भारतीय जेवणात डाळीला फार महत्व आहे. कदाचित असंही असेल की आपल्या देशात तुलनेनं शाकाहारी लोकांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण जेवणात डाळींचा वापर जास्त करत असू. भारतातल्या जवळपास सर्व प्रांतांमधे जेवणात डाळीचा आमटीसदृश पदार्थ असतोच असतो. शिवाय आपल्याकडे भाज्यांमधे भिजवलेल्या डाळी घालतात. किंवा पीठ पेरून भाज्या केल्या जातात त्याही बहुतेकदा डाळींची पिठं वापरूनच. कडधान्य हेही एकप्रकारे डाळींचंच दुसरं रूप. त्यांचाही वापर आपल्या जेवणात मुबलक प्रमाणात होत असतो. विशेषतः महाराष्ट्रीय जेवणात वरण किंवा आमटी ही हवीच हवी. मग ते साधं वरण किंवा गोड वरण असो, फोडणीचं वरण असो, चिंच गुळाची आमटी असो, लसणाच्या फोडणीचं वरण असो, आंबट वरण असो, गोळा वरण असो की पालेभाज्या घालून केलेलं ताकातला पालक किंवा मेथीचं वरण असो. आपल्या जेवणात रोज वरण हे असतंच. आज मी माझ्या माहेरी जवळपास रोज होणा-या चिंचगुळाच्या वरणाची (होय, आम्ही आमटी म्हणत नाही!) रेसिपी शेअर करणार आहे. हे वरण माहीत नाही असा मराठी माणूस विरळाच. मला स्वतःला गरम भाताबरोबर भरपूर तूप घालून किंवा गरम पोळी कुस्करून त्यात हे वरण घालून खायला फार आवडतं. तेव्हा आजची रेसिपी आहे चिंचगुळाचं वरण.
चिंचगुळाचं वरण

साहित्य – १ वाटी तूरडाळीचं शिजवलेलं आणि घोटलेलं वरण, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, १ टेबलस्पून गूळ, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी – २ टीस्पून तेल, थोडीशी मोहरी, पाव टीस्पून हिंग, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, १ टीस्पून ओलं खोबरं ऐच्छिक

कृती –
१) कढईत किंवा पातेल्यात तेल चांगलं गरम करा. त्यात मोहरी घालून ती तडतडू द्या.
२) त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला. लगेचच हळद आणि तिखट घाला. फोडणी जळता कामा नये.
३) तिखटावर अर्धी वाटी पाणी घाला. नंतर त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला.
४) गूळ विरघळला की त्यात आणखी थोडं पाणी घाला. आता त्यात काळा मसाला, मीठ, कोथिंबीर घाला आणि सगळं मिश्रण चांगलं उकळू द्या.
५) मिश्रणाला उकळी आली की त्यात घोटलेलं वरण घाला. आपल्याला वरण जितपत पातळ हवं असेल त्या प्रमाणात पाणी घाला.
६) वरणाला चांगली उकळी येऊ द्या. वरण उकळलं की त्यात ओलं खोबरं घाला.
७) गॅस बंद करा. चिंचगुळाचं वरण तयार आहे.
वरण अजून चविष्ट करायचं असेल तर त्यात १ टीस्पून काळा मसाला आणि १ टीस्पून सांबार मसाला घाला.
मी म्हटलं तसं मला हे वरण गरम भाताबरोबर किंवा गरम पोळीबरोबरही खूप आवडतं. नाहीतर नुसतंच सूपसारखं प्यायलाही.
तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं ते.