हॅलो, ब-याच दिवसांत आपल्यात काहीच गप्पा झाल्या नाहीयेत. आधी तर सॉरी, कारण दिवाळी अंकाच्या कामामुळे मला माझ्या या आवडत्या पेजकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही म्हणून तुमच्याशीही गप्पा झालेल्या नाहीत. म्हणजे तुमचा जर असा समज असेल की, या काळात मी स्वयंपाकच केलेला नाही तर तसं नाहीये! मी रोजचा स्वयंपाक करत होतेच. पण तो घाईघाईत उरकत असल्यामुळे, त्यासाठी शांतपणे फोटो काढायला मला जमलं नाही. त्यामुळे तुमच्याबरोबर रेसिपीज शेअर करता आल्या नाहीत. पण आता मी नेहमीसारखं, दर दोन दिवसांनी एक नवीन रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे, पनीर-सिमला मिरचीच्या झटपट भाजीची. ही भाजी करायला अतिशय सोपी आहे, आणि पनीर आवडणा-यांना ती नक्की आवडेल. या भाजीची सगळी गंमत आहे ती भाजी चिरण्यात. या भाजीसाठी लागणारा कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो हे एकसारखे पातळ लांब चिरायचे आहेत. शिवाय आलंही पातळ लांब चिरायचं आहे. भाजीत पांढरं पनीर आणि पांढरा कांदा, लालबुंद टोमॅटो, फिक्या तपकिरी रंगाचं आलं, हिरवीगार सिमला मिरची आणि लालभडक सुकी मिरची यामुळे भाजी नुसतीच चवदार होत नाही तर नयनरम्यही होते. तेव्हा करून बघा आणि कशी झाली ते नक्की कळवा.
झटपट पनीर-सिमला मिरची भाजी

साहित्य – दोन कप पनीर (लांब चिरलेलं), २ सिमला मिरच्या (लांब पातळ चिरलेल्या), २ मोठे टोमॅटो (बिया काढून लांब पातळ चिरलेले), २ मोठे कांदे (लांब पातळ चिरून पाकळ्या सुट्या करून घ्या), २ इंच आलं (साल काढून लांब पातळ चिरून घ्या), २-३ सुक्या लाल मिरच्या, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट किंवा इतर कुठलाही गरम मसाला, १ ते दीड टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून व्हाईट व्हिनेगर (ऐच्छिक), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, १ टीस्पून जिरं

पनीरची कृती –
१) प्रथम एका पातेल्यात दूध उकळायला ठेवा.
२) दुधाला चांगली उकळी आली की गॅस अगदी बारीक करून त्यात फेटलेलं दही आणि लिंबाचा रस घाला.
३) दूध पूर्ण फुटून चोथा पाणी वेगळं होईपर्यंत हलवत रहा. नंतर गॅस बंद करा.
४) एका लहान बुडाच्या चाळणीत (साधारणपणे कप बशीतली बशी असते त्या व्यासाच्या) स्वच्छ पंचा घालून त्यात फुटलेलं दूध घाला.
५) पूर्ण पाणी निथळू द्या. नंतर पंचात गुंडाळून तसंच चाळणीत दाबून पाणी काढून टाका. अर्धा तास तसंच ठेवा.
पनीर तयार आहे. हे पनीर हवं असल्यास लगेच वापरा किंवा फ्रीजमध्ये दोन दिवस टिकतं. एवढ्या पनीरचे साधारणपणे 2 वाट्या चौकोनी तुकडे होतात.

भाजीची कृती –
१) पसरट नॉनस्टिक पॅनमधे तेल गरम करा.
२) त्यात जिरं घालून तडतडू द्या. आता त्यात आलं आणि लाल मिरची घाला. जरासं परता. ३) नंतर त्यात कांदा घालून मध्यम आचेवर मधून मधून हलवत कांदा चांगला शिजू द्या.
४) त्यात सिमला मिरची घाला. सिमला मिरची चांगली परतून घ्या.
५) आता त्यात टोमॅटो घाला.
६) टोमॅटो चांगला शिजला की त्यात लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि हवं असल्यास व्हिनेगर घाला.
७) सगळं नीट मिसळून घ्या. त्यात पनीर घाला. नीट हलवून झाकण घाला. ३-४ मिनिटं मंद आचेवर ठेवा. झाकण काढून गॅस बंद करा.
पनीर-सिमला मिरचीची झटपट भाजी तयार आहे. गरम साध्या पोळ्या, फुलके किंवा साध्या पराठ्यांबरोबर खा. बरोबर झटपट होणारं दालफ्राय करा (रेसिपी लवकरच शेअर करेन). आणि सॅलड कापा. मस्त चमचमीत जेवण होईल.
रेसीपींबद्दल धन्यवाद
LikeLiked by 1 person
Liked all ur Recipes ,they are Easy,simple and Tasty 😊
LikeLike
Like all ur Recipes ,they are Easy ,Simple and Tasty 😊
LikeLike
झकास .
Very nice recipe.
I’ll try.
LikeLike