पेंडभाजी किंवा पेंडपाला

महाराष्ट्रातल्या बहुतेक गावांमधे भाकरीबरोबर वरणाचे किंवा डाळीचे घट्ट प्रकार खाण्याची पध्दत आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात गोळा वरणाबरोबर किंवा घट्ट पिठल्याबरोबर भाकरी खातात. आमच्याकडे मराठवाड्यात तुरीचं शिजवलेलं घट्ट वरण, त्यावर कच्चं तेल, तिखट, काळा मसाला घालून, वर बारीक चिरलेलं कांदा-कोथिंबीर घालून खातात. कच्चं तेल आवडत नसेल तर मग लसणाची फोडणी घालूनही खाता येतं. हे वरण गारच खायचं असतं. हा प्रकार अफलातून लागतो. काही ठिकाणी डाळ-मेथीचं वरण असंच घट्ट केलं जातं. तुरीची डाळ मेथी दाणे घालून शिजवायची, त्यात चिंच गूळ घालून हाटायचं, थोडा काळा मसाला घालायचा आणि वरून लसणाची फोडणी द्यायची. वरणाचा हा प्रकारही मस्त लागतो. साता-याकडे चणाडाळ भिजवून त्यात लसूण-हिरव्या मिरचीचं वाटण घालून घट्ट पिठलं करतात. शिवाय शेंगदाण्याच्या कुटाचाही म्हाद्या नावाचा अफलासून प्रकार साता-यात केला जातो. हा प्रकार टिकाऊ असतो. सातारा भागातले बरेच लोक सैन्यात आहेत. ते जेव्हा सुटीवरून परत जातात तेव्हा त्यांच्याबरोबर हा प्रकार दिला जातो कारण तो काही दिवस टिकतो. अर्थात हे सगळे प्रकार ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबरच खायचे. आज मी अशाच एका पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे. माझी आई हा पदार्थ फार छान करते. मी जेव्हा माहेरी जाते तेव्हा एक दिवस खास या पदार्थासाठी, पेंडपाल्यासाठी राखून ठेवलेला असतो. आजची रेसिपी आहे पेंडपाला किंवा पेंडभाजी.

पेंडभाजी

तयार पेंडभाजी
तयार पेंडभाजी

साहित्य – १ वाटी चणा डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मोडलेली गवार, २ टीस्पून मेथी दाणे, दीड टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काळा मसाला, पाव टीस्पून हळद, २ टीस्पून का-हळाची (खुरासणी) पूड, ४-५ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, २ टीस्पून तेल, फोडणीसाठी मोहरी, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार

वरून घ्यायच्या फोडणीसाठी – पाव वाटी तेल, मोहरी, १५-२० लसूण पाकळ्या गोल चिरून, ४-५ सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद

कृती –

१) दोन्ही डाळी आणि मेथीदाणे एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या.

२) कुकरच्या भांड्यात घालून त्यात बेताचं पाणी घाला. साधारणपणे २ ते अडीच वाट्या पाणी पुरे होईल. त्यात गवारीचे मोडलेले तुकडे घाला.

३) कुकरला शिजवून घ्या. तीन शिट्या पुरे होतील. चणा डाळ पूर्ण राहिली पाहिजे, मोडता कामा नये.

४) शिजवलेली डाळ हलक्या हातानं एकत्र करा. डाळीचे दाणे दिसायला हवेत.

शिजवलेली डाळ
शिजवलेली डाळ

५) कढईत तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग घाला. त्यातच पाठोपाठ हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच शिजलेली डाळ घाला. नीट हलवून घ्या.

६) त्यात मीठ, काळा मसाला आणि का-हळाची पूड घाला. परत हलवून घ्या. मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.

७) उकळी आली की गॅस बंद करा. पेंडभाजी तयार आहे. पेंडभाजीवर वरून फोडणी घालून खातात.

वरून घालण्याची फोडणी –

१) छोट्या कढईत तेल कडकडीत गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.

२) मोहरी तडतडली की त्यात लसणाचे तुकडे घाला. ते चांगले लाल, कुरकुरीत होऊ द्या.

३) आता त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्या परतल्या की चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घाला. गॅस बंद करा.

पेंडभाजी देताना ताटात पेंडभाजी घ्या. त्यावर तयार फोडणी घाला. बरोबर गरम भाकरी, लोण्याचा गोळा आणि ताजं ताक द्या. मला इतकं असेल तर बरोबर काहीही लागत नाही. तुम्हाला हवं असेल तर एखादी कोशिंबीर करा. मग करून बघा आणि नक्की कळवा कशी झाली ते.

One thought on “पेंडभाजी किंवा पेंडपाला

  1. kaal ch keli hoti ani atishay bhannat zali hoti.. Apratim pakakruti.. Share kelya baddal khup khup Dhanyawaad !! :-)….

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: