर सतत हलवत बेसन आणखी खमंग भाजा. गॅस बंद करा.
४) बेसन कोमट झाल्यावर मग त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड मिसळा. गरम असताना मिसळू नका कारण मग साखर विरघळून मिश्रण पातळ होईल.
५) नंतर त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळा.
इतक्या मिश्रणात मध्यम आकाराचे वीस लाडू होतात.
Majhi chakali bighdali. Sangitlyapramane sarv sahitya ghetale pan chakli telat taktach (phasphaste) suti hote. kahi upay suchat asel tar pls. Reply kara.
LikeLike
Tup must garam karun that besan bhajaletar khup chan bhajate . kharpus vas yeto
LikeLike