या आधी मी पनीरच्या भाजीची झटपट रेसिपी शेअर केली होती. त्या पोस्टमधे शेवटी मी लिहिलं होतं की ही भाजी, झटपट दालफ्राय आणि पराठ्यांबरोबर किंवा साध्या पोळ्यांबरोबर छान लागते. आज मी त्याच झटपट दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. हे दाल फ्राय तुम्ही या भाजीबरोबर करा किंवा जिरा राईसबरोबर किंवा पुलावबरोबर करा, उत्तम लागतं आणि खरोखर अतिशय झटपट होतं. आज मी दाल फ्राय आणि जिरा राईसची रेसिपी शेअर करणार आहे. हे दोन्ही पदार्थ मी डायरेक्ट कुकरमध्ये करते. कुकरमध्ये डायरेक्ट केल्यानं कुठलाही पदार्थ करण्यातल्या पाय-या तर वाचतातच पण पोषणमूल्यंही अधिक मिळतात.
आपण दाल फ्राय ब-याच ठिकाणी खातो. वेगवेगळ्या प्रकारचं खातो. शिजवलेल्या वरणावर जरा सढळ हाताने तेल-तूप किंवा बटर वापरून केलेली चमचमीत फोडणी घातल्याशिवाय दाल फ्राय होऊच शकत नाही. मुंबईत फोर्ट भागात एक तृष्णा नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथे हैदराबादी दाल नावाचा दाल फ्रायचा अप्रतिम प्रकार मिळायचा. अजूनही मिळत असेल, पण मी हल्ली गेलेले नाही. तर त्या दाल फ्रायवरच्या फोडणीची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. तेल कडकडीत गरम करून त्यात मुक्त हस्तानं घातलेलं जिरं, अगदी बारीक चिरलेला, लाल केलेला लसूण, कुरकुरीत कढीपत्ता आणि लहानखु-या लालभडक बोर मिरच्या. आहाहा! काय सुंदर लागायची ती हैदराबादी दाल! त्याच धर्तीवर मी आज दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. अर्थात ही डाळ कुकरमध्ये केलेली असल्यानं ती अतिशय कमी तेलात होते हे जरी खरं असलं तरी फोडणी मात्र कुरकुरीत रहात नाही. पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है!
झटपट दाल फ्राय

साहित्य – १ वाटी मूग डाळ (धुवून, अर्धा तास निथळत ठेवा), १ कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, १ इंच आलं लांब पातळ चिरलेलं, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ लाल मिरच्या, १ टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, २ टीस्पून तेल, १ टीस्पून जिरं फोडणीसाठी, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार
कृती –
१) लहान कुकरला तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं घालून तडतडू द्या.
२) आता त्यात हिंग घाला आणि लगेचच लाल मिरची आणि कढीपत्ता घाला.
३) जरासं हलवून त्यात लसूण आणि आलं घाला.
४) लसूण लालसर झाला की त्यात कांदा घाला. जरा वेळ झाकण ठेवून कांदा शिजू द्या.
५) कांदा गुलाबी झाला की त्यात टोमॅटो घाला. परत झाकण घालून शिजू द्या.
६) टोमॅटो जरासा शिजला की त्यात हळद, तिखट, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर घाला.
७) सगळं नीट हलवून घ्या. नंतर त्यात धुतलेली मूग डाळ घाला. सगळं एकत्र करा.
८) त्यात दोन कप पाणी घाला. शिटीसकट कुकरचं झाकण लावा. मध्यम आचेवर एक शिटी करा. दोन मिनिटं मंद आचेवर ठेवा.

९) गॅस बंद करा. कुकरचं प्रेशर गेल्यावर तयार दाल फ्राय भांड्यात काढा. फार घट्ट वाटलं तर काढण्याआधी त्यात थोडं पाणी घालून एकसारखं करा. पण दाल फ्राय घट्टच असतं.
या दाल फ्रायबरोबर खायला झटपट जिरा राईस छान लागतो.
जिरा राईस

साहित्य – १ वाटी बासमती तांदूळ (धुवून पाणी निथळून तासभर ठेवा), ६-७ लसूण पाकळ्या (पेस्ट करा), १ टेबलस्पून साजुक तूप, १ टेबलस्पून जिरं, १ तमालपत्र, १ दालचिनीचा तुकडा, ७-८ मिरी दाणे, २ वेलच्या, अर्धा टीस्पून मीठ
कृती –
१) धुतलेल्या तांदळाला लसूण पेस्ट चोळा.
२) लहान कुकरमधे तूप गरम करा. तूप तापलं की त्यात जिरं आणि खडा मसाला घालून चांगलं तडतडू द्या.
३) त्यात लसूण पेस्ट चोळलेले तांदूळ घाला. सतत हलवत चांगले परता.
४) तांदूळ चांगले परतले की त्यात २ वाट्या पाणी घाला. मीठ घाला.
५) कुकरचं झाकण शिटीसकट लावा. मध्यम आचेवर एक शिटी करा.
६) कुकरचं प्रेशर गेलं की भात हलक्या हातानं एकत्र करून भांड्यात काढा.
जिरा राईस तयार आहे.
इतकं दाल फ्राय आणि जिरा राईस साधारणपणे २-३ माणसांना पुरतं. त्याबरोबर एखादं झटपट सॅलड करा. ३५-४० मिनिटांत तुमचा सगळा स्वयंपाक तयार होईल.
जिरा राईस दाल फ्राय आणि डोसाही अप्रतिम…. फोटो तर फारच सुरेख, जणू काही आताच पानात वाढले आहे… तोंडाला पाणीच सुटले…
LikeLike
नीलिमाताई, खायला या. आपण आमच्या ब्लॉगला भेट दिलीत, आम्ही भरून पावलो!
LikeLike
दाल फ्रायची रेसिपी मस्त. मी करते तेव्हा सगळ्या डाळी घालते. आणि वरून फोडणी, तवंग दिसायला हवा म्हणून.
जीरा राइस करताना मी भात शिजवून घेते, तेलात जिरं, बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर तयार भात घालून जरा परतते. लसूण पेस्टची आयडिया आवडली. आता पुढच्या वेळी तसा करणार.
LikeLike
dal fry mala kadhi jamli nahi pn atta karun baghen
LikeLike
Sayali tai , hya blog war fakt tomato soup chi recepie aahe ajun veg-veglya soups chya recipes pan share kara na please.
LikeLike
हो. नक्की करेन.
LikeLike